Sudan Gold Mine Airstrike 72 Dead: सुदान आणि इजिप्तच्या सीमेवरील सोन्याच्या खाणीत झालेल्या क्षेपणास्त्र हल्ल्यामुळे मोठी जीवितहानी झाल्याची धक्कादायक घटना समोर आली. उत्तर सुदानमधील या परिसरावर झालेल्या हवाई हल्ल्यात आतापर्यंत 72 जणांचा मृत्यू झाला असून अनेकजण गंभीर जखमी झाले आहेत. हा हल्ला इजिप्तच्या हवाई दलाकडून करण्यात आल्याचा संशय सुदानने व्यक्त केला. सुदान आणि इजिप्तच्या सीमेला लागूनच लिबियाची सीमा देखील आहे, परंतु सुदानने थेट इजिप्तवर या हल्ल्याचा आरोप केला.
हल्ल्याचे प्रत्यक्षदर्शी अब्देल-अजीज युसूफ यांनी दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी सकाळी खाण आणि आजूबाजूच्या परिसरात नेहमीप्रमाणे मजूर व नागरिक आपली कामे करत होते, तेव्हा अचानक एकसमान अनेक क्षेपणास्त्रे कोसळल्याने जोरदार स्फोट झाला, ज्यामुळे संपूर्ण परिसरात एकच हाहाकार उडाला.
दुसरीकडे, मात्र सुदानने (Sudan) केलेल्या गंभीर आरोपांवर इजिप्तच्या हवाई दलाने किंवा परराष्ट्र मंत्रालयाने अद्याप कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया किंवा स्पष्टीकरण दिलेले नाही. मात्र, सुदानच्या मते अशा प्रकारे सीमापार जाऊन केलेला हल्ला हा आंतरराष्ट्रीय कायद्याचे गंभीर उल्लंघन आहे. सोशल मीडियावर या हल्ल्याचे अनेक व्हिडिओ व्हायरल होत असून, यामध्ये खाण परिसरात रक्ताच्या थारोळ्यात पडलेले मृतदेह स्पष्टपणे दिसत आहेत.
सुदानचे नियमित सैन्य आणि निमलष्करी दल यांच्यात आधीपासूनच यादवी सुरु असल्यामुळे अशा प्रकारच्या हिंसाचाराच्या घटनांमध्ये सातत्याने वाढ होत आहे. शुक्रवारी सुदानच्या ब्लू नाइल स्टेटमध्ये लष्कराच्या ताब्यात असलेल्या विस्थापित छावणीवर ड्रोन हल्ला झाला, ज्यामध्ये 31 जण मारले गेले.
सुदानमध्ये सोन्याच्या खाणी हा तिथल्या नागरिकांच्या रोजगाराचा मुख्य स्त्रोत आहेत, परंतु या खाणींवर वर्चस्व मिळवण्यासाठी नेहमीच हिंसक संघर्ष पाहायला मिळतो. याचे मुख्य कारण म्हणजे या खाणींमधून मोठ्या प्रमाणावर सोन्याची तस्करी केली जाते. निमलष्करी संघटना 'रॅपिड सपोर्ट फोर्सेस' दारफुर आणि कोर्डोफान भागातील खाणींमधून सोने बाहेर काढून देशविदेशात तस्करी करते आणि याद्वारे स्वतःसाठी निधी उभारत असते. संयुक्त राष्ट्रांच्या 2024च्या अहवालानुसार, सुदानमधून बाहेर पडणाऱ्या एकूण सोन्यापैकी तब्बल 50 टक्के सोने हे बेकायदेशीर मार्गाने देशाबाहेर पाठवले जाते. या सर्व गैरप्रकारांमुळे सीमावर्ती भागात सुरक्षा आणि गस्त वाढवण्यात आली, परंतु या सततच्या संघर्षामुळे कामगारांच्या जिवाला मोठा धोका निर्माण होतो.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.