Jharkhand Accident News Video: झारखंडच्या खुंटी जिल्ह्यात एक अत्यंत भीषण आणि मन हेलावून टाकणारी घटना घडली. खुंटी जिल्ह्यातील कर्रा पोलीस ठाण्यांतर्गत येणाऱ्या कर्रा-तोरपा रस्त्यावर एका भरधाव आणि अनियंत्रित ट्रकने रस्त्यावरुन चालणाऱ्या निष्पाप लोकांना चिरडले. या भयंकर अपघातात 6 जणांचा जागीच मृत्यू झाला, तर एका गंभीर जखमी व्यक्तीने उपचारादरम्यान रुग्णालयात दम सोडला. मृतांमध्ये 3 लहान मुले, 3 महिला आणि एका स्कूटीचालकाचा समावेश आहे. या हृदयद्रावक दुर्घटनेमुळे संपूर्ण परिसरात शोककळा पसरली असून स्थानिकांमध्ये संतापाची लाट उसळली.
स्थानिक प्रवाशांनी आणि या मार्गावरुन जाणाऱ्या नागरिकांनी तात्काळ घटनेची माहिती पोलिसांना दिली, त्यानंतर कर्रा पोलीस ठाण्याचे प्रभारी आपल्या पथकासह तातडीने घटनास्थळी पोहोचले. प्रत्यक्षदर्शींच्या माहितीनुसार, ट्रकचा वेग इतका जास्त होता की, चालकाचे नियंत्रण सुटले आणि हे वाहन थेट लोकांच्या अंगावर गेले. त्यानंतर रस्त्याच्या कडेला असलेल्या झाडीत हा ट्रक धडकून थांबला. खुंटीचे पोलीस अधीक्षक ऋषभ गर्ग यांनी दिलेल्या माहितीनुसार, पोलिसांनी (Police) घटनास्थळावरुन अपघातग्रस्त ट्रक जप्त केला असून सर्व 7 मृतदेह ताब्यात घेऊन पोस्टमार्टमसाठी पाठवण्यात आले.
तर दुसरीकडे, मृतकांच्या संतप्त कुटुंबीयांनी आणि ग्रामस्थांनी आरोपी चालकाच्या तात्काळ अटकेची मागणी केली. पोलिसांकडून आरोपी ट्रक चालकाचा शोध घेण्यासाठी कसून मोहीम राबवली जात असून परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केली जात आहे. चालक नशेत होता की, त्याला झोप लागल्यामुळे ताबा सुटला, हे आरोपीच्या अटकेनंतरच स्पष्ट होईल. पोलीस या संपूर्ण प्रकरणाचा सखोल तपास करत आहेत.