आयुष्यातील सर्वात सुंदर क्षणांपैकी एक म्हणजे आपल्या आवडत्या व्यक्तीला लग्नासाठी प्रपोज करणे. यासाठी अनेकजण खास नियोजन करतात. कोणी रोमँटिक डिनरचे आयोजन करते, तर कोणी समुद्रकिनाऱ्यावर सूर्यास्ताच्या साक्षीने प्रेमाची कबुली देते. मात्र, अमेरिकेतील एका तरुणाने आपल्या प्रेयसीला समुद्रकिनाऱ्यावर प्रपोज केले आणि तिनेही आनंदाने होकार दिला.
दोघांसाठी हा क्षण आयुष्यभर लक्षात राहणारा होता. पण आनंदाच्या या क्षणाला काही सेकंदांतच अनपेक्षित वळण मिळाले. साखरपुड्यानंतर प्रेयसीला उचलून घेत असतानाच समुद्राची एक जोरदार लाट आली आणि तरुणाच्या हातातील महागडी हिऱ्याची अंगठी थेट समुद्रात वाहून गेली. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून, या जोडप्याच्या नशिबाची चर्चा सुरू झाली आहे.
ही घटना अमेरिकेतील कॅलिफोर्निया राज्यातील सॅन क्लेमेंटे येथील कॅलाफिया स्टेट बीचवर घडली. जेस हॅरिक याने 15 नोव्हेंबर रोजी आपली दीर्घकाळची प्रेयसी जोई मॅटिनसन हिला लग्नासाठी विचारण्याचे नियोजन केले होते. यासाठी त्याने समुद्रकिनाऱ्यावरील सुंदर सूर्यास्ताची वेळ निवडली होती. या खास प्रसंगासाठी त्याने तब्बल चार कॅरेटचा हिरा असलेली महागडी साखरपुड्याची अंगठीही खरेदी केली होती.
सर्व काही ठरल्याप्रमाणे पार पडले. जेसने जोईसमोर लग्नाचा प्रस्ताव ठेवला आणि तिनेही आनंदाने होकार दिला. दोघेही या आनंदाच्या क्षणाचा आनंद घेत होते. मात्र, त्यानंतर घडलेल्या प्रकाराने त्यांच्या आनंदावर विरजण पडले.
साखरपुड्याचा आनंद साजरा करताना जेसने आपल्या होणाऱ्या पत्नीला उचलून घेतले. त्यावेळी त्याच्या हातात अंगठीची पेटी होती. मात्र, समुद्राच्या दिशेने अचानक एक मोठी लाट आली. लाटेचा वेग इतका जास्त होता की जेसच्या हातातून अंगठीची पेटी निसटली आणि काही क्षणांतच ती पाण्यात गायब झाली.
या घटनेचा व्हिडीओ जेसने सोशल मीडियावर शेअर केला आहे. त्याने या प्रसंगाचे वर्णन आयुष्यातील सर्वात आनंदाचा आणि तितकाच निर्दयी क्षण असे केले. तसेच समुद्राला उद्देशून अंगठी परत देण्याची विनंतीही केली. अंगठी शोधण्यासाठी स्कूबा डायव्हर्सची मदत घेतली जात असल्याचेही त्याने सांगितले.
या घटनेबाबत जेसने CBS News शी संवाद साधताना महत्त्वाची माहिती दिली. समुद्राच्या लाटा वेगाने किनाऱ्याकडे येत असल्याचे त्याच्या लक्षात आले होते. त्यामुळे प्रेयसीला पाण्याच्या प्रवाहाचा फटका बसू नये, यासाठी त्याने तिला उचलून घेतले. त्यावेळी दोघांचे मोबाईल, पाकीट आणि गाडीच्या चाव्या त्यांच्या खिशात होत्या. त्यामुळे अंगठीची पेटी त्याने हातात धरली होती.
मात्र, प्रेयसीला सुरक्षित ठेवण्याच्या प्रयत्नात त्याच्या हातातील पेटीच समुद्राच्या लाटांमध्ये वाहून गेली. या घटनेनंतर समुद्रकिनाऱ्यावर उपस्थित असलेल्या काही लोकांनीही अंगठी शोधण्याचा प्रयत्न केला. सुरुवातीला तिथे उपस्थित असलेल्या जेसिका लिकॉन यांना हे जोडपे साखरपुड्याचा आनंद साजरा करत असल्याचे वाटले. मात्र, काही वेळाने त्यांना अंगठी हरवल्याचे समजले.
अंगठीची किंमत आणि तिच्याशी जोडलेल्या आठवणी लक्षात घेता जेसने ती शोधण्यासाठी शक्य ते सर्व प्रयत्न केले. समुद्रकिनाऱ्यावर मेटल डिटेक्टरच्या मदतीनेही शोधमोहीम राबवण्यात आली. अंगठीची पेटी सापडल्यास त्यातील अंगठी शोधणे सोपे जाईल, अशी आशा उपस्थितांना होती. मात्र, अनेक प्रयत्न करूनही अंगठी किंवा पेटीचा काहीच मागमूस लागला नाही.
दरम्यान, कॅलिफोर्नियाच्या किनारपट्टीवर मोठ्या लाटांचा प्रभाव जाणवत असल्याचेही वृत्तात नमूद करण्यात आले आहे. अशा परिस्थितीत समुद्रकिनाऱ्यावर घडलेल्या या घटनेने सर्वांचे लक्ष वेधले आहे.
या संपूर्ण घटनेत जेसला अंगठी हरवल्याचे दुःख नक्कीच आहे. मात्र, त्याच्या मते सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे जोई पूर्णपणे सुरक्षित आहे. दरम्यान, या जोडप्याच्या मदतीसाठी न्यूयॉर्कमधील हाताने साखरपुड्याच्या अंगठ्या तयार करणाऱ्या एका कंपनीने पुढाकार घेतला आहे. कंपनीने सोशल मीडियावरील पोस्ट पाहिल्यानंतर या दोघांसाठी नवीन अंगठी बनवून देण्याची तयारी दर्शवली आहे.
आता समुद्रात हरवलेली जुनी अंगठी सापडणार की नाही, हे सांगता येत नाही. मात्र, या जोडप्याच्या साखरपुड्याची कहाणी आयुष्यभर त्यांच्या आठवणीत राहणार आहे. प्रेयसीने लग्नाला होकार दिला खरा, पण त्यानंतर समुद्राने दिलेला हा अनपेक्षित धक्का दोघांसाठी अविस्मरणीय ठरला!
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.