पाकिस्तानमध्ये रविवारी (दि.18) दहशतवादी हल्ला झाला आहे. खैबर पख्तुनख्वा प्रांतात नव्याने बांधलेल्या पोलीस ठाण्यावर झालेल्या या दहशतवादी हल्ल्यात चार पाकिस्तानी पोलीस ठार झाले असून, अनेकजण जखमी झाले आहेत. दहशतवाद्यांनी हँडग्रेनेड आणि रॉकेट लाँचरसह पोलीस ठाण्यावर प्राणघातक हल्ला केला.
(Terror Attack On Pakistan Police Station Kills 4 Cops)
दक्षिण वझिरीस्तान आदिवासी जिल्ह्याच्या सीमेवर असलेल्या लकी मारवत येथील बरगाई पोलीस ठाण्यावर हा हल्ला करण्यात आला. संशयित दहशतवाद्यांनी घटनास्थळावरून पळ काढला असून, सध्या या परिसरात तणावाचे वातावरण आहे. संशयितांचा शोध घेण्यासाठी पोलिसांचा मोठा फौजफाटा परिसरात शोधमोहीम राबवत आहे. खैबर पख्तुनख्वा प्रांताचे मुख्यमंत्री महमूद खान यांनी हा हल्ला भ्याडपणाचे कृत्य असल्याचे म्हटले आहे.
पाकिस्तानचे राष्ट्रपती आरिफ अल्वी यांनीही या हल्ल्यात मृत्यूमूखी पडलेल्या पोलिस कर्मचाऱ्यांच्या कुटुंबांप्रती शोक व्यक्त केला आहे. "दहशतवाद पूर्णपणे नष्ट होत नाही तोपर्यंत आमचे प्रयत्न सुरूच राहतील" असे राष्ट्रपती अल्वी यांनी म्हटले आहे.
दहशतवादी हल्ल्याची जबाबदारी कोणत्याही गटाने स्वीकारली नाही. यापूर्वी याच जिल्ह्यातील पोलिसांवर झालेल्या हल्ल्यांची जबाबदारी तहरीक-ए-तालिबान पाकिस्तानने (टीटीपी) घेतली होती.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.