सोशल मीडियावर एका खाजगी बँकेतील महिला कर्मचारी आणि सीआरपीएफ सैनिक यांच्यातील संभाषणाचा एक व्हिडिओ व ऑडिओ क्लिप चांगलाच व्हायरल झाला आहे. या क्लिपमध्ये त्या महिलेनं सैनिकाशी अतिशय असभ्य आणि अपमानास्पद शब्दांत बोलल्याचं ऐकायला मिळालं.
हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर संतप्त नागरिकांनी मोठ्या प्रमाणावर प्रतिक्रिया व्यक्त करत संबंधित महिलेवर कारवाई करण्याची मागणी केली. अनेकांनी ती महिला एचडीएफसी बँकेची कर्मचारी असल्याचा दावा केला.
मात्र, यावर आता एचडीएफसी बँकेनं अधिकृत निवेदन जारी करत स्पष्ट केलं आहे की, व्हायरल क्लिपमधील महिला बँकेची कर्मचारी नाही.
सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘एक्स’ (माजी ट्विटर) वरून एचडीएफसी बँकेनं ट्विट करून म्हटलं आहे, "हे निवेदन सोशल आणि ऑनलाइन मीडियावर फिरणाऱ्या ऑडिओ क्लिपच्या संदर्भात आहे. या क्लिपमध्ये एक महिला सीआरपीएफ सैनिकाशी असभ्य बोलत असल्याचं ऐकू येतं. अनेक पोस्टमध्ये तिला एचडीएफसी बँकेची कर्मचारी म्हणून चुकीचं ओळखलं जात आहे. आम्ही स्पष्ट करू इच्छितो की ही व्यक्ती आमच्या बँकेशी कुठल्याही प्रकारे संबंधित नाही."
व्हायरल झालेल्या या संभाषणात त्या महिलेनं सैनिकाला उद्देशून अत्यंत आक्षेपार्ह वक्तव्यं केली. तुम्ही अशिक्षित आहात, म्हणूनच तुम्हाला सीमेवर पाठवलं आहे. जर तुम्ही शिक्षित असता, तर तुम्ही एका प्रतिष्ठित संस्थेत काम करत असता. तुम्ही दुसऱ्याचा वाटा खाऊ नये; ते पचणार नाही, म्हणूनच तुमची मुलं अपंग जन्माला येतात.
मी देखील एका लष्करी कुटुंबातून आहे. जर तुम्ही चांगल्या कुटुंबातून असता तर तुम्ही १५-१६ लाखाचं कर्ज घेतलं नसतं. तुम्ही कर्जावर जगत आहात आणि तरीही सल्ला देत आहात. मी तुमच्या वडिलांची नोकर आहे का? तुम्हाला जे करायचं आहे ते करा, मला बर्बाद करण्याचा प्रयत्न करा. ही वक्तव्यं ऐकल्यानंतर सोशल मीडियावर नागरिकांनी तीव्र संताप व्यक्त केला.
सोशल मीडियावर हजारो वापरकर्त्यांनी या महिलेला लक्ष्य करत तिच्यावर कठोर कारवाई व्हावी अशी मागणी केली. काहींनी हे वर्तन “राष्ट्रविरोधी” असल्याचं सांगत भारतीय सशस्त्र दलांच्या प्रतिष्ठेवर आघात करणारे वक्तव्य असल्याचं म्हटलं. एक वापरकर्ता म्हणाला, "बँकेने या कर्मचाऱ्याला तात्काळ बडतर्फ करायला हवं.
व्हायरल क्लिपमुळे मोठं वादळ उठल्यानंतर आणि सोशल मीडियावरून प्रचंड टीका झाल्यानंतर अखेर त्या महिलेनं सैनिकाची माफी मागितली आहे. मात्र तिच्या वक्तव्यामुळे संतापाची लाट उसळली असून लोक अजूनही तिच्यावर कारवाईची मागणी करत आहेत.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.