Flydubai Flight FZ1073 Cockpit Attack Video: दुबईहून तेल अवीवच्या दिशेने जाणाऱ्या फ्लायदुबईच्या 'एफझेड 1073' या विमानातील थरारक घटनेचा नवीन व्हिडिओ समोर आला, ज्याने खळबळ उडवून दिली. विमानातील को-पायलटने मुख्य पायलटवर अचानक जीवघेणा हल्ला केल्यामुळे विमानात प्रचंड गोंधळ आणि भीतीचे वातावरण निर्माण झाले. मात्र आता समोर आलेल्या या नव्या फुटेजमध्ये जखमी झालेले भारतीय पायलट कॅप्टन स्मित मच्छार प्रवाशांशी बोलताना दिसत आहेत, तर ज्या को-पायलटने हा हल्ला केला तो स्वतः रक्ताने माखलेल्या गणवेशात गुडघ्यावर बसलेला पाहायला मिळत आहे.
सौदी अरेबियाच्या पोलिसांनी या आरोपी को-पायलटला युएईच्या ताब्यात दिले असून, हा हल्ला एका दहशतवादी कटाचा भाग होता की यामागे दुसरे काही कारण होते, याचा तपास सध्या सुरु आहे. या भयानक घटनेदरम्यान कॅप्टन स्मित मच्छार यांनी अत्यंत धाडसाने प्रवाशांशी संवाद साधला, ज्याचा व्हिडिओ समोर आला. कॅप्टन स्मित हाताने इशारा करुन प्रवाशांना सांगत आहेत की, ते हात हलवू शकतात पण मुठी बंद करु शकत नाहीत.
त्यावर विमान प्रवाशांनी त्यांना धीर देत सांगितले की, कोणतेही टेन्शन घेऊ नका, हल्लेखोर को-पायलटला पकडून सीटला घट्ट बांधून ठेवले आहे आणि सर्व प्रवासी व क्रू मेंबर्स पूर्णपणे सुरक्षित आहेत. विमान सौदी अरेबियाच्या ताबूक विमानतळावर इमर्जन्सी लँडिंगसाठी नेले जात असताना उपचारासाठी तातडीने डॉक्टरला पाचारण करण्यात आले, ज्यांनी प्रथमोपचार करुन पायलटचा रक्तस्त्राव थांबवला. कॉकपिटमधील या संवादादरम्यान प्रवासी खूप चिंतेत दिसत होते. पोलिसांनी तातडीने हल्लेखोर दहशतवाद्याला (Terrorist) ताब्यात घेतले.
गेल्या चार वर्षांपासून फ्लाय दुबई एअरलाइन्समध्ये सेवा बजावणारे भारतीय पायलट कॅप्टन स्मित मच्छार यांनी दाखवलेली हिंमत खरोखरच कौतुकास्पद आहे. को-पायलटची विमान क्रॅश करण्याची किंवा घातपात घडवून आणण्याची कुटिल चाल लक्षात आल्यानंतर कॅप्टन स्मित यांनी त्याला रोखण्याचा प्रयत्न केला, याचदरम्यान आरोपीने त्यांच्यावर धारदार शस्त्राने हल्ला केला. शरीरावर गंभीर जखमा आणि रक्तस्त्राव होत असतानाही स्मित यांनी हार मानली नाही आणि कॉकपिटची स्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी संघर्ष केला.
या विमान प्रवासात तब्बल 174 प्रवाशांचा जीव धोक्यात आला होता, मात्र कॅप्टन स्मित आणि इतर वैमानिकांच्या प्रसंगावधानामुळे विमान सुरक्षितपणे ताबूक विमानतळावर उतरवण्यात आले. प्रवाशांच्या आणि इतर कर्मचाऱ्यांच्या सामूहिक प्रयत्नांमुळे हल्लेखोर को-पायलटला वेळीच बांधून ठेवले गेले, ज्यामुळे मोठा अनर्थ होण्यापासून टळला.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.