Delhi Mumbai Expressway Accident: राजस्थानातील कोटा येथील दिल्ली-मुंबई एक्सप्रेसवेवर शनिवारी (17 ऑक्टोबर) सकाळी एक अत्यंत भीषण अपघात घडला. 25 हून अधिक प्रवाशांना घेऊन जाणारी एक ट्रॅव्हलर मिनी बस पुलावरुन थेट 20 फूट खाली नाल्यामध्ये कोसळल्यामुळे झालेल्या या दुर्घटनेत 8 प्रवाशांचा मृत्यू झाला, तर 10 जण गंभीर जखमी झाले. या बसमधील सर्व प्रवासी मध्य प्रदेशमधील भोपाळ येथून प्रसिद्ध धार्मिक स्थळ असलेल्या खाटूश्यामजींच्या दर्शनासाठी निघाले होते, परंतु वाटेतच काळाने त्यांच्यावर घाला घातला.
मिळालेल्या माहितीनुसार, ट्रॅव्हलरने कराडिया टोल प्लाझा पार केल्यानंतर ती सुलतानपुरच्या दिशेने मार्गस्थ झाली होती. भरधाव वेगात असलेल्या बसच्या चालकाला अचानक डुलकी लागल्यामुळे वाहनावरील ताबा सुटला. बस वेगात असल्यामुळे ती रस्त्यावरील मजबूत सिमेंटचे डिव्हायडर तोडून थेट पुलाच्या मधोमध खाली सुमारे 20 फूट खोल नाल्यात कोसळली.
दरम्यान, या दुर्घटनेत ट्रॅव्हलरचा पुढील भाग पूर्णपणे चक्काचूर झाला असून, अपघाताचा (Accident) मोठा आवाज ऐकून आजूबाजूचे स्थानिक लोक आणि जाणारे-येणारे नागरिक तात्काळ मदतीसाठी धावले. स्थानिकांनी प्रसंगावधान दाखवत अनेक प्रवाशांना बाहेर काढले आणि तातडीने पोलिसांना व आपत्कालीन यंत्रणेला याची माहिती दिली. घटनेची माहिती मिळताच सिमलिया पोलीस ठाण्याचे पथक, एनएचएआयची रेस्क्यू टीम आणि 108 क्रमांकाच्या रुग्णवाहिका घटनास्थळी दाखल झाल्या.
बचाव पथकाने 20 फूट खोल नाल्यात अडकलेल्या ट्रॅव्हलरमधून प्रवाशांना बाहेर काढण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले. या दुर्घटनेत चार जणांचा मृत्यू झाला, तर गंभीर जखमी झालेल्या 4 जणांनी रुग्णालयात नेत असताना प्राण सोडले. सर्व जखमींना तात्काळ कोटा मेडिकल कॉलेजच्या नवीन रुग्णालयात आणि एमबीएस रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, काहींची प्रकृती अत्यंत चिंताजनक असल्याने मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.