पाकिस्तानचा स्टार फलंदाज आणि माजी कर्णधार मोहम्मद रिझवान सध्या ऑस्ट्रेलियात खेळल्या जाणाऱ्या 'बिग बॅश लीग'मध्ये (BBL) खेळत आहे. मात्र, सिडनी थंडरविरुद्धच्या सामन्यात रिझवानसोबत अशी एक घटना घडली, ज्याची चर्चा आता जगभर होत आहे. मेलबर्न रेनेगेड्सकडून खेळणाऱ्या रिझवानला त्याने डावाची २३ चेंडू खेळल्यानंतर अचानक मैदानाबाहेर बोलावण्यात आले. विशेष म्हणजे, तो बाद झाला नव्हता, तरीही संघ व्यवस्थापनाने त्याला फलंदाजी सोडून परतण्याचे आदेश दिले.
चौथ्या क्रमांकावर फलंदाजीला आलेल्या रिझवानला ऑस्ट्रेलियन खेळपट्ट्यांवर संघर्ष करावा लागत होता. तो धावा काढण्यासाठी चाचपडताना दिसला. २३ चेंडूंत त्याने केवळ २६ धावा केल्या होत्या, ज्यात दोन चौकार आणि एका षटकाराचा समावेश होता.
त्याचा स्ट्राईक रेट अत्यंत कमी असल्यामुळे दुसऱ्या टोकाला असलेल्या फलंदाजावर दबाव वाढत होता. डावाचा वेग वाढवण्यासाठी मेलबर्न रेनेगेड्सच्या संघ व्यवस्थापनाने अखेर कठोर पाऊल उचलले आणि रिझवानला 'रिटायर्ड आऊट' (Retired Out) घोषित करून ड्रेसिंग रूममध्ये परत बोलावले.
हा निर्णय ऐकताच रिझवान पूर्णपणे चक्रावून गेला. त्याला हा अपमान सहन करणे कठीण जात होते, हे त्याच्या उतरलेल्या चेहऱ्यावरून स्पष्ट दिसत होते. तरीही नाईलाजाने त्याला मैदान सोडावे लागले. क्रिकेटच्या नियमांनुसार, एकदा एखादा खेळाडू 'रिटायर्ड आऊट' झाला की, त्याला त्या डावात पुन्हा फलंदाजीला येता येत नाही. टी-२० फॉरमॅटमध्ये आपली उपयुक्तता सिद्ध करण्यासाठी धडपडणाऱ्या रिझवानसाठी हा एक मोठा वैयक्तिक धक्का मानला जात आहे.
मोहम्मद रिझवान सध्या पाकिस्तानच्या टी-२० संघातून बाहेर आहे. आगामी टी-२० विश्वचषक २०२६ साठी आपली दावेदारी भक्कम करण्याची संधी त्याच्याकडे बिग बॅशच्या रूपाने होती. मात्र, ८ सामन्यांनंतरही त्याला एकदाही ५० धावांचा टप्पा ओलांडता आलेला नाही. त्याचे फ्लॉप शो आणि संथ फलंदाजी यामुळे निवड समितीच्या अडचणी वाढल्या आहेत. ऑस्ट्रेलियात झालेल्या या 'अपमानास्पद' वागणुकीमुळे रिझवानच्या टी-२० कारकिर्दीवर आता प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.