भारतीय क्रिकेट संघाला अनेक ऐतिहासिक विजय मिळवून देणारा कर्णधार रोहित शर्मा याने आपल्या कारकिर्दीतील एका अत्यंत कठीण टप्प्याबद्दल प्रथमच मौन सोडले आहे. २०२३ च्या एकदिवसीय विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियाकडून झालेल्या पराभवानंतर तो इतका खचला होता की, त्याने क्रिकेट सोडण्याचा निर्णय घेतला होता. या खुलाशामुळे क्रिकेट विश्वात आणि चाहत्यांमध्ये मोठी खळबळ माजली आहे.
गुरुग्राम येथे आयोजित एका विशेष कार्यक्रमात रोहितने आपल्या मनातील खदखद व्यक्त केली. तो म्हणाला की, "अहमदाबादच्या त्या फायनलमधील पराभवानंतर मला असे वाटले की क्रिकेटने माझे सर्व काही हिरावून घेतले आहे. माझ्यात पुढे खेळण्याची कोणतीही ऊर्जा शिल्लक नव्हती. तो पराभव पचवणे माझ्यासाठी अशक्य झाले होते." रोहितच्या नेतृत्वाखाली भारताने सलग १० सामने जिंकून फायनल गाठली होती, मात्र शेवटच्या क्षणी विजेतेपद हुकल्याने रोहित पूर्णपणे कोलमडून गेला होता.
रोहितने सांगितले की, हे केवळ एका स्पर्धेचे अपयश नव्हते, तर गेल्या दोन वर्षांच्या मेहनतीचे ते फळ होते. २०२२ मध्ये पूर्णवेळ कर्णधारपद स्वीकारल्यापासून रोहितचे एकमेव ध्येय एकदिवसीय विश्वचषक जिंकणे हेच होते. त्याने स्वतःला या ध्येयासाठी पूर्णपणे झोकून दिले होते. "जेव्हा तुम्ही एखाद्या गोष्टीसाठी तुमचे सर्वस्व पणाला लावता आणि ती गोष्ट अगदी जवळ येऊन निसटते, तेव्हा होणाऱ्या वेदना शब्दांत मांडता येत नाहीत. त्या काळात मला स्वतःला सावरण्यासाठी अनेक महिने लागले," असे रोहितने भावूक होत सांगितले.
निराशेच्या गर्तेतून बाहेर पडण्यासाठी रोहितला स्वतःशीच मोठा संघर्ष करावा लागला. क्रिकेटवर असलेले प्रेम आणि देशासाठी खेळण्याची जिद्द यामुळे त्याने पुन्हा एकदा बॅट हातात घेतली. २०२४ च्या टी-२० विश्वचषकातील विजयाने त्याच्या जखमांवर थोड्या प्रमाणात मलम लावले आहे. रोहितने आता टी-२० आणि कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेतली असली, तरी त्याचे लक्ष आता २०२७ च्या एकदिवसीय विश्वचषकावर आहे. आपल्या कारकिर्दीचा शेवट एका मोठ्या जेतेपदाने करण्याची त्याची इच्छा आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.