Rohit Sharma Wada Pav Comment : तब्बल सात वर्षांच्या प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर भारतीय क्रिकेटचा 'हिटमॅन' म्हणजेच रोहित शर्मा विजय हजारे ट्रॉफीच्या निमित्ताने घरगुती क्रिकेटच्या मैदानात उतरला. जयपूरच्या सवाई मानसिंह स्टेडियमवर सिक्कीम विरुद्धच्या सामन्यात रोहितने केवळ आपल्या बॅटनेच नाही, तर आपल्या हजरजबाबीपणानेही चाहत्यांना वेड लावले. मुंबईच्या या वाघाने मैदानात १५५ धावांची तुफानी खेळी साकारली, पण चर्चा रंगली ती बाउंड्री लाईनवर घडलेल्या एका मजेशीर किस्साची.
सिक्किम विरुद्धच्या या सामन्यात रोहित शर्मा जुन्या फॉर्ममध्ये परतलेला दिसला. त्याने अवघ्या ९४ चेंडूंमध्ये १५५ धावा कुटत मुंबईला ८ गडी राखून दणदणीत विजय मिळवून दिला. जयपूरचे स्टेडियम खचाखच भरले होते. सुमारे २० हजारहून अधिक प्रेक्षक केवळ रोहितला खेळताना पाहण्यासाठी आले होते. सिक्कीम फलंदाजी करत असताना जेव्हा रोहित बाउंड्री जवळ क्षेत्ररक्षण करण्यासाठी आला, तेव्हा संपूर्ण स्टेडियम 'रोहित-रोहित' अशा जयघोषाने दुमदुमून गेले होते.
या उत्साही वातावरणात एका चाहत्याने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. मुंबईकरांचे वडापाववर असलेले प्रेम सर्वांनाच माहित आहे. हेच ओळखून त्या चाहत्याने रोहितला जोरात ओरडून विचारले, "रोहित भाई.. वडापाव खाणार का?" चाहत्याचा हा अनपेक्षित प्रश्न ऐकून रोहितलाही हसू आवरले नाही. त्याने अतिशय शांतपणे आणि खेळकर वृत्तीने हात हलवून 'नको' अशी खूण केली. 'हिटमॅन'चा हा साधेपणा पाहून स्टेडियममध्ये हास्याची लकेर उमटली. हा छोटासा पण मजेशीर क्षण सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे.
रोहित शर्मा आणि वडापाव यांचे कनेक्शन जुने आहे. मुंबईचा रहिवासी असल्याने रोहितला अनेकदा या लोकप्रिय खाद्यपदार्थाशी जोडून ट्रोल किंवा मस्करी केली जाते. रोहितनेही अनेक मुलाखतींमध्ये वडापाव आपल्याला आवडत असल्याचे कबूल केले आहे. मात्र, फिटनेस आणि मॅचच्या दरम्यान त्याने ज्या पद्धतीने चाहत्याला उत्तर दिले, त्यातून त्याचे चाहत्यांशी असलेले घट्ट नाते पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.