Israel Hamas War: इस्त्रायल आणि हमास यांच्यातील युद्ध थांबण्याचं नाव घेत नाहीये. इस्त्रायल सातत्याने गाझावर हवाई हल्ले करत आहे. इस्त्रायलने आता राफाह शहराला टार्गेट केले आहे. राफाह शहरावर इस्त्रायलने जोरदार हवाई हल्ला चढवला. दुसरीकडे, नॉर्वे, स्पेन आणि आयर्लंडने पॅलेस्टाईनला मान्यता दिल्याने इस्त्रायल आणखी चवताळला आहे. नुकताच इस्त्रायलकडून हमासच्या ताब्यात असणाऱ्या इस्त्रायली महिला सैनिकांचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल करण्यात आला. त्यामुळे इस्त्रायलमध्ये असंतोषाची लाट पसरली.
दरम्यान, गेल्या वर्षी 7 ऑक्टोबर रोजी इस्रायलवर हमासने केलेल्या हल्ल्याशी संबंधित अनेक धक्कादायक खुलासे जवळपास रोजच होत आहेत. ताजा खुलासा म्हणजे पॅलेस्टिनी पिता-पुत्राची कबुली. खरं तर, हल्ल्यादरम्यान एका महिलेवर बलात्कार आणि हत्या केल्याची कबुली देणाऱ्या पिता-पुत्राच्या इस्रायली लष्कराच्या चौकशीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. व्हिडिओमध्ये 47 वर्षीय जमाल हुसेन अहमद रादी आणि त्याचा अल्पवयीन मुलगा अब्दुल्ला यांची इस्रायली अधिकारी चौकशी करत असल्याचे दिसत आहे. चौकशीदरम्यान, वडील आणि मुलाने 7 ऑक्टोबर रोजी इस्रायली शहरांवर हल्ले करताना एका महिलेची हत्या करण्यापूर्वी बलात्कार केल्याची कबुली दिली. या कबुलीजबाबाने सध्या एकच हल्लकल्लोळ उडाला आहे.
दुसरीकडे, जमालला त्याचा मुलगा अब्दुल्लासह इस्रायल संरक्षण दलाने (IDF) यावर्षी मार्चमध्ये पकडले होते. चौकशीदरम्यान त्याच्या भयंकर कृत्याबद्दल माहिती देताना जमालने सांगितले की, त्याला एका घरात "ओरडणारी" आणि "रडत" असलेली एक महिला दिसली. त्याने त्याच्या कबुलीजबाबात पुढे सांगितले की, "मला जे करायचे होते ते मी केले... मी तिच्यावर बलात्कार केला...बंदुकीचा धाक दाखवून मी तिला तिचे कपडे काढण्यास लावले. मला आठवते की तिने जीन्स घातली होती." बलात्कारानंतर महिलेचे काय झाले हे माहित नसल्याचे त्याने सांगितले.
तथापि, जमालच्या 18 वर्षांच्या मुलाने अधिकाऱ्यांना सांगितले की, ‘’त्याच्या वडिलाने महिलेवर बलात्कार केला आणि नंतर तिची हत्या केली. माझ्या वडिलांनी तिच्यावर पहिल्यांदा बलात्कार केला, त्यानंतर मी तो केला आणि मग माझ्या चुलत भावाने केला. त्यानंतर तिथून आम्ही निघालो, परंतु माझ्या वडिलांनी बलात्कार केल्यानंतर महिलेची हत्या केली."
जमालने पुढे असेही सांगितले की, ‘ज्या कोणत्याही घरात त्याला कोणीतरी रडत असल्याचे दिसले, तेव्हा त्याने एकतर त्यांची हत्या केली किंवा त्यांचे अपहरण केले.’ 7 ऑक्टोबर रोजी हमासने केलेल्या हल्ल्यात सुमारे 1,200 लोक मारले गेले आणि 250 हून अधिक लोकांचे अपहरण करण्यात आले, असा इस्रायलचा दावा आहे. यानंतर गाझामध्ये युद्ध सुरु झाले. दरम्यान, हमासचा खात्मा करण्याच्या उद्देशाने केलेल्या इस्रायलच्या कारवाईमुळे आतापर्यंत गाझामध्ये 35,000 हून अधिक मृत्यू झाले आहेत, असे आरोग्य अधिकाऱ्यांनी सांगितले. या आठवड्याच्या सुरुवातीला इस्रायलने हमासने अपहरण केलेल्या पाच महिला सैनिकांचा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला.
दरम्यान, इस्रायली लष्कराने शुक्रवारी सांगितले की, 7 ऑक्टोबर रोजी मारल्या गेलेल्या आणखी तीन ओलिसांचे मृतदेह गाझामधून रात्रभर बाहेर काढण्यात आले. हानान याब्लोंका, मिशेल निसेनबॉम आणि ओरियन हर्नांडेझ यांचे मृतदेह सापडले आहेत आणि त्यांच्या कुटुंबीयांना सूचित करण्यात आले आहे, असे लष्कराने सांगितले. लष्कराच्या म्हणण्यानुसार, हमासने इस्त्रायलवर हल्ले सुरु केले त्या दिवशी मेफेलिझम चौकात झालेल्या हल्ल्यात तिघे ठार झाले आणि त्यांचे मृतदेह गाझा येथे नेण्यात आले. सुमारे एक आठवड्यापूर्वी लष्कराने सांगितले की, त्यांना 7 ऑक्टोबर रोजी मारल्या गेलेल्या इतर तीन इस्रायली ओलिसांचे मृतदेह सापडले आहेत. गाझामध्ये अजूनही सुमारे 100 लोकांना ओलीस ठेवण्यात आल्याचा इस्रायलचा दावा आहे. आणखी 30 ओलिसांना मारल्याचा दावाही इस्त्रायलने केला आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.