Israel Hamas War: इस्त्रायल आणि हमास यांच्यातील युद्ध थांबण्याचं नाव घेत नाहीये. इस्त्रायल सातत्याने गाझातील शहरांवर हवाई हल्ले करत आहे. दरम्यान, काही दिवसांपासून इस्त्रायल आणि हमास यांच्यात युद्धविराम होऊ शकतो अशी चर्चा होती. मात्र आता समोर आलेल्या बातमीने पुन्हा चकित केले आहे. इस्त्रायल आणि हमास यांच्यातील युद्धविरामाची चर्चा अयशस्वी झाल्याचे दिसून येत आहे.
स्काय न्यूजने दिलेल्या वृत्तानुसार, इस्रायली संरक्षण दलांनी रफाह शहराच्या बॉर्डर क्रॉसिंगवर ताबा मिळवला आहे. आयडीएफने रात्रभर परिसरात ऑपरेशन केले. इस्रायली सैनिक गाझामध्ये सुमारे 3.5 किमी घुसल्याचे वृत्त आहे. इस्रायलने रफाह शहराच्या सीमेजवळ मोठ्या प्रमाणात रणगाडे तैनात केले आहेत. दरम्यान, जॉर्डनने इस्त्रायलला (Israel) रफाहमधील कारवाईपूर्वी इशारा दिला आहे. जॉर्डनने म्हटले की, ‘’रफाहमधील आणखी एक इस्रायली हत्याकांड रोखण्यात आंतरराष्ट्रीय समुदाय अपयशी ठरला आहे. पॅलेस्टिनींवरील आणखी एक नरसंहार थांबवण्यासाठी सर्वांनी एकत्रितपणे कृती करण्याची वेळ आली आहे.’’
इस्रायली आर्मी रेडिओनुसार, रफाह शहरात सुमारे 100,000 पॅलेस्टिनी राहत असल्याचा अंदाज आहे. आणखी एका मोठ्या नरसंहाराच्या भीतीने जॉर्डनचे परराष्ट्र मंत्री आयमन सफादी म्हणाले की, “पॅलेस्टिनींचा आणखी एक नरसंहार होणार आहे. इस्रायल पॅलेस्टिनींना रफाह सोडण्याचा इशारा देत आहे, कारण त्यांच्यावर हल्ल्याचा धोका आहे.”
दरम्यान, रफाहमध्ये 1.5 दशलक्षाहून अधिक पॅलेस्टिनी राहत आहेत, जे गाझामधून आपला जीव वाचवण्यासाठी आले आहेत. इस्रायलने गेल्या वर्षी 7 ऑक्टोबर रोजी हमासच्या हल्ल्यानंतर गाझावर हवाई हल्ले सुरु केले. इस्रायली हल्ल्यामुळे गाझा शहरात 34 हजारांहून अधिक लोक मारले गेले आहेत, त्यापैकी बहुतेक महिला आणि मुले आहेत. दुसरीकडे, हमासच्या हल्ल्यात इस्रायलने आपले 1,200 लोक गमावले आहेत. युनायटेड नेशन्सच्या म्हणण्यानुसार, इस्रायली युद्धात सुमारे सात महिने गाझाचा मोठा भाग उध्वस्त झाला आहे. लोक दोन वेळच्या अन्नासाठी संघर्ष करत आहेत.
दुसरीकडे, आंतरराष्ट्रीय न्यायालयात इस्रायलवर नरसंहाराचा आरोप आहे. जानेवारीमधील अंतरिम निर्णयात म्हटले आहे की, ‘इस्रायल गाझामध्ये नरसंहार करत असून तेल अवीव अशी कृत्ये थांबवण्यात अपयशी ठरत आहे.’ आंतरराष्ट्रीय न्यायालयाने बेंजामिन नेतन्याहू यांच्या अटकेसाठी वॉरंट जारी करण्याची धमकीही दिली आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.