

डिचोली: खाण क्षेत्रात येणाऱ्या घरांबाबत चुकीचा अहवाल आणि धूळ प्रदूषणाच्या प्रश्नावरून सारमानस भागातील लोक आज पुन्हा एकदा रस्त्यावर उतरले. संतप्त महिलांसह स्थानिक लोकांनी आक्रमक पवित्रा घेत ‘वेदांता’ची खनिज वाहतूक रोखून धरली. जोपर्यंत मागण्या मान्य होत नाहीत, तोपर्यंत खनिज वाहतूक करू देणार नाही, असा पवित्रा संतप्त आंदोलनकर्त्यांनी घेतला.
आंदोलनकर्ते आपल्या मागणीशी ठाम राहिल्याने दिवसभर खनिज वाहतूक ठप्प होती. दुसऱ्या बाजूने आज सायंकाळी प्रशासनाने आंदोलनकर्त्यांना नोटीस जारी करण्याच्या हालचाली सुरू केल्या होत्या. मात्र, नोटीस घेण्यास नकार देत सायंकाळी आंदोलनकर्ते घरी गेले.
दरम्यान, उद्या (मंगळवारी) पुन्हा रस्त्यावर उतरून आंदोलन चालूच ठेवण्याचा निर्णय ग्रामस्थांनी घेतला आहे. मागण्यासंदर्भात उपाययोजना करण्यास संबंधीत खाण कंपनी तसेच सरकारी यंत्रणेने कोणतीच ठोस पावले उचलली नाहीत. त्यामुळे संतप्त लोकांनी आज रास्तारोको केला.
अहवाल चुकीचा असल्याचा दावा
खाण क्षेत्राच्या दोनशे मीटर अंतराच्या मर्यादेत केवळ पाच घरे येत आहेत. असा पाहणी अहवाल कंपनीने तयार केला आहे. हा अहवाल पूर्णपणे चुकीचा असून बरीच घरे डावलण्यात आली आहेत, असा सारमानस भागातील जनतेचा दावा आहे. एकाबाजूने ध्वनी आणि धूळ प्रदूषण नियंत्रणात आणण्यास कंपनी व्यवस्थापनाचे आतापर्यंत दुर्लक्ष होत आहे. तर दुसऱ्या बाजूने घरांबाबत चुकीचा अहवाल केल्याने सारमानस, बागवाडा येथील लोक संतप्त बनले आहेत.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.