लेह (लडाख): लडाखमधील न्योमा येथे सुमारे १३,७०० फूट उंचीवरील देशातील सर्वात उंचीवर बीआरओने विमानतळ उभारले असून भारताच्या संरक्षण क्षमतेत मोठी भर पडली आहे. पूर्व लडाखमधील मुध-न्योमा येथील ॲडव्हान्स्ड लँडिंग ग्राउंड आता संपूर्ण क्षमतेने कार्यरत असून हे विमानतळ भारत-चीन सीमेजवळील सर्वात जवळचे हवाईतळ मानले जाते.
सुमारे तीन किलोमीटर लांबीचा धावपट्टीचा प्रकल्प २०२१ मध्ये मंजूर करण्यात आला होता. २१४ कोटी रुपयांच्या खर्चाने उभारलेले हे विमानतळ अतिशय उंच आणि कठीण भौगोलिक परिस्थितीतही आपत्कालीन तसेच अवजड विमानांच्या हालचालीस सक्षम आहे. न्योमाचे ठिकाण उंची आणि रणनीतिक दृष्टिकोनातून महत्त्वाचे आहे.
या माध्यमातून हवाईदलाला सीमेवरील दुर्गम भागांमध्ये जवान, उपकरणे व आवश्यक साहित्य वेगाने पोचवणे शक्य होणार आहे. गलवान संघर्षानंतर भारताने गेल्या काही वर्षांत प्रत्यक्ष ताबा रेषेलगत रस्ते, पूल आणि बोगदे उभारणीच्या कामाची गती वाढवली आहे.
या पार्श्वभूमीवर न्योमा विमानतळ मोठी यश मानले जात आहे. या विमानतळाचा वापर हा संरक्षणासोबत नागरी उड्डाणांसाठीही करण्यात येणार असून, त्यामुळे लडाखमधील नागरिकांच्या वाहतुकीत व विकासातही मोठी मदत होणार आहे.
न्योमा गाव हे प्रामुख्याने पँगाँग त्सो तलावाच्या दक्षिण किनाऱ्याजवळ, सिंधू नदीच्या उत्तरेकडील किनाऱ्यावर सुमारे १३,७०० फूट उंचीवर वसलेले आहे. हे गाव चीनच्या सीमारेषेपासून केवळ ३० किलोमीटर अंतरावर आहे.
न्योमा विमानतळामुळे भारतीय हवाईदलाला सीमेवरील तातडीच्या परिस्थितींमध्ये वेगाने प्रतिसाद देणे आणि अवजड लढाऊ विमानांची ने-आण सुलभ करणे शक्य होईल. तसेच या प्रकल्पामुळे लडाख परिसरातील संरक्षण, वाहतूक आणि स्थानिक विकासाला मोठी चालना मिळणार आहे. बीआरओने या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाची उभारणी अत्यंत कठीण हवामान आणि भूभागात केली आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.