

Bangladesh Hindu Violence: बांगलादेशात सत्तापालट झाल्यानंतर सुरु झालेला हिंदूंच्या विरोधातील हिंसाचाराचा वणवा विझण्याचे नाव घेत नाहीये. कट्टरपंथीयांकडून हिंदूंना लक्ष्य करुन त्यांच्या हत्या करणे, घरांची जाळपोळ करणे आणि त्यांच्या मालमत्तेचे नुकसान करण्याचे सत्र सातत्याने सुरु आहे. दुर्दैवाची गोष्ट म्हणजे, बांगलादेशातील अंतरिम सरकारचे प्रमुख मोहम्मद युनूस या गंभीर परिस्थितीकडे दुर्लक्ष करत असल्याचे चित्र निर्माण झाले आहे.
अलीकडेच सिल्हट जिल्ह्यातील गोवाईघाट येथील नंदिरगाव संघाच्या बहोर गावात एक हृदयद्रावक घटना समोर आली. येथे एका हिंदू कुटुंबाच्या घरावर इस्लामिक कट्टरपंथीयांनी हल्ला करुन त्यांचे घर पेटवून दिले. बीरेंद्र कुमार डे असे या पीडित कुटुंबाच्या प्रमुखाचे नाव असून त्यांच्या घराला आग लावल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर (Social Media) मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाला आहे. या व्हिडिओमध्ये आगीच्या ज्वाळा संपूर्ण घरात वेगाने पसरताना दिसत असून कुटुंबातील सदस्य जीव वाचवण्यासाठी धावाधाव करताना दिसून येत आहेत. या आगीत बीरेंद्र कुमार डे यांचे संपूर्ण घर जळून खाक झाले.
बांगलादेशातील (Bangladesh) अल्पसंख्याकांच्या या दयनीय स्थितीवर 'ह्यूमन राइट्स काँग्रेस फॉर बांगलादेश माइनॉरिटीज' (HRCBM) या संस्थेने सविस्तर प्रकाश टाकला. या जागतिक मानवाधिकार संघटनेने गेल्या सात महिन्यांत झालेल्या हिंसाचाराचे धक्कादायक दस्तऐवजीकरण केले.
HRCBM च्या अहवालानुसार, बांगलादेशातील हिंदू आणि इतर अल्पसंख्याकांवर होणारा हा हिंसाचार ही काही सुटी किंवा तुरळक घटना नसून तो एक सुनियोजित आणि पद्धतशीरपणे आखलेला देशव्यापी पॅटर्न आहे. 6 जून 2025 ते 5 जानेवारी 2026 या काळात बांगलादेशातील सर्व 8 विभाग आणि किमान 45 जिल्ह्यांमध्ये 116 अल्पसंख्याकांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये जमावाकडून ठेचून मारणे (लिंचिंग), थेट हत्या आणि संशयास्पद मृत्यूच्या घटनांचा समावेश आहे. हा आकडा केवळ मृत्यूंचा असून जखमी आणि विस्थापित झालेल्या हिंदूंची संख्या यापेक्षा कितीतरी मोठी आहे. ही आकडेवारी स्पष्टपणे दर्शवते की, बांगलादेशात अल्पसंख्याकांचे अस्तित्व धोक्यात आले असून त्यांच्या विरोधात सुरु असलेली मोहीम अत्यंत संघटित पद्धतीने राबवली जात आहे.
या गंभीर परिस्थितीची दखल आता आंतरराष्ट्रीय स्तरावरही घेतली जात आहे. ब्रिटनच्या खासदार आणि परराष्ट्र, कॉमनवेल्थ व विकास प्रकरणांच्या शॅडो सेक्रेटरी ऑफ स्टेट प्रीति पटेल यांनी बांगलादेशातील हिंदूंना लक्ष्य केले जात असल्याबद्दल तीव्र संताप व्यक्त केला आहे. त्यांनी ब्रिटन सरकारला आवाहन केले की, ब्रिटनने आपल्या आंतरराष्ट्रीय प्रभावाचा वापर करुन बांगलादेशात स्थिरता आणण्यासाठी तातडीने हस्तक्षेप करावा.
बांगलादेशात धार्मिक स्वातंत्र्य सुरक्षित राहावे आणि विशेषतः हिंदूंना सन्मानाने आणि सुरक्षितपणे जगता यावे, यासाठी जागतिक समुदायाने मोहम्मद युनूस सरकारवर दबाव आणण्याची गरज असल्याचे पटेल यांनी ठामपणे मांडले आहे. जागतिक स्तरावर अशा प्रतिक्रिया उमटूनही बांगलादेशातील अंतरिम सरकार कट्टरपंथीयांना रोखण्यात अपयशी ठरत असल्याचे दिसत आहे, ज्यामुळे स्थानिक हिंदू समुदायामध्ये दहशतीचे वातावरण आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.