
नवी दिल्ली: ‘‘भारतीय लष्कराची पाकिस्तानविरोधातील ‘ऑपरेशन सिंदूर’ ही मोहीम सुरू असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी हे त्यावर बारकाईने लक्ष ठेवून होते. मोदी हे त्या दिवशी रात्रभर जागे होते,’’ अशी माहिती केंद्रीयमंत्री जितेंद्रसिंह यांनी एका हिंदी वृत्तवाहिनीस दिली.
पाकिस्तानकडून अण्वस्त्रांच्या वापराची धमकी देण्यात आल्यानंतर मात्र भारताचा दहशतवादाविरोधातील लढाईचा निर्धार अधिक भक्कम झाल्याचे त्यांनी नमूद केले. भारताने सात मेच्या रात्री पाकिस्तानच्या हद्दीतील दहशतवाद्यांचे नऊ तळ उद्ध्वस्त केले होते. ‘जैशे मोहंमद’ आणि ‘लष्करे तैय्यबा’ या संघटनांचे कंबरडे मोडण्यात आले होते.
‘‘ देशावर आणीबाणीचा प्रसंग ओढवल्यानंतर पंतप्रधान हे त्यांचा परदेश दौरा अर्धवट सोडून मायदेशी परतले होते. ते त्या दिवशी रात्रभर लष्कराच्या कारवाईवर बारकाईने लक्ष ठेवून होते. प्रत्येक मिनिटाची अपडेट त्यांना मिळत होती. निराश होणे हे त्यांनी माहिती नाही कारण त्यांचे व्यक्तिमत्त्व हे अतिशय सुसंस्कृत अन् संयमी आहे,’’ असेही जितेंद्रसिंह यांनी नमूद केले.
पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने ‘ऑपरेशन सिंदूर’च्या माध्यमातून पाकिस्तानला सडेतोड प्रत्युत्तर दिले होते. भारताने केलेल्या प्रतिहल्ल्यामध्ये पाकिस्तानी लष्कराची नेमकी किती हानी झाली, याबाबत वेगवेगळे आकडे समोर येत आहेत. ‘एएनआय’ या वृत्तसंस्थेने याबाबत विविध घटकांकडून मिळालेल्या तांत्रिक तपशिलाचा आधार घेत पाकिस्तानला नेमका कसा, आणि किती दणका बसला, याचा आराखडा सादर केला आहे.
पाकमधील दहशतवादी तळ उद्ध्वस्त करण्यासाठी हवाई दलाने केवळ हवेतूनच मारा करता येण्याजोग्या क्षेपणास्त्राचा वापर केला होता. जमिनीवरून जमिनीवर मारा करणाऱ्या ‘ब्राह्मोस’ क्षेपणास्त्राचा वापर करण्यात आला नव्हता असे दिसून आले आहे. भारताने ‘राफेल’ व ‘एसयू-३०’ या विमानांच्या माध्यमातून केलेल्या माऱ्यात चिनी बनावटीचे ड्रोन नष्ट झाल्याचे उघड झाले आहे.
भारत- पाक संघर्ष चार दिवस चालला. पाकच्या भोलारी या हवाईतळावर हवेतून जमिनीवर मारा करणाऱ्या क्षेपणास्त्राच्या माध्यमातून हल्ला करण्यात आला.त्यामुळे स्वीडिश बनावटीचे ‘एईडब्लूसी’ हे विमान त्यांना गमवावे लागले. ज्या ठिकाणावर भारताने प्रतिहल्ला केला तिथेच पाकिस्तानच्या लढाऊ विमानांचा ढिगारा पडलेला आहे. पाकिस्तानचे लष्कर त्याला हात लावत नसल्याने नुकसानीची मोजदाद करण्यात अडथळे येत असल्याचे दिसते.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.