

केंद्रातील सत्ता तसेच भाजप पक्षसंघटनेची सूत्रे हाती असलेले पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि त्यांचे विश्वासू सहकारी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या धक्कातंत्राची मालिका न संपणारी आहे. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जगतप्रकाश नड्डा यांचे उत्तराधिकारी कोण? हा प्रश्न २०२४ च्या लोकसभा निवडणुकीच्या आधीपासून भाजपला सतावत होता.
सत्ता ‘संतुलन’ साधण्यासाठी नव्या अध्यक्षाची निवड करताना संघाची पसंतीही विचारात घेतली जावी, अशी चर्चा गेल्या दीड वर्षापासून ऐकायला मिळत होती. धर्मेंद्र प्रधान, भूपेंद्र यादव, देवेंद्र फडणवीस, विनोद तावडे या दुसऱ्या फळीतील नेत्यांपासून मनोहरलाल खट्टर आणि नितीन गडकरींसारख्या जुन्याजाणत्यांकडे पक्षाची धुरा सोपविली जाण्याची शक्यता माध्यमांमध्ये सुरु होती.
पण नेहमीप्रमाणे सर्वांचे आडाखे चुकवून अध्यक्षपदासाठी संघाने निश्चित केलेले निकष पूर्ण करेल अशा सर्वस्वी अपरिचित नितीन नवीन नावाच्या ४५ वर्षीय नेत्याची नड्डा यांचे उत्तराधिकारी म्हणून राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्षपदी नियुक्ती करीत मोदी-शहा यांनी धक्कातंत्राचा आणखी एक आविष्कार सादर केला आहे.
अभाविपमधून भाजपमध्ये दाखल झालेले नितीन नवीन ४५ वर्षांचे असले तरी त्यांच्या गाठीशी सक्रिय राजकारणातील १९ वर्षांचा अनुभव आहे. नवीन आतापर्यंत सलग पाच वेळा आमदार म्हणून निवडून आले आहेत. त्यांचे वडील नवीन किशोर हेही सातवेळा आमदार होते. म्हणजे नवीन यांना घराणेशाहीचा भरभक्कम वारसा लाभला आहे.
भाजप- रालोआमध्ये मातापित्यांच्या पुण्याईवर पक्षसंघटनेत महत्त्वाचे पद तसेच मंत्री, खासदार आणि आमदार होणाऱ्यांची यादी मोठी आहे. नवीन यांच्या नियुक्तीमुळे आता थेट भाजपचे राष्ट्रीय अध्यक्षपद घराणेशाहीच्या दृष्टीपथात आले आहे.
बारा वर्षांपूर्वी मोदी आणि शहा यांच्या हाती भाजप पक्षसंघटनेची सूत्रे हाती आल्यापासून अनेक तरुण आणि अपरिचित चेहऱ्यांना पक्ष संघटनेत, केंद्रात आणि राज्यांमध्ये नेतृत्व करण्याची संधी मिळाली. प्रमोद सावंत, विजय रुपाणी, भूपेंद्र पटेल, बसवराज बोम्मई, मनोहरलाल खट्टर, मोहन यादव, विष्णुदेव साय, नायबसिंह सैनी, त्रिवेंद्र सिंह रावत, पुष्कर धामी, रघुबरदास, भजनलाल शर्मा, बिप्लवकुमार देब, माणिक साहा, मोहन चरण माझी यांच्यासारख्या अपरिचित चेहऱ्यांना थेट मुख्यमंत्री होण्याची संधी मिळाली.
मात्र, तरुण वयात मुख्यमंत्री होण्याची संधी मिळून देशाच्या राजकारणात प्रस्थापित झालेले देवेंद्र फडणवीस, योगी आदित्यनाथ, सर्वांनंद सोनोवाल आणि हिमंता बिस्व सरमा यांचा अपवाद वगळता नवनेतृत्वाचा प्रयोग फारसा यशस्वी ठरला नाही. नितीन नवीन याच ‘ट्रायल अँड एरर’ परंपरेतील एक नाव असेल की ते आपले वेगळेपण सिद्ध करतील? हा खरा प्रश्न आहे.
बिहारचे पाच वेळा आमदार, तीनवेळा मंत्री, अनेक राज्यांमध्ये पक्षाचे सहप्रभारी आणि सात वेळा आमदार राहिलेल्या पित्याचा दोन दशकांपासून राजकीय वारसा चालवूनही नितीन नवीन यांनी भाजपमध्ये प्रसिद्धीपासून दूर राहण्यात राहण्यात यश मिळविले.
मात्र, संघटनात्मक अनुभव आणि संघटन कौशल्य गाठीशी असलेल्या अपरिचित नितीन नवीन यांनी मोदी आणि शहा यांच्यावर मात्र चांगलीच छाप पाडलेली दिसते. त्यांच्या नियुक्तीमुळे बिहारच्या नेत्याला राष्ट्रीय पातळीवर भाजपचे नेतृत्व करण्याची प्रथमच संधी मिळाली आहे. केंद्रातील सत्तेची सूत्रे आणि पक्षसंघटनेवरील नियंत्रणाचा ‘रिमोट’ हाती असलेल्या नरेंद्र मोदी किंवा अटलबिहारी वाजपेयींसारख्या पंतप्रधानांच्या नेतृत्वाखाली पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षाचे पद दुय्यम ठरते.
अशा स्थितीत कुशाभाऊ ठाकरे, बंगारू लक्ष्मण, जगतप्रकाश नड्डा, जन कृष्णमूर्ती, वेंकय्या नायडू यांच्यासारखे नेते राष्ट्रीय अध्यक्षपदासाठी उपयुक्त ठरतात. पण विरोधी पक्षाची भूमिका बजावताना अटलबिहारी वाजपेयी, लालकृष्ण अडवानी, नितीन गडकरी, राजनाथ सिंह यांच्यासारख्या लढण्याची क्षमता असलेल्या नेत्यांकडे नेतृत्व सोपविले जाते. केंद्रात तसेच पंधरा राज्यांमध्ये सत्तेत असलेल्या सर्वशक्तीमान भाजपचे नेतृत्व नितीन नवीन यांच्याकडे सोपविल्यास त्यांना कोणत्याही आव्हानांना सामोरे जावे लागणार नाही.
त्यासाठी पक्ष संघटनेवर पूर्ण पकड असलेले पंतप्रधान मोदी आणि गृहमंत्री शहा सक्षम असल्यामुळे नवीन यांच्या नेतृत्वगुणांची पुरती कसोटीही लागणार नाही. मोदी-शहा यांच्या आदेशाबरहुकूम पक्षसंघटनेचे काम करणारे नड्डा यांचे उत्तराधिकारी अशीच त्यांची जबाबदारी असेल. अर्थात, भाजपची ताकद ही लोकसभा ते स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जिंकण्यातूनच वाढत असते.
त्यासाठी करावे लागणारे मतदानकेंद्रांवरील व्यवस्थापन, पक्ष संघटनेची बांधणी आणि विस्तार तसेच निवडणुकीच्या काळात साधावा लागणारा समन्वय यात नवीन यांनी आपले नैपुण्य सिद्ध करुन मोदी-शहांवर छाप पाडल्यामुळे ते नड्डांपेक्षा जास्त उपयुक्त ठरू शकतात. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून ते अगदी यशस्वी ठरले नाहीत तरी त्यांच्या नियुक्तीमुळे बिहारमध्ये आतापर्यंत शोधात असलेल्या भाजपला ‘नवीन’ चेहरा मिळाला आहे, यात शंका नाही.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.