Pakistan Imran Khan: पाकिस्तानच्या राजकारणात अनेक दिवसांपासून इम्रान खान चर्चेत आहेत. पंतप्रधान असताना त्यांच्या अनेक इच्छा पूर्ण झाल्या नाहीत, हे यावेळी समोर आलेल्या त्यांच्या वक्तव्यावरुन स्पष्ट झाले आहे. सत्ता हातातून गेल्यापासून ते अनेकदा भारताच्या स्तुतीचे पूल बांधताना दिसले आहेत. त्यांच्या या स्तुतीमागे अशा अनेक गोष्टी आहेत, ज्यावरुन त्यांना पुन्हा एकदा पंतप्रधान व्हायचे आहे हे स्पष्ट होते. यावेळी त्यांचे सरकार पाकिस्तानात आल्यास ते भारतासोबतच्या संबंधांबाबत अनेक मोठे निर्णय घेऊ शकतात, असे मानले जात आहे.
इम्रान खान (Imran Khan) म्हणाले की, 'आम्हाला भारतासोबतचे तणावपूर्ण संबंध सुधारायचे होते, परंतु काश्मीरचा विशेष दर्जा रद्द करणे हा 'अडथळा' ठरला.' यासोबतच त्यांनी भारताच्या परराष्ट्र धोरणाचेही कौतुक केले. पाकिस्तानातील राजकीय समीकरणे बिघडवण्याच्या प्रयत्नात ते ज्या प्रकारे भारताचे कौतुक करत आहेत, त्यावरुन ते काहीतरी मोठी राजकीय खेळी खेळत असल्याचे दिसते.
इम्रान पाकिस्तानमध्ये राजकीय भूकंप आणू शकतात
आता पाकिस्तानात (Pakistan) इम्रान खान यांचे सरकार आले तर ते नक्कीच काहीतरी वेगळे करणार आहेत, हे त्यांच्या वक्तव्यावरुन स्पष्ट होते. भारतासोबत चांगले संबंध निर्माण करण्यावर त्यांनी विशेष भर दिला आहे. त्यांना पाकिस्तानात वेळेपूर्वी निवडणुका हव्या आहेत आणि त्याबाबत ते सातत्याने निदर्शने करत आहेत. नुकतेच ते स्वतः नॅशनल असेंब्लीमध्ये जाऊन आपल्या सर्व सहकाऱ्यांसह राजीनामा देणार असल्याचेही सांगण्यात आले. ते पाकिस्तानच्या पंजाब आणि खैबर पख्तुनख्वा विधानसभा विसर्जित करतील.
आता सरकार आले तर इम्रान खान काय करणार?
सत्ता गमावण्याबरोबरच इम्रान खान पाकिस्तानचे असे माजी पंतप्रधान बनले आहेत, ज्यांना अविश्वास प्रस्तावाद्वारे सत्तेतून बाहेर करण्यात आले आहे. ऑगस्ट 2018 मध्ये 'नया पाकिस्तान' निर्माण करण्याचे आश्वासन देऊन इम्रान सत्तेवर आले आणि आपले पद सोडताना पाकिस्तान महागाई आणि परकीय कर्ज यांसारख्या समस्यांशी झुंजत होता, परंतु तेव्हापासून त्यांचा भारताकडे पाहण्याचा दृष्टीकोन बदलला आहे. भारतासोबत चांगले संबंध निर्माण करण्याच्या मूडने ते यावेळी सत्तेत परततील, असे त्यांच्या वक्तव्यावरुन दिसते.
माजी पंतप्रधान इम्रान खान पुढे म्हणाले की, 'भारताने 2019 मध्ये काश्मीरचा विशेष दर्जा रद्द केल्यानंतर आपल्या सरकारने चर्चेचा आग्रह धरला नाही. भारताने आधी आपला निर्णय मागे घ्यावा आणि शांतता चर्चा करावी अशी आमची इच्छा आहे. जनरल बाजवा हे भारतासोबत चांगले संबंध ठेवण्यास उत्सुक होते.'
पंतप्रधान मोदींबाबत ते म्हणाले होते की, 'आमचा अजूनही विश्वास आहे की, केवळ उजव्या विचारसरणीच्या पक्षाचा नेताच संघर्षातून मार्ग काढू शकतो. मोदी हे उजव्या विचारसरणीच्या पक्षाचे नेतृत्त्व करतात, त्यामुळे त्यांनी पुन्हा सत्तेत परतावे आणि काश्मीर प्रश्न सोडवावा, अशी आमची इच्छा आहे.'
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.