सध्या पाकिस्तानची परिस्थिती गंभीर बनत चालली आहे. पाकिस्तानचे परकीय कर्ज वाढत आहे, विजेचे मोठे संकट आहे, भाज्यांचा किंमती वाढत आहेत.
अशात पाकिस्तानी लष्कराचा काळ बनलेल्या, तेहरीक-ए-तालिबान पाकिस्तानच्या दहशतवाद्यांनी, बलुचिस्तान प्रांतात 'स्वतंत्र प्रदेश' स्थापन केला आहे. टीटीपीने दावा केला आहे की त्यांनी कलता आणि मकरनमध्ये आपला नवीन प्रशासकीय जिल्हा तयार केला आहे.
एवढेच नाही तर शाहीन बलोचला या नव्या युनिटचा गव्हर्नर बनवण्यात आल्याचा दावा टीटीपीने केला आहे. खोरासान डायरीच्या अहवालानुसार, 2022 पासून किमान 4 बलुच गट टीटीपीमध्ये सामील झाले आहेत अशा वेळी हे नवीन युनिट तयार करण्यात आले आहे.
यापूर्वी टीटीपीने झोबमध्ये आपला प्रांत निर्माण केला होता. यासह टीटीपीने आता पाकिस्तानातील हिंसाचारग्रस्त बलुचिस्तान प्रांतात दोन नवीन जिल्हे निर्माण केले आहेत. यातील एक उत्तरेला आणि दुसरा दक्षिणेत आहे.
टीटीपीने आता पाकिस्तानचे प्रांत खैबर पख्तूनख्वा, बलुचिस्तान, पीओके भाग गिलगिट बाल्टिस्तानपर्यंत आपली पकड मजबूत केली आहे. पत्रकार आणि संशोधक झिया उर रहमान यांच्या मते, टीटीपीने बलुचिस्तानमध्ये आपल्या संघटनेचे दोन भाग केले आहेत.
गेल्या काही महिन्यांपासून टीटीपीच्या दहशतवाद्यांनी खैबर पख्तूनख्वा आणि बलुचिस्तानमध्ये विविध दहशतवादी गटांसोबत नवीन युती केली आहे. हे दोन्ही प्रांत अफगाण सीमेला लागून आहेत.
2021 मध्ये अफगाणिस्तानमध्ये तालिबानचे सरकार आल्यानंतर पाकिस्तानमध्ये टीटीपीच्या हल्ल्यांमध्ये मोठी वाढ झाली आहे. यामुळे देशात अस्थिरता निर्माण होत असतानाच पाकिस्तानी सुरक्षा दलांसमोर ते मोठे आव्हान बनले आहे.
तालिबानने सत्तेवर आल्यानंतर त्यांचे पाकिस्तानशी असलेले संबंध रसातळाला गेले आहेत. तालिबान टीटीपीशी संबंधित लोकांना सीमेच्या पलीकडे नेत असल्याचा दावा पाकिस्तान लष्कराने केला आहे. जरी याची पुष्टी झालेली नाही. पाकिस्तानी लष्कराने टीटीपीशी चर्चा सुरू केली होती, मात्र ती पुढे जाऊ शकली नाही.
2022 मध्ये पाकिस्तानी सैन्याने अफगाणिस्तानमधील टीटीपीच्या तळांवर हल्ला केला. आता हे दहशतवादी अमेरिकन शस्त्रांनी सज्ज आहेत आणि अनेकदा पाकिस्तानी सैनिकांना मारत आहेत. टीटीपीच्या दहशतवाद्यांचा संपूर्ण पाकिस्तानवर सत्ता स्थापन करण्याचा इरादा आहे. त्यांना इस्लामिक राजवट प्रस्थापित करायची आहे.
जुलै 2020 पासून, 10 दहशतवादी गट जे पाकिस्तान सरकारला सतत विरोध करत होते ते देखील TTP मध्ये सामील झाले आहेत. यामध्ये 2014 मध्ये TTP मधून फुटलेल्या अल-कायदाच्या तीन पाकिस्तानी शाखांचा समावेश आहे. या गटांच्या एकत्र येण्याने टीटीपी अधिक मजबूत आणि हिंसक बनली.
टीटीपीचे लक्ष आता पाकिस्तानातील निवडून आलेले सरकार पाडण्यावर आहे, जेणेकरून तेथे कट्टर इस्लामिक कायदा लागू करता येईल. यासाठी टीटीपीने अनेक वेळा पाकिस्तानी लष्कराला लक्ष्य केले आणि अनेक नेत्यांची हत्या केली. टीटीपी आत्मघाती बॉम्बर वापरते, अशा प्रकारे हजारो पाकिस्तानी सैन्य सैनिक आणि नागरिक मारले जातात.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.