
Team India Record: भारत आणि वेस्ट इंडीज यांच्यातील दोन सामन्यांची कसोटी मालिका सध्या सुरु आहे. अहमदाबाद येथे झालेला पहिला सामना भारतीय संघाने एक डाव आणि 140 धावांनी जिंकून मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली. आता मालिकेतील दुसरा आणि अंतिम कसोटी सामना 10 ऑक्टोबरपासून दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियमवर खेळला जाणार आहे. या पार्श्वभूमीवर, दिल्लीच्या या ऐतिहासिक मैदानावरील कसोटी क्रिकेटमधील भारतीय संघाच्या कामगिरीचा आढावा घेणे महत्त्वाचे ठरते. भारताचा या मैदानावरचा रेकॉर्ड शानदार आहे.
भारतीय संघाने (Team India) अरुण जेटली स्टेडियमवर आतापर्यंत एकूण 35 कसोटी सामने खेळले आहेत. यातील आकडेवारी भारतासाठी खूपच दिलासादायक आहे. भारताने एकूण 14 सामने जिंकले आहेत. 15 सामने अनिर्णित राहिले आहेत. तर टीम इंडियाला या मैदानात केवळ 6 सामन्यांमध्ये पराभवाचा सामना करावा लागला आहे. या मैदानावरील भारताचा शेवटचा पराभव 38 वर्षांपूर्वी 1987 मध्ये झाला होता. विशेष म्हणजे, त्यावेळीही वेस्ट इंडीज संघानेच भारताला पराभूत केले होते. त्या सामन्यात कॅरेबियन संघाने भारताने दिलेले 276 धावांचे लक्ष्य अगदी सहज पार केले होते.
टीम इंडियाने अरुण जेटली स्टेडियमवर शेवटचा कसोटी सामना 2023 मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळला होता. ऑस्ट्रेलियाने टॉस जिंकून पहिल्यांदा फलंदाजी करताना पहिल्या डावात 263 धावा केल्या होत्या. याला उत्तर देताना भारताने पहिल्या डावात 262 धावा केल्या. दुसऱ्या डावात ऑस्ट्रेलियाचा संघ केवळ 133 धावांवर ऑल आऊट झाला. भारताने 115 धावांचे लक्ष्य 6 विकेट्स राखून सहज गाठले.
या ऐतिहासिक स्टेडियमवर सर्वाधिक धावा करणारे आणि सर्वाधिक विकेट्स घेणारे भारतीय खेळाडू आजही आठवले जातात.
सर्वाधिक विकेट्स (Most Wickets): भारताचे माजी महान फिरकीपटू अनिल कुंबळेच्या नावावर या मैदानावर सर्वाधिक विकेट्स घेण्याचा रेकॉर्ड आहे. त्याने 7 सामन्यांत एकूण 58 विकेट्स घेतल्या आहेत. यात त्याने दोनदा '10 विकेट्स हॉल' (एका सामन्यात 10 बळी) आणि चार वेळा '5 विकेट्स हॉल' (एका डावात 5 बळी) घेण्याची अविश्वसनीय कामगिरी केली आहे.
सर्वाधिक धावा (Most Runs): 'क्रिकेटचा देव' म्हणून ओळखले जाणारा सचिन तेंडुलकर यांनी या मैदानात सर्वाधिक धावा केल्या आहेत. तेंडुलकरने 10 सामन्यांतील 19 डावांमध्ये 759 धावा केल्या आहेत. यात त्याच्या नावावर 2 शतके आणि 4 अर्धशतके आहेत.
दिल्लीच्या अरुण जेटली स्टेडियमवर भारताचा (India) रेकॉर्ड पाहता, वेस्ट इंडीजविरुद्धच्या दुसऱ्या कसोटीतही टीम इंडिया मालिका 2-0 ने जिंकण्यास प्रबळ दावेदार मानली जात आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.