Meerut Terrorist Uzaid Whatsapp Chat Leak: मेरठमध्ये अटक करण्यात आलेल्या संशयित दहशतवादी उजैदचे व्हॉट्सॲप चॅट सध्या सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत असून, त्यातून मोठा घातपात करण्याचा कट उघड झाला. पाकिस्तानी हँडलर शहजाद भट्टी याच्याशी संबंधित या प्रकरणात '005 ब्रिगेड ग्रुप' नावाच्या व्हॉट्सॲप ग्रुपवरील संभाषण समोर आले. यामध्ये उजैद काश्मीरमधील कमांडर साजिद याच्याशी संवाद साधत असून, लष्कराच्या चौकीवर बॉम्ब हल्ला करण्याचा कट रचला जात असल्याचे दिसून येते.
या संभाषणात साजिद आधी उजैदसोबत लक्ष्य भेदण्याबाबत बोलतो. त्यानंतर उजैद योजनेबद्दल विचारणा करतो आणि साजिद लष्करी चौकीवर बॉम्बद्वारे हल्ला करायचा असल्याचे स्पष्ट करतो. यावर उजैद हल्ल्यासाठी पूर्णपणे तयार असल्याचे सांगतो आणि संपूर्ण चौकी उडवून देण्याचा उल्लेख करतो. साजिदने बॉम्ब जॅकेटबाबत विचारले असता, असे जॅकेट आपण घरीच तयार करु शकतो, असे उजैद आत्मविश्वासाने सांगतो. पोलिसांच्या माहितीनुसार, या व्हॉट्सॲप ग्रुपमध्ये केवळ पाच सदस्य होते.
पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, हे संभाषण नोव्हेंबर 2025 मधील आहे. त्या काळात काश्मीरमध्ये अटक झालेल्या साजिदकडे लष्कराचा ताफा किंवा चौकी लक्ष्य करण्याचे काम सोपवण्यात आले होते. त्यासाठी त्याने काही मानवी बॉम्ब तयार केले होते, ज्यामध्ये उजैदचाही समावेश होता. उजैदला यापूर्वी ऑनलाइन माध्यमातून मानवी बॉम्ब बनण्याचे प्रशिक्षण देण्यात आल्याची माहिती समोर आली. नोव्हेंबर 2025 मध्येच हा हल्ला करण्याचा बेत होता, मात्र वेळेवर पोलिस आणि लष्करी गुप्तचर यंत्रणेने साजिदला ताब्यात घेतले.
साजिदच्या चौकशीत आणि त्याच्या मोबाईलची तपासणी केल्यानंतर संपूर्ण जाळे उघड झाले. काश्मीर पोलिसांनी मेरठ (Meerut) पोलिसांना उजैदची माहिती दिली, परंतु तो आधीच भूमिगत झाला होता. अखेर सुमारे दहा महिन्यांनंतर ठिकाणाची माहिती मिळताच पोलिसांनी त्याला अटक केली.
मेरठचे एसएसपी बीबीजीटीएस मूर्ती यांच्या माहितीनुसार, उजैद 'ट्यूशन-40' आणि 'अल-मुजाहिद' यांसारख्या इतर व्हॉट्सॲप ग्रुपशीही जोडलेला होता. काश्मीर, पाकव्याप्त काश्मीर आणि पाकिस्तानमधील हँडलर्स हे ग्रुप्स चालवत होते. बॉम्ब बनवण्यापासून ते हल्ल्याच्या कृतीपर्यंतचे सर्व प्रशिक्षण आणि सूचना याच ग्रुपवरुन ऑनलाइन दिल्या जात होत्या.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.