T20 Cricket: गोव्यावर टी-२० क्रिकेटमध्ये नामुष्की, 6 पराभवांसह स्पर्धेच्या इतिहासातील सर्वांत खराब कामगिरी

Syed Mushtaq Ali Trophy: सय्यद मुश्ताक अली करंडक टी-२० क्रिकेट स्पर्धेच्या इतिहासात गोव्यावर सर्वांत खराब कामगिरीची नामुष्की यंदा पत्करावी लागली.
Syed Mushtaq Ali Trophy
T20 CricketDainik Gomantak
Published on: 
Updated on: 

पणजी: सय्यद मुश्ताक अली करंडक टी-२० क्रिकेट स्पर्धेच्या इतिहासात गोव्यावर सर्वांत खराब कामगिरीची नामुष्की यंदा पत्करावी लागली. संघ साफ अपयशी ठरल्यामुळे एलिट ड गटात सहा पराभव पत्करावे लागले, मात्र आसाम व मिझोराम या संघांना त्यांच्या गटात सर्व सातही सामन्यांत पराभूत व्हावे लागले, त्यामुळे प्लेट गटात जाण्यापासून गोव्याचा संघ थोडक्यात बचावला. एकंदरीत ३२ संघांच्या एलिट विभागात त्यांना रद्द सामन्यातील दोन गुणांसह ३०वा क्रमांक मिळाला.

एलिट ड गटातील अखेरच्या लढतीत गोव्याला गुजरातने ३२ धावांनी सहज नमविले. सामना गुरुवारी कोलकता येथील इडन गार्डन्सवर प्रकाशझोतात झाला. गुजरातने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना ५ बाद १९४ धावा केल्या. कर्णधार अभिनव तेजराणा (५८, ३२ चेंडू, ६ चौकार, ३ षटकार) याच्या अर्धशतकानंतर गोव्याला ९ बाद १६२ धावांचीच मजल मारता आली. गुजरातचा हा स्पर्धेतील दुसरा विजय ठरला. त्यांचे १० गुण झाले.

Syed Mushtaq Ali Trophy
Goa Screenwriters Lab: महिलांच्या कथांना मिळणार चित्रपटाचे रूप; गोव्यात ‘स्क्रिनरायटर्स लॅब’ सुरू होणार

शुभम तारीची गोलंदाजी महागडी

गुजरातविरुद्ध वेगवान शुभम तारी याची महागडी गोलंदाजी गोव्याच्या पराभवाचे एक कारण ठरली. गोव्याने गुजरातला १७ षटकांअखेरीस ४ बाद १४८ असे रोखले होते. दुसऱ्या स्पेलमध्ये गोलंदाजीस आलेल्या शुभमने डावातील १८व्या षटकात तब्बल २० धावा मोजल्या. १९व्या षटकात वासुकी कौशिक याने फक्त नऊ धावा दिल्यानंतर अखेरच्या विसाव्या षटकात शुभमने १७ धावा दिल्या. त्यामुळे गुजरातला आव्हानात्मक धावसंख्या उभारता आली. शुभमने या दोन षटकांत ३७ धावा, तर एकूण ३ षटकांत तब्बल ४४ धावा दिल्या.

सुयश प्रभुदेसाई सपशेल अपयशी

गोव्याचा हुकमी अनुभवी फलंदाज सुयश प्रभुदेसाई याचे स्पर्धेतील सपशेल अपयशही गोव्याच्या नामुष्कीत टोचणारे ठरले. यापूर्वी आयपीएल स्पर्धेत खेळलेल्या सुयशला टी-२० प्रकारात लौकिक अजिबात जपता आला नाही. यंदा सहा सामन्यांतील सहा डावात त्याने ११.०० या निराशाजनक सरासरीसह फक्त ६६ धावा नोंदविल्या. ओडिशाविरुद्ध केलेल्या २८ धावा त्याच्या यावेळच्या स्पर्धेतील सर्वोच्च ठरल्या. गुरुवारी गुजरातविरुद्ध संघाला आवश्यकता असताना सुयश आठ चेंडूंत फक्त चार धावा करून माघारी फिरली. केवळ टी-२० प्रकारातच नव्हे, तर यंदा रणजी स्पर्धेतही सुयशचा फलंदाजीत संघर्ष सुरू आहे. चार रणजी सामन्यांतील सात डावांत त्याने १४.८५ च्या सरासरीने १०४ धावा केल्या आहेत.

Syed Mushtaq Ali Trophy
Goa Politics: प्रत्येक कुटुंबाला दरमहा 15 हजारांचा लाभ! सत्तेत येताच मोफत वीज देण्याचे 'आप'चे आश्वासन

संक्षिप्त धावफलक

गुजरात : २० षटकांत ५ बाद १९४ (ऊर्विल पटेल ३८, आर्य देसाई ४७, उमंग कुमार २९, प्रियेश पटेल २३, आशुतोष शर्मा नाबाद ४८, फेलिक्स आलेमाव ३-०-३२-०, वासुकी कौशिक ४-०-३६-१, शुभम तारी ३-०-४४-१, दर्शन मिसाळ ४-०-२६-१, यश कसवणकर १-०-१०-०, ललित यादव ४-०-३४-२, दीपराज गावकर १-०-११-०) वि. वि. गोवा ः २० षटकांत ९ बाद १६२ (अझान थोटा ०, अभिनव तेजराणा ५८, ललित यादव ६, सुयश प्रभुदेसाई ४, यश कसवणकर ३१, दीपराज गावकर २, दर्शन मिसाळ २०, राजशेखर हरिकांत १५, शुभम तारी ०, फेलिक्स आलेमाव नाबाद ९, वासुकी कौशिक नाबाद ६, अरझान नागवासवाला ४-०-३१-२, जपज्ञ भट ४-०-३१-२, यश दोशी ४-०-३०-२, अमित देसाई ४-०-२७-२, रवी बिष्णोई ३-०-२३-१, आशुतोष शर्मा १-०-१२-०).

स्पर्धेत गोवा चौथ्यांदा विजयाविना

सय्यद मुश्ताक अली करंडक क्रिकेट स्पर्धेच्या इतिहासात चौथ्यांदा गोव्यावर मोसमात एकही सामना न जिंकण्याची पाळी आली. यापूर्वी, २०१४-१५, २०१६-१७ व २०१७-१८ मध्ये सर्व पाचही लढतीत पराभूत व्हावे लागले होते. यंदा विजयाविना राहताना सात सामन्यांत सहा पराभव व एक रद्द अशी कामगिरी नोंदीत झाली. गतमोसमात (२०२५-२६) गोव्याने सात लढतीत चार विजय व तीन पराभव नोंदविले होते. एलिट गटात प्रथमच गोव्याला टी-२० मोसमात सामना जिंकता आला नाही.

स्वप्नीलच्या मार्गदर्शनाखालील केरळ सुपर लीगमध्ये

गोव्याची सय्यद मुश्ताक अली करंडक टी-२० क्रिकेट स्पर्धेत दाणादाण उडालेली असताना, गोव्याचे माजी कर्णधार स्वप्नील अस्नोडकर मुख्य प्रशिक्षक असलेल्या केरळने चमकदार कामगिरीसह स्पर्धेची सुपर लीग फेरी गाठली. हा एकप्रकारे विरोधाभासच ठरला. केरळने एलिट क गटात पाच विजय व दोन पराभवांसह २० गुणांसह दुसरा क्रमांक मिळवून स्पर्धेतील पुढील फेरी निश्चित केली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.