Bangladesh Political Violence Arson: बांगलादेशातील राजकीय तणाव पुन्हा एकदा शिगेला पोहोचला असून देशात मोठ्या प्रमाणावर हिंसाचार आणि जाळपोळीच्या घटना घडतायेत. मिळालेल्या माहितीनुसार, माजी पंतप्रधान शेख हसीना यांच्या अवामी लीग पक्षाने तारिक रहमान यांच्या सरकारविरोधात देशव्यापी आंदोलन करत लॉकडाउनची हाक दिली. या आंदोलनादरम्यान अवामी लीगच्या समर्थकांनी आणि विद्यार्थी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी रस्त्यांवर झाडे पाडून आणि टायर जाळून ढाका-खुलना महामार्गासह अनेक प्रमुख मार्ग रोखून धरले.
राजधानी ढाका येथे अनेक ठिकाणी देशी बॉम्बचे स्फोट झाले असून, मंगळवारी रात्री तुंगीपारा येथे पोलीस ठाणे, पोलिसांचे वाहन आणि बीएनपी खासदार एस. एम. जिलानी यांच्या घरावर हल्ला करण्यात आला. याशिवाय, चितगाव येथील माजी अंतरिम पंतप्रधान मोहम्मद युनूस यांच्या वडिलोपार्जित घराला आणि ग्रामीण बँकेच्या शाखांनाही आग लावण्यात आली.
दुसरीकडे, पंतप्रधान तारिक रहमान यांच्या बीएनपी पक्षाच्या कार्यकर्त्यांनीही अवामी लीगच्या दोन नेत्यांच्या घरांवर हल्ले करुन जाळपोळ केल्याचे समोर आले. नरेल, फरीदपूर आणि पिरोजपूर येथे झालेल्या संघर्षात बीएनपीचे तीन नेते आणि एका बस कर्मचाऱ्याचा मृत्यू झाला. देशातील 28 जिल्ह्यांमध्ये गाड्यांची जाळपोळ आणि हिंसाचार उसळल्याने परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी ढाकासह संवेदनशील भागांत लष्कर आणि बॉर्डर गार्ड बांगलादेश तैनात करण्यात आले.
गेल्या वर्षी 19 नोव्हेंबर रोजीच शेख हसीना यांना मानवतेविरुद्धच्या गुन्ह्यांखाली फाशीची शिक्षा सुनावण्यात आली. 5 ऑगस्ट 2024 रोजी झालेल्या विद्यार्थी आंदोलनानंतर सत्ता गमावलेल्या हसीना यांनी भारतात आश्रय घेतला. बांगलादेश सरकारकडून त्यांच्या प्रत्यार्पणाची मागणी होत असली, तरी सुरक्षेच्या हमीशिवाय त्यांना पाठवण्यास भारत तयार नसल्याचे सांगितले जात आहे. दरम्यान, अवामी लीगला राजकारणात पुन्हा सक्रिय होऊ न देण्यासाठी सर्व लोकशाही पक्षांनी एकत्र यावे, असे आवाहन पंतप्रधान तारिक रहमान यांनी केले.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.