ब्रिटनच्या 95 वर्षीय राणी एलिझाबेथ II यांना कोरोनाची लागण झाली आहे. बकिंघम पॅलेसने रविवारी यासंबंधीची माहिती दिली. पॅलेसने आपल्या अधिकृत निवेदनात म्हटले की, कोरोनामुळे राणी एलिझाबेथ (Britain Queen Elizabeth II) यांना सर्दीसारखी सौम्य लक्षणे आढळून आली आहेत. 95 वर्षीय राणी सध्या त्यांच्या विंडसर पॅलेसमध्ये वास्तव्यास आहेत. त्याचबरोबर पुढील काही दिवस तिथेच त्या आराम करणार असल्याचे देखील सांगण्यात आले आहे. तसेच राणी डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार वैद्यकीय सेवा घेतील, असेही पॅलेसकडून सूचित करण्यात आले आहे. (Britains 95 year old Queen Elizabeth II corona positive)
दरम्यान, सध्या यूके सरकारच्या (UK Government) कोविड धोरणानुसार, 'जर कोणी कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे आढळून आले, तर त्याने स्वतःला 10 दिवसांसाठी आयसोलेशनमध्ये ठेवणे आवश्यक आहे. सहाव्या आणि सातव्या दिवशी त्याचा रिपोर्ट निगेटिव्ह आला तरच तो क्वारंटाईनमधून बाहेर येऊ शकतो.''
तथापि, ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन (Boris Johnson) यांनी रविवारी सांगितले की, आम्ही सेल्फ-आयसोलेशनचे धोरण संपविण्याचा विचार करत आहोत. त्याचबरोबर लसीकरणावर अधिक लक्ष दिले जाईल. ते पुढे म्हणाले, 'कोरोना काळातही आपल्याला सामान्य पद्धतीने जीवन जगायला शिकले पाहिजे.'
तसेच, राणीचा उत्तराधिकारी प्रिन्स चार्ल्स आणि त्याची पत्नी कॅमिला पार्कर यांनाही या महिन्याच्या सुरुवातीला कोरोनाची लागण झाली होती. विशेष म्हणजे ब्रिटनमध्ये मोठ्या प्रमाणात कोरोना रुग्णांची संख्या पुन्हा एकदा वाढू लागली आहे. डेल्टा व्हेरिएंटनंतर ओमिक्रॉन संसर्गाने थैमान घालण्यास सुरुवात केली आहे. याआधी ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन देखील कोविड पॉझिटिव्ह आले होते.
शिवाय, ब्रिटन सरकार कोरोनाची मोफत चाचणीची तरतूदही संपुष्टात आणू शकते, असेही बोलले जात आहे. ब्रिटनमध्ये 12 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या 85 टक्के लोकसंख्येला कोरोनाच्या दोन्ही लसी देण्यात आल्या आहेत. लोकसंख्येच्या दोन-तृतीयांश लोकांना त्यानंतर बूस्टर डोस मिळाला आहे. ब्रिटनमध्ये कोरोनामुळे आतापर्यंत 1.6 लाखांहून अधिक मृत्यू झाले आहेत. अनेक दिवसांपासून देशातील निर्बंध हटवण्याची मागणी नागरिक आणि उद्योगांकडून होत आहे.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.