Shubman Gill Record: भारतीय संघाचा युवा कर्णधार शुभमन गिलने जेव्हापासून कसोटी संघाचे नेतृत्व स्वीकारले आहे, तेव्हापासून त्याच्या फलंदाजीला नवी धार आली आहे. वेस्ट इंडीजविरुद्ध सुरु असलेल्या घरच्या कसोटी मालिकेतील पहिल्या सामन्यात गिलला मोठी धावसंख्या उभारता आली नसली तरी, यापूर्वी त्याने इंग्लंडविरुद्धच्या मालिकेत मोठी कामगिरी केली होती आणि अनेक विक्रम मोडीत काढले होते.
आता गिल पुढील सामन्याची तयारी करत आहे, जिथे त्याला एक नवीन मोठा विक्रम करण्याची संधी मिळणार आहे. हा विक्रम महान फलंदाज डॉन ब्रॅडमन (Don Bradman) यांच्याशी संबंधित आहे. गिल ब्रॅडमन यांचा विक्रम मोडू शकणार नाही, पण ब्रॅडमननंतर सर्वात जलद 1000 कसोटी धावा करणारा दुसरा कर्णधार बनू शकतो.
जगातील महान फलंदाजांमध्ये गणना होणारे सर डॉन ब्रॅडमन यांनी आपल्या संघाचा कर्णधार झाल्यावर सर्वात कमी डावांमध्ये 1000 धावा करण्याचा विक्रम केला होता. ब्रॅडमन यांनी केवळ 11 कसोटी डावांमध्येच हा पराक्रम करुन दाखवला होता, जो आजपर्यंत कोणीही मोडू शकलेला नाही. हा विक्रम मोडणे जवळपास अशक्य मानले जाते. शुभमन गिल हा विक्रम मोडू शकणार नसला तरी, ब्रॅडमननंतर सर्वात जलद 1000 कसोटी धावा करणारा दुसरा कर्णधार बनण्याची मोठी संधी त्याच्याकडे आहे.
शुभमन गिलने कसोटी कर्णधार म्हणून आपल्या पहिल्या दहा कसोटी डावांमध्ये 754 धावा केल्या होत्या. यानंतर वेस्ट इंडीजविरुद्ध मायदेशात खेळलेल्या पहिल्या कसोटी सामन्यात त्याने 50 धावा जोडल्या, म्हणजेच आतापर्यंत त्याच्या नावावर एकूण 805 धावा जमा झाल्या आहेत.
1000 धावांचा टप्पा पूर्ण करण्यासाठी गिलला आता फक्त 196 धावांची गरज आहे.
वेस्ट इंडीजविरुद्धच्या कसोटी मालिकेतील दुसरा सामना दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियमवर होणार आहे.
या मैदानाची खेळपट्टी फलंदाजांसाठी मदतगार ठरु शकते, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. त्यामुळे गिलच्या बॅटमधून एक मोठी खेळी अपेक्षित आहे.
विशेष म्हणजे, गिलला गेल्या सामन्यातील दुसऱ्या डावात फलंदाजीची संधी मिळाली नव्हती.
गिल जर वेस्ट इंडीजविरुद्धच्या दुसऱ्या कसोटीत 196 धावा करु शकला, तर तो फक्त 12 डावांमध्ये 1000 धावा पूर्ण करेल आणि या टप्प्यावर पोहोचणारा डॉन ब्रॅडमननंतरचा सर्वात जलद कर्णधार ठरेल. यासोबतच, सर्वात जलद 1000 कसोटी धावा पूर्ण करणारा भारतीय कर्णधार बनण्याचा विक्रमही तो आपल्या नावावर करु शकतो.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.