यशवंत पाटील
छत्तीसगडच्या रायपूर जिल्ह्यातील चंदखुरी गावात माता कौसल्येचे देशातील एकमेव मंदिर आहे. कौसल्या ही कोसल राज्याचे राजे भानुमंत यांची कन्या, दशरथ राजाची पत्नी आणि प्रभू श्रीरामांची माता आहे. चंदखुरी गावात सुमारे १०६ वर्षांपूर्वीचे हे कौसल्या मातेचे मंदिर आहे, परंतु या मंदिराबाबत देशवासीयांना माहिती नव्हती.
आत्ता अयोध्येत होणाऱ्या श्रीरामाच्या प्राणप्रतिष्ठापना सोहळ्यानिमित्त हे मंदिर प्रकाशझोतात आले आहे, अशी माहिती छत्तीसगडच्या दौऱ्यावर गेलेले आमचे प्रतिनिधी यशवंत पाटील यांनी दिली.
अयोध्येतील कार्यक्रमानिमित्त या मंदिराची नव्याने उभारणी करण्यात आली आहे. तसेच परिसराचे सुशोभीकरण करण्यात आले आहे. सर्व परिसर फुलांच्या माळा आणि विद्युत रोषणाईने झगमगीत करण्यात आला आहे. मंदिराच्या प्रवेशद्वारावर श्रीरामाची भव्य मूर्ती, बाजूला हनुमान व भगवान शिवशंकराचीही मूर्ती आहे. चारी बाजूंनी पाणी आणि मध्ये मंदिर अशा निसर्गरम्य परिसरात हे मंदिर विस्थापित आहे, परंतु अद्याप पर्यटनदृष्ट्या त्याचा विकास झालेला नाही. तसेच प्रसारही झालेला नाही. त्यामुळे इतके सुंदर स्थळ देशासह जगापासून अनभिज्ञच राहिले आहे.
कौसल्या मातेच्या मंदिराच्या डाव्या बाजूला दशरथ राजाच्या दरबाराचा आकर्षक देखावा आहे. त्यात राजा दशरथ यांच्यासह त्यांच्या तीन पत्नी, राम, लक्ष्मण, भरत, शत्रुघ्न, विशिष्ट गुरू यांच्या मूर्ती आहेत. हे दृश्य पाहिल्यानंतर रामायणाची आठवण झाल्याशिवाय रहात नाही.
विशेष म्हणजे प्रभू श्रीराम चंदखुरी गावचे भाचे असल्यामुळे गावात आपला भाचा आला, की प्रभू श्रीराम आले असे समजून मामा आपल्या भाच्याच्या पाया पडतो. फार पूर्वीपासून गावात ही प्रथा चालू आहे. तसेच मामाच्या निधनानंतर भाचा त्याच्या शवाला पाय लावतो. त्यामुळे मामाला मुक्ती मिळते अशी चंदखुरी गावातील नागरिकांची भावना असून ही प्रथा अनेक शतके चालू आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.