Bangladesh Political Violence Gopalganj Clash: बांगलादेश पुन्हा एकदा राजकीय हिंसाचाराच्या वणव्यात होरपळून निघत असून, रस्त्यावर उतरलेल्या दोन प्रतिस्पर्धी गटांमधील संघर्षामुळे देशात तणावाचे वातावरण निर्माण झाले. एकीकडे शेख हसीना यांच्या अवामी लीगचे कार्यकर्ते विद्यमान तारिक रेहमान सरकारच्या धोरणांविरोधात आक्रमक झाले, तर दुसरीकडे सत्ताधारी बीएनपीचे कार्यकर्ते त्यांना प्रत्युत्तर देत आहेत. या संघर्षाचे तीव्र पडसाद शेख हसीना यांचे मूळ गाव असलेल्या गोपालगंज जिल्ह्यात उमटले असून, येथे अवामी लीगच्या कार्यकर्त्यांवर झालेल्या भीषण हल्ल्यात तीसहून अधिक जण जखमी झाले.
गोपालगंजमधील कोतालीपाडा परिसरात हिंसाचार आणि जाळपोळीच्या घटना घडल्या असून, अनेक घरे आणि दुकानांची मोठ्या प्रमाणावर तोडफोड करण्यात आली. क्रिकेट स्टेडियमजवळील फुलांच्या दुकानासह सुमारे बारा दुकानांचे या हल्ल्यात मोठे नुकसान झाले. लॉन्च घाट परिसरात अवामी लीगच्या समर्थकांनी शेख हसीना यांच्या समर्थनार्थ काढलेल्या रॅलीवर गावठी बॉम्ब फेकण्यात आल्याने दहाहून अधिक कार्यकर्ते गंभीररीत्या भाजले. या घटनेनंतर व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये संतप्त नागरिक रस्त्यावर उतरुन बांगलादेश सैन्याविरुद्ध घोषणाबाजी करताना दिसत आहेत.
राजकीय अस्थिरतेसोबतच या घडामोडींना आंतरराष्ट्रीय कूटनीतीची किनारही आहे. नॅशनल सिटीजन पार्टीचे संयोजक नाहिद इस्लाम यांनी पंतप्रधान तारिक रेहमान यांची भेट घेतल्यानंतर भारताविरोधात आक्रमक विधाने करत राजकीय एकजुटीचे आवाहन केले. भारत आणि बांगलादेश (Bangladesh) यांच्यातील गंगा नदी पाणीवाटप कराराची मुदत 12 डिसेंबर रोजी संपत असतानाच या वक्तव्यामुळे दोन्ही देशांतील संबंध अधिक संवेदनशील बनले.
ऑगस्ट 2024 मधील सत्तांतरानंतर भारतात आश्रयाला असलेल्या शेख हसीना यांनी मायदेशी परतण्याचे संकेत दिल्याने आणि अवामी लीगवरील बंदी झुगारुन कार्यकर्ते रस्त्यावर उतरल्याने सत्ताधारी बीएनपीसमोर मोठे राजकीय आव्हान उभे राहिले आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.