Parvinder Singh Jhota Shot Dead Punjab: पंजाबमधील मानसा जिल्ह्यातून एक अत्यंत हादरवून टाकणारी घटना समोर आली. नशेविरुद्धच्या मोहिमेत अग्रेसर असणारे आणि अँटी ड्रग टास्क फोर्सचे प्रमुख, प्रसिद्ध समाजसेवक आणि माजी कबड्डीपटू परविंदर सिंह झोटा यांची मंगळवारी (13 ऑक्टोबर) सकाळी गोळ्या झाडून निर्घृण हत्या करण्यात आली.
मिळालेल्या माहितीनुसार, मानसा येथील एका मेडिकल स्टोरवर नशेविरोधात आवाज उठवण्यासाठी परविंदर सिंह गेले होते, जिथे स्टोर मालकाने त्यांच्यावर अगदी जवळून ताबडतोब गोळ्या झाडल्या. गोळीबार इतका भयानक होता की, गोळ्या त्यांच्या शरीराच्या आरपार गेल्या आणि उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. या घटनेचा एक धक्कादायक व्हिडिओ देखील समोर आला असून, यामध्ये मेडिकल स्टोरचा मालक गोळीबार करताना दिसत आहे.
परविंदर सिंह झोटा हे गेल्या अनेक वर्षांपासून मानसा परिसरात तरुणांना विळखा घालणाऱ्या नशेच्या अवैध व्यवसायाविरोधात तीव्र लढा देत होते. ते केवळ ड्रग्ज विकणाऱ्यांना रोखत नव्हते, तर अनेकदा पुढाकार घेऊन आरोपींना पकडण्याचाही प्रयत्न करत होते. या भूमिकेमुळे त्यांचे अनेक ठिकाणी वाद देखील झाले. तसेच, ते या भूमिकेमुळे स्थानिक तरुणांमध्ये कमी कालावधीत लोकप्रिय झाले. दरम्यान, परविंदर सिंह यांच्या या हत्येमुळे पंजाबच्या (Punjab) वर्तुळात मोठी खळबळ उडाली असून, समाजसेवकांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला. पोलीस या प्रकरणाचा सखोल तपास करत असून आरोपीचा शोध घेतला जात आहे.
परविंदर सिंह यांच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल आणि वादाबद्दल सांगायचे तर, ते स्वतः एक उत्तम कबड्डीपटू होते, परंतु त्यांचे नाव काही वादांमध्येही आले. त्यांच्यावर शस्त्र कायद्यासह विविध कलमांखाली गुन्हे दाखल झाले आणि ते काही काळ तुरुंगातही राहिले. 2023 मध्ये त्यांचे एक प्रकरण खूप चर्चेत आले, ज्यामध्ये त्यांनी साथीदारांसोबत एका मेडिकल स्टोरवर धाड टाकून प्रतिबंधित औषधे विकल्याचा आरोप करत स्टोर बंद केले.
या प्रकरणी त्यांच्यावरही गुन्हा दाखल झाला. याशिवाय 2009 मध्येही त्यांच्यावर हत्येच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल झाल्याचे वृत्त समोर आले. अनेक कायदेशीर वादात अडकलेले असले तरी, नशेविरोधात त्यांनी उचललेले पाऊल अखेर त्यांच्या जीवावर बेतल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.