Foxconn in Telangana: गेल्या काही काळापासून अॅपलच्या आयफोनचे उत्पादन भारतात होणार याची चर्चा सुरू होती. आता हे उत्पादन कुठल्या राज्यात होणार आहे, हे समोर आले आहे. तेलंगणामध्ये आयफोनचे उत्पादन होणार आहे. फॉक्सकॉन तेलंगणात त्यासाठी कारखाना उभारणार आहे.
यापुर्वी कर्नाटकात तत्कालीन मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी अॅपल आयफोन उत्पादन प्रकल्प सुरू करण्याबाबत ट्विट केले होते. पण फॉक्सकॉन तेलंगणात नवीन प्लांट उभारणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.
तेलंगणातील हैदराबादजवळ फॉक्सकॉनचा प्लांट उभारण्यात येणार असल्याची माहिती तेलंगणातील मंत्री के. टी. रामाराव रामाराव यांनी सोमवारी दिली. रंगारेड्डी जिल्ह्यातील कोंगार कलान येथे हा प्लांट उभारला जाणार आहे.
के. टी. रामाराव यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे की, फॉक्सकॉन तेलंगणामध्ये $500 दशलक्ष (सुमारे 4,000 कोटी रुपये) गुंतवणूक करणार आहे. यामुळे पहिल्या टप्प्यात राज्यातील 25,000 लोकांना थेट नोकऱ्या उपलब्ध होतील.
तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांच्या उपस्थितीत फॉक्सकॉन आणि तेलंगणा सरकारमध्ये यासंबंधीचा करार करण्यात आला.
के. टी. रामाराव हे तेलंगणाचे माहिती तंत्रज्ञान, इलेक्ट्रॉनिक्स आणि दळणवळण मंत्री आहेत. त्यांच्याकडे शहरी विकास, उद्योग आणि वाणिज्य मंत्रालयाचाही कार्यभार आहे. के. टी. रामाराव हे मुख्यमंत्री के. सी. राव यांचे पुत्र आहेत.
आयफोन बनवणारी सर्वात मोठी कंपनी
फॉक्सकॉनचे मुख्यालय तैपेई (तैवान) येथे आहे. Apple iPhone बनवणारी ही जगातील सर्वात मोठी कंपनी आहे. कंपनीच्या बहुतेक शाखा चीनमध्ये आहेत. पण कोविड-19 लाटेनंतर आयफोन उत्पादनांसाठी अमेरिका चीनवरील अवलंबित्व कमी करण्याचा प्रयत्न करत आहे.
तेव्हापासून चीनमधील अनेक मॅन्युफॅक्चरिंग प्लांट बाहेर पडत असून त्यांना भारत त्यांची पहिली पसंती बनली आहे.
शिवाय भारत ही अॅपलच्या उत्पादनांसाठी वाढणारी बाजारपेठ आहे. अलीकडेच अॅपलचे सीईओ टिम कुक भारत दौऱ्यावर आले होते. त्यांनी येथे दोन ऍपल स्टोअर सुरू केले. एक बीकेसी मुंबई येथे आणि दुसरे साकेत, दिल्ली येथे.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.