Kerala Dai nik Gomantak
देश

Kerala Foundation Day: निसर्ग सौंदर्यानं नटलेली अन् भगवान परशुरामांच्या पदस्पर्शाने पावन झालेली भूमी; 'गॉड्स ओन कंट्री' म्हणून ओळखल्या जाणाऱ्या केरळचा स्थापना दिवस

Kerala Foundation Day 2025: 1 नोव्हेंबर 1956 रोजी केरळ राज्याचे भाषिक आधारावर पुनर्गठन करण्यात आले, आणि याच दिवसाला केरळमध्ये 'केरळपिरवी' म्हणजेच 'केरळचा जन्मदिन' म्हणून ओळखले जाते.

Manish Jadhav

Kerala Foundation Day 2025: आज, 1 नोव्हेंबर हा दिवस भारताच्या नकाशावर अनेक राज्यांच्या निर्मितीचा साक्षीदार आहे. भाषिक आधारावर राज्यांची पुनर्रचना झाल्यानंतर याच दिवशी मध्यप्रदेश, छत्तीसगढ, हरियाणा, कर्नाटक यांसारख्या सात राज्यांसह आणि दोन केंद्रशासित प्रदेशांचा स्थापना दिवस मोठ्या उत्साहात साजरा होत आहे. या महत्त्वाच्या राज्यांपैकी एक म्हणजे दक्षिण भारतातील सौंदर्यसंपन्न राज्य केरळ.

1 नोव्हेंबर 1956 रोजी केरळ राज्याचे भाषिक आधारावर पुनर्गठन करण्यात आले, आणि याच दिवसाला केरळमध्ये 'केरळपिरवी' (Keralappiravi) म्हणजेच 'केरळचा जन्मदिन' म्हणून ओळखले जाते. काही प्रदेशात याला 'मल्ल्याळम दिवस' म्हणूनही साजरे केले जाते.

केरळची व्युत्पत्ती आणि भौगोलिक ओळख

आधुनिक केरळ (Kerala) राज्यामध्ये अलमपुझा, एर्नाकुलम, इडुक्की, कन्नूर, कासरगोड, कोल्लम, कोट्टायम, कोझिकोड, मलप्पुरम, पलक्कड, तिरुअनंतपुरम (राजधानी), त्रिशूर आणि वायनाड अशा एकूण 14 जिल्ह्यांचा समावेश आहे. ‘केरळ’ या शब्दाच्या उगमाबद्दलही विद्वानांमध्ये भिन्न मते आहेत.

काही विद्वानांच्या मते, 'चेर-स्थल' आणि 'अलम-प्रदेश' या शब्दांच्या संयोगातून 'चेरलम' आणि नंतर 'केरळ' हे नाव आले. तर, केरळ शब्दाचा एक अर्थ 'समुद्रातून निघालेला भूभाग' असाही आहे, तसेच, समुद्र आणि पर्वतांच्या संगमस्थानालाही 'केरळ' म्हणतात. प्राचीन काळात परदेशी प्रवासी या प्रदेशाला 'मलबार' या नावाने संबोधत असत. हा प्रदेश दीर्घकाळ 'चेरा' राजांच्या अधिपत्याखाली असल्याने, 'चेरलम' (चेराचे राज्य) आणि नंतर 'केरळम' हे नाव रुढ झाले असण्याची शक्यता अधिक आहे.

हजारो वर्षांची केरळची संस्कृती

केरळची संस्कृती हजारो वर्षे जुनी असून, तिचा इतिहास ई. स. पूर्व 1000 ते ई. स. 300 पर्यंतचा मानला जातो. डोंगराळ भागातून प्राप्त झालेल्या महाप्रस्तर युगीन स्मारिकांवरुन या प्रदेशात अतिप्राचीन काळापासून मानवाचा वास होता, हे सिद्ध होते. केरळमध्ये मानवी वस्तीच्या विकासाचा दुसरा टप्पा संगम काळ (ई. स. 300 ते 800) हा मानला जातो, याच काळात प्राचीन तमिळ साहित्याची निर्मिती झाली. पूर्वी इतिहासकार प्राचीन केरळला तमिळ भूभागाचा भाग मानत असत. अभ्यासाच्या सोयीसाठी, केरळच्या इतिहासाचे प्राचीन, मध्ययुगीन आणि आधुनिक असे तीन भाग केले जातात. केरळ राज्य हे भगवान परशुरामाची भूमी म्हणूनही ओळखले जाते.

