National Doctors Day 2025 India: भारतात दरवर्षी 1 जुलै रोजी 'राष्ट्रीय डॉक्टर दिन' साजरा केला जातो. हा दिवस डॉक्टरांच्या अथक प्रयत्नांचा आणि निस्वार्थ समर्पणाचा सन्मान करण्यासाठी साजरा केला जातो. वैद्यकीय व्यवसाय हा एक उदात्त व्यवसाय म्हणून ओळखला जातो. हा दिवस केवळ डॉक्टरांच्या कठोर परिश्रमाचा सन्मान करत नाहीतर आरोग्यसेवा क्षेत्रातील आव्हाने आणि प्रगती यावर चर्चा करण्यासाठी एक व्यासपीठ देखील प्रदान करतो. यंदाच्या (2025) राष्ट्रीय डॉक्टर दिनाची थीम 'Behind the Mask: Who Heals the Healers?' ही आहे. चला तर मग या दिवसाचा इतिहास, महत्त्व आणि का साजरा केला जातो याबद्दल जाणून घेऊया...
दरम्यान, या थीमचा अर्थ असा आहे की जे डॉक्टर रुग्णांना बरे करण्यात व्यस्त असतात, ते अनेकदा स्वतःच्या आरोग्याकडे (Health) दुर्लक्ष करतात. थीममध्ये डॉक्टरांना भावनिक आणि मानसिक आधाराची देखील आवश्यकता असते यावर भर दिला आहे. ही थीम समाज, आरोग्य व्यवस्था आणि स्वतः डॉक्टरांना प्रश्न विचारते की, जे इतरांना बरे करतात त्यांना कोण बरे करेल? डॉक्टरांच्या मानसिक आरोग्यासाठी तसेच कल्याणासाठी जागरुकता निर्माण करणे आणि आवश्यक ते समर्थन प्रदान करणे हा थीमचा उद्देश आहे.
राष्ट्रीय डॉक्टर दिनाची सुरुवात भारत (India) सरकारने 1991 मध्ये केली. हा दिवस प्रख्यात दूरदर्शी डॉक्टर आणि पश्चिम बंगालचे माजी मुख्यमंत्री डॉ. बिधान चंद्र रॉय यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी समर्पित आहे. डॉ. रॉय यांचा जन्म आणि मृत्यू 1 जुलै (1882-1962) रोजीच झाला होता. इंडियन मेडिकल कॉन्सिल (आयएमए) आणि अनेक वैद्यकीय महाविद्यालयांच्या स्थापनेत त्यांनी महत्त्वाचे योगदान दिले. 1961 मध्ये त्यांना 'भारतरत्न' देण्यात आला. त्यांच्या जन्मदिवस आणि पुण्यतिथीच्या स्मरणार्थ 1 जुलै हा दिवस निवडण्यात आला, ज्यामुळे वैद्यकीय आणि सार्वजनिक आरोग्यातील त्यांच्या योगदानाचे महत्त्व अधोरेखित झाले.
राष्ट्रीय डॉक्टर दिन हा डॉक्टरांच्या निःस्वार्थ सेवेचा सन्मान करण्याचा दिवस आहे. हा दिवस समाजाला आठवण करुन देतो की, डॉक्टर नेहमीच तटस्थपणे रुग्णांवर उपचार करतात. विशेषतः कोरोनासारख्या संकटात, डॉक्टरांनी स्वतःचा जीव धोक्यात घालून लाखो लोकांचा जीव वाचवला. हा दिवस आरोग्यसेवा क्षेत्रात सुधारणा करण्यासाठी, वैद्यकीय शिक्षणाला प्रोत्साहन देण्यासाठी एक उत्तम संधी देखील प्रदान करतो.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.