Protest Against America in Pakistan: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ज्यो बायडेन यांनी पाकिस्तान हे जगातील सर्वाधिक धोकादायक राष्ट्र असल्याचे वक्तव्य केले होते. त्यावर पाकिस्तानातून तीव्र प्रतिक्रिया उमटल्या आहेत. आता तर अमेरिकेच्या पाकिस्तानातील राजदुताला देशातून हाकलण्याची मागणी होऊ लागली आहे, त्यासाठी पाकिस्तानात आंदोलनाला सुरवात झाली आहे.
पक्षाचे प्रमुख सिराज उल हक यांनी म्हटले आहे की, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ज्यो बायडेन यांनी पाकिस्तानला जगातील सर्वात धोकादायक राष्ट्र म्हणून आमचा अपमान केला आहे. त्यामुळे पाकिस्तानातील अमेरिकेचे राजदूत डोनाल्ड ब्लूम यांना देशातून तत्काळ हाकलून द्यावे, अशी मागणी त्यांनी केली आहे.
सिराज उल हक म्हणाले की, अमेरिकेला कुठल्या गोष्टीचा एवढा गर्व आहे. पाकिस्तान एक स्वतंत्र राष्ट्र आहे आणि आम्ही पाकिस्तानी लोक अमेरिकेचे नोकर नाही. देशाच्या माजी आणि आजी सत्ताधाऱ्यांना माझे आवाहन आहे की, त्यांनी अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांच्या या वक्तव्याचा खुलेपणाने विरोध करावा. आणि पाकिस्तानातील अमेरिकेचे जे राजदूत आहेत, त्यांना येथून तत्काळ काढून टाकावे.
हक यांनी माजी पंतप्रधान इम्रान खान यांनाही आवाहन केले की, इम्रान नेहमीच अमेरिकेला विरोध करत आले आहेत. त्यांनी आता तरी अजिबात गप्प राहू नये. इस्लामाबादमध्ये बसलेल्या सत्ताधाऱ्यांनी कडक भूमिका घ्यावी, अमेरिकन लोकांना देशातून हाकलावे.
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ज्यो बायडेन यांनी एका कार्यक्रमात, पाकिस्तानकडे अण्वस्त्रे आहेत आणि त्यावर कुणाचे नियंत्रण नाही, त्या अण्वस्त्रांच्या देखभालीची काहीही व्यवस्था पाकिस्तानकडे नाही, त्यामुळे पाकिस्तान हा जगातील सर्वाधिक धोकादायक देश असल्याचे वक्तव्य केले होते. विशेष म्हणजे बायडेन यांचे वक्तव्य हे पाकिस्तानचे लष्करप्रमुख जनरल बाजवा हे अमेरिकेच्या दौऱ्यावरून परतल्यानंतर आले होते.
या वक्तव्याला पाकिस्तानात जोरदार विरोध होत आहे. पंतप्रधान शाहबाज शरीफ यांच्यावर दबाव वाढल्याने त्यांनी अमेरिकन राजदुताला पाचारण करून या वक्तव्यावर आक्षेप घेतला. शरीफ म्हणाले होते की, पाकिस्तान अत्यंत जबाबदार राष्ट्र आहे. १० वर्षांपासून आम्ही अण्वस्त्रे काळजीपुर्वक सांभाळली आहेत. तथापि, यानंतर अमेरिकेकडून अद्याप काहीही टिपण्णी केली गेलेली नाही.
गतवर्षी फ्रान्समध्ये आक्षेपार्ह व्यंगचित्रावरून देखील तहरीक ए लब्बैक या संघटनेतर्फे फ्रान्सच्या पाकिस्तानातील राजदूतांना देशातून हाकलण्याची मागणी झाली होती. तेव्हा झालेल्या हिंसाचारात 8 पोलिसांचा मृत्यू झाला होता.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.