Former President Ranil Wickremesinghe Arrested: श्रीलंकेचे माजी राष्ट्रपती रानिल विक्रमसिंघे यांना शुक्रवारी (22 ऑगस्ट) कोलंबो येथे गुन्हे अन्वेषण विभागाने (CID) अटक केली. राष्ट्रपती असताना वैयक्तिक प्रवासासाठी सरकारी पैशांचा गैरवापर केल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आला. या प्रकरणी जबाब नोंदवण्यासाठी ते स्वतःच पोलीस विभागाकडे आले असता त्यांना ताब्यात घेण्यात आले. श्रीलंकेच्या राजकारणात हा एक मोठा धक्का मानला जात आहे, कारण विक्रमसिंघे यांना देशाच्या आर्थिक संकटातून बाहेर काढण्याचे श्रेय दिले जाते.
स्थानिक माध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार, रानिल विक्रमसिंघे शुक्रवारी सकाळी आर्थिक गुन्हे तपास विभागासमोर (FCID) जबाब नोंदवण्यासाठी पोहोचले होते. एका अधिकाऱ्याने सांगितले की, “आम्ही त्यांना कोलंबो फोर्ट दंडाधिकाऱ्यांसमोर हजर करत आहोत. देशाच्या संसाधनांचा वैयक्तिक वापर केल्याच्या आरोपाखाली त्यांना अटक करण्यात आली आहे.”
पोलिसांच्या (Police) गुन्हे अन्वेषण विभागाने (CID) विक्रमसिंघे यांच्यावर आरोप केला की, विक्रमसिंघे यांनी त्यांच्या खासगी प्रवासासाठी सरकारी निधीचा वापर केला. इतकेच नव्हे तर त्यांच्या सुरक्षा कर्मचाऱ्यांच्या खर्चाची जबाबदारीही सरकारने उचलली होती. याच प्रकरणी त्यांना जबाब नोंदवण्यासाठी बोलावले गेले होते, आणि तिथेच त्यांना अटक करण्यात आली.
रानिल विक्रमसिंघे यांच्यावर 2023 मध्ये सार्वजनिक निधीचा गैरवापर केल्याचा आरोप आहे. ते हवानाहून परत येत असताना त्यांनी लंडनमध्ये एक खासगी दौरा केला होता. या दौऱ्यात ते आणि त्यांची पत्नी मैथ्री विक्रमसिंघे यांनी युनिव्हर्सिटी ऑफ वोल्वरहॅम्पटनच्या एका समारंभात भाग घेतला होता. हा दौरा श्रीलंकेच्या सार्वजनिक संसाधनांचा गैरवापर मानला जात आहे.
या आरोपांवरुन, माजी राष्ट्रपती विक्रमसिंघे यांनी नेहमीच आपली बाजू मांडली. त्यांच्या म्हणण्यानुसार, त्यांच्या पत्नीने आपल्या प्रवासाचा खर्च स्वतः उचलला होता आणि त्यासाठी कोणताही सरकारी निधी वापरला गेला नव्हता. मात्र, पोलीस तपास यंत्रणांनी केलेल्या तपासात वेगळीच माहिती समोर आल्यामुळे ही कारवाई करण्यात आली.
जुलै 2022 मध्ये तत्कालीन राष्ट्रपती गोटाबाया राजपक्षे यांनी राजीनामा दिल्यानंतर रानिल विक्रमसिंघे श्रीलंकेचे (Sri Lanka) राष्ट्रपती झाले होते. राजपक्षे यांच्या राजीनाम्यामागे भ्रष्टाचार आणि गैरव्यवस्थापनाच्या विरोधात झालेले दीर्घकाळ चाललेले आंदोलन कारणीभूत होते. विक्रमसिंघे यांना श्रीलंकेच्या इतिहासातील सर्वात मोठ्या आर्थिक संकटातून देशाला बाहेर काढण्याचे आणि अर्थव्यवस्था स्थिर करण्याचे श्रेय दिले जाते.
तरीही, सप्टेंबर 2024 मध्ये झालेल्या राष्ट्रपती निवडणुकीत त्यांना अनुरा कुमारा दिसानायके यांच्याकडून पराभव पत्करावा लागला. श्रीलंकेच्या राजकारणातील एक अनुभवी आणि कुशल राजकारणी मानल्या जाणाऱ्या विक्रमसिंघे यांची ही अटक देशातील भ्रष्टाचारविरोधी मोहिमेच्या दृष्टीने एक महत्त्वपूर्ण पाऊल मानले जात आहे. या प्रकरणातील पुढील तपास आणि कायदेशीर प्रक्रिया आता सुरु होईल.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.