Donald Trump Iran Warning: इराणमध्ये सुरु असलेल्या जनक्षोभाच्या आणि हिंसक निदर्शनांच्या पार्श्वभूमीवर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणला आतापर्यंतचा सर्वात कठोर इशारा दिला. एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत ट्रम्प यांनी इराणच्या सत्ताधाऱ्यांना थेट बजावले की, जर देशात शांतता प्रस्थापित झाली नाही आणि आंदोलकांवरील अत्याचार थांबले नाहीत, तर "इराणला जगाच्या नकाशावरुन पुसून टाकू." ट्रम्प यांच्या या विधानामुळे आखाती देशांतील युद्धाचा धोका अधिक गडद झाला आहे. काही दिवसांपूर्वीच ट्रम्प यांनी इराणमध्ये सत्तापालट करण्याचे आवाहन केले होते, ज्यामुळे दोन्ही देशांमधील संबंध कमालीचे ताणले गेले आहेत.
ट्रम्प यांनी अत्यंत आक्रमक पवित्रा घेत म्हटले की, जर इराणने आपल्या कारवाया थांबवल्या नाहीत, तर अमेरिका गप्प बसणार नाही. "काहीही अघटित घडल्यास संपूर्ण देश उद्ध्वस्त केला जाईल. आम्ही त्यांना नकाशावरुन कायमचे पुसून टाकू," अशा प्रक्षोभक शब्दांत त्यांनी तेहरानला इशारा दिला. इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनी यांच्यावर टीका करताना ट्रम्प यांनी त्यांना 'एक आजारी व्यक्ती' असे संबोधले. तसेच, त्यांनी आपल्या देशाचा कारभार नीट सांभाळावा आणि निरपराध लोकांची हत्या थांबवावी, असेही ट्रम्प यांनी सुनावले.
त्याचवेळी, ट्रम्प यांच्या या विधानाला इराणनेही जशास तसे उत्तर दिले. इराणच्या सशस्त्र दलाचे प्रवक्ते जनरल अबोलफजल शेकारची यांनी अमेरिकेला प्रतिइशारा दिला की, जर अयातुल्ला अली खामेनी यांच्याविरुद्ध कोणतीही कारवाई करण्याचा प्रयत्न झाला, तर तेहरान देखील अमेरिकेला जशास तसे उत्तर देईल. शेकारची यांनी स्पष्ट केले की, ट्रम्प यांनी हे लक्षात ठेवावे की जर आमच्या नेत्याकडे कोणी वाकड्या नजरेने पाहिले किंवा हात उचलला, तर आम्ही केवळ तो हात कापणार नाही, तर त्यांचे संपूर्ण अस्तित्व धोक्यात आणू. इराणच्या या आक्रमक भूमिकेमुळे आंतरराष्ट्रीय समुदायामध्ये चिंतेचे वातावरण आहे.
सध्या इराणमध्ये (Iran) महागाईमुळे सुरु झालेली आंदोलने आता सत्तापालटाच्या मागणीपर्यंत पोहोचली आहेत. मानवाधिकार संस्थांच्या अहवालानुसार, या निदर्शनांमध्ये आतापर्यंत 4519 लोकांचा मृत्यू झाला आहे, तर 26300 हून अधिक आंदोलकांना अटक करण्यात आली आहे. इराण सरकारने या संपूर्ण अशांततेमागे अमेरिका आणि इस्रायलचा हात असल्याचा आरोप केला आहे. इराणमधील परिस्थिती हाताबाहेर जात असताना ट्रम्प यांची 'नकाशावरुन पुसून टाकण्याची' धमकी दोन बड्या शक्तींमधील थेट संघर्षाला आमंत्रण देणारी ठरु शकते.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.