उत्सव, समन्वय आणि कला

केरळमधील जनजीवनाची खरी ओळख येथील उत्सवांमध्ये पाहायला मिळते. हे उत्सव सामाजिक सलोखा आणि परस्पर देवाणघेवाण वाढवण्यासाठी महत्त्वाचे ठरतात. येथील अनेक उत्सव देवालय किंवा धर्मावर आधारित असले तरी, अनेक उत्सव धर्मनिरपेक्ष स्वरुपाचे आहेत. ओणम हा केरळचा राज्योत्सव आहे. याशिवाय, हिंदूंचे विषु, नवरात्री, दीपावली, शिवरात्री; मुस्लिमांचे रमझान, बकरीद, मोहरम आणि ख्रिस्ती लोकांचे ख्रिसमस, ईस्टर असे सण येथे उत्साहाने साजरे होतात. केरळची कला आणि साहित्य या उत्सव परंपरांवर आधारित आहेत.

केरळ पिरवी दिनमचा उत्साह

केरळच्या स्थापना दिनानिमित्त राज्यभर मोठ्या प्रमाणावर रंगारंग आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. या दिवसाचा उत्साह केरळच्या मुख्य सणांपैकी एक असलेल्या ओणम सणासारखाच असतो. या शुभप्रसंगी केरळच्या स्त्रिया पारंपरिक केरळ साडी परिधान करतात, तर पुरुष शुभ्र धोतीमध्ये दिसतात. लोक एकमेकांना भेटून शुभेच्छा देतात आणि आनंद साजरा करतात. या दिवशी केरळवासीय आपल्या मित्र-परिवाराला खास संदेश आणि एसएमएसद्वारे शुभेच्छा देतात.

मल्ल्याळम भाषा आणि साहित्य

केरळची प्रमुख भाषा मल्ल्याळम ही द्रविड भाषा कुटुंबातील आहे. मल्ल्याळम भाषेच्या उगमाबद्दल दोन प्रमुख मते आहेत: एक म्हणजे भौगोलिक कारणांमुळे ती आदि द्रविड भाषेतून स्वतंत्रपणे विकसित झाली; तर दुसरे मत, ती तमिळमधून व्युत्पन्न झाली आहे, असे मानते. तमिळ आणि संस्कृत या दोन्ही भाषांशी मलयाळमचा जवळचा संबंध आहे. मल्ल्याळम साहित्य मौखिक स्वरुपात शतकानुशतके जुने आहे, परंतु साहित्यिक भाषा म्हणून त्याचा विकास 13व्या शतकापासून झाला. या काळात लिखित ‘रामचरितम्’ हे मल्ल्याळम भाषेतील पहिले काव्य मानले जाते. अशा प्रकारे, 1 नोव्हेंबर हा दिवस केवळ केरळचाच नव्हे, तर देशाच्या भाषिक आणि सांस्कृतिक पुनर्रचनेचा उत्सव म्हणून साजरा केला जातो.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

World Cup 2025 Final: क्रिकेटचं वेड! तिकिटाचा दर 1.3 लाखांहून अधिक, तरीही 'फायनल' पाहण्यासाठी चाहत्यांची मुंबईत तुफान गर्दी

गोवा झालं महाग! पर्यटनाच्या नावाखाली लूट, 'कचऱ्याचे ढिग' आणि 'टॅक्सीवाल्यांची दादागिरी', पर्यटकाने शेअर केला धक्कादायक अनुभव

पिर्णा हत्या प्रकरण 15 तासांत उलगडले; कांदोळीतील मुख्य आरोपीला अटक

18 गुन्ह्यांचा रेकॉर्ड! गोवा-पुणे महामार्गावर 8 लाखांच्या दरोड्याचा पर्दाफाश; पोलिसांच्या वेशातील 'सराईत गुन्हेगार' जेरबंद

Valpoi Theft: ना CCTV, ना सेक्युरिटी, चोरट्यांनी गॅस कटरनं तोडली खिडकी; वाळपई पोस्ट ऑफिसमधून लाखो रुपये लंपास

SCROLL FOR NEXT