नवी दिल्ली: भारताची क्रीडाभूमी नवनवीन हिरे देशाला देत असते, त्यातीलच एक लख्ख चमकणारा तारा म्हणजे बिहारचा वैभव सूर्यवंशी. आपल्या फलंदाजीने प्रतिस्पर्धी गोलंदाजांच्या नाकी नऊ आणणाऱ्या वैभवच्या शिरपेचात आता मानाचा तुरा रोवला गेला आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मु यांच्या हस्ते वैभवला 'प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कारा'ने (PMRBP) गौरवण्यात आले आहे. राष्ट्रपती भवनात आयोजित एका दिमाखदार सोहळ्यात वैभवला हा सन्मान प्रदान करण्यात आला.
प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कार हा ५ ते १८ वर्षे वयोगटातील मुलांच्या असाधारण कामगिरीसाठी दिला जाणारा सर्वोच्च सन्मान आहे. शौर्य, कला आणि संस्कृती, पर्यावरण, नाविन्यपूर्ण शोध, विज्ञान आणि तंत्रज्ञान, समाजसेवा आणि क्रीडा अशा एकूण सात श्रेणींमध्ये ज्या मुलांनी राष्ट्रीय स्तरावर उत्कृष्ट कामगिरी केली आहे, त्यांची या पुरस्कारासाठी निवड केली जाते.
पुरस्काराचे स्वरूप म्हणून प्रत्येक विजेत्याला एक पदक, प्रमाणपत्र आणि सन्मान पुस्तिका देऊन गौरवण्यात येते. वैभवने क्रीडा क्षेत्रातील आपली विशेष छाप सोडल्यामुळे त्याची या प्रतिष्ठित पुरस्कारासाठी निवड झाली आहे.
वैभव सूर्यवंशीने नुकत्याच झालेल्या विजय हजारे ट्रॉफीच्या पहिल्या सामन्यात १९० धावांची धडाकेबाज खेळी करत सर्वांचे लक्ष वेधून घेतले होते. मात्र, दिल्लीत होणाऱ्या या पुरस्कार सोहळ्याला उपस्थित राहणे अनिवार्य असल्याने त्याला दुसऱ्या फेरीतील सामन्यांना मुकावे लागले.
शुक्रवारी मणिपूरविरुद्धच्या सामन्यात तो मैदानात दिसला नाही. त्याचे प्रशिक्षक मनीष ओझा यांनी माहिती दिली की, पुरस्कार स्वीकारण्यासाठी वैभवला पहाटे ७ वाजता दिल्लीत रिपोर्ट करणे आवश्यक होते, त्यामुळे तो सध्या प्लेइंग इलेव्हनचा भाग नाही.
वैभव आता विजय हजारे ट्रॉफीचे पुढील सामने खेळणार नाही. पुरस्कार सोहळा आटोपल्यानंतर तो थेट भारतीय अंडर-१९ संघातील आपल्या सहकाऱ्यांशी जोडला जाईल. आगामी १५ जानेवारीपासून सुरू होणाऱ्या अंडर-१९ विश्वचषकासाठी भारतीय संघ झिम्बाब्वेला रवाना होणार असून वैभव या संघाचा महत्त्वाचा कणा असणार आहे. देशासाठी विश्वचषक जिंकणे हेच आता या बाल पुरस्कार विजेत्याचे पुढील स्वप्न आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.