पणजी: सत्ताधारी भाजप सरकारच्या प्रभावाखाली मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार काम करीत आहेत. त्यांच्यामुळे निवडणूक प्रक्रियेत मोठ्या प्रमाणावर अनियमितता आली आहे, नागरिकांच्या घटनात्मक मतदानाच्या अधिकाराला त्यामुळे धक्का बसला आहे.
निवडणूक प्रक्रियेत आणि मतदार याद्यांमध्ये जो घोळ झाला आहे, त्याला कुमार हे जबाबदार असून, त्यांनी राजीनामा दिला पाहिजे, अशी मागणी अखिल भारतीय काँग्रेसच्या निरीक्षक यशोमती ठाकूर यांनी शुक्रवारी केली. काँग्रेस भवनात झालेल्या पत्रकार परिषदेत ठाकूर बोलत होत्या. याप्रसंगी प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर, सुनील कवठणकर यांची उपस्थिती होती.
ठाकूर म्हणाल्या की, मतदार याद्यांमधून नावे वगळणे किंवा समाविष्ट करण्याच्या प्रकारांमुळे नागरिकांच्या घटनात्मक मतदानाच्या अधिकाराला धक्का बसला आहे. यावरून निवडणूक आयोगाच्या स्वायत्ततेवर आणि उत्तरदायित्वावर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहेत. दरम्यान, महाराष्ट्रात गेल्या पाच वर्षांत ३२ लाख मतदार वाढले, तर लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांदरम्यान अवघ्या सहा महिन्यांत ३९ लाख मतदारांची भर कशी पडली, असा सवाल ठाकूर यांनी उपस्थित केला.
विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी केलेल्या आरोपांचा संदर्भ देत, ठाकूर यांनी कर्नाटकच्या महादेवपुरा मतदारसंघातील दुबार मतदारांचा मुद्दा आणि महाराष्ट्र, हरियाणा, आलंद (कर्नाटक) व पश्चिम बंगालमधील मतदार याद्यांमधील अनियमिततेचा उल्लेख केला. मतदार यादीत नाव नोंदवण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या ‘फॉर्म ६’मध्ये काही बदल करण्यात आले होते, जे नंतर दुरुस्त करावे लागले. यावरून निवडणूक प्रक्रियेत अनियमितता असल्याचे दिसून येते, असे ठाकूर म्हणाल्या.
‘व्होट बचाव’ मोहीम तीव्र
ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याची मागणी करत ठाकूर यांनी निवडणूक प्रक्रिया धोक्यात आणली जात असल्याचा आरोप केला. भाजप आणि संघ लोकशाही संस्थांवर ताबा मिळवण्याचा प्रयत्न करत आहे. काँग्रेस गोव्यात जिल्हा, बूथ आणि घराघरांतून ‘व्होट बचाव, देश बचाव’ मोहीम तीव्र करणार आहे, असे यशोमती ठाकूर यांनी सांगितले.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.