Indian Navy Court Martial INS Brahmaputra Officers: मुंबईच्या नेव्हल डॉकयार्डमध्ये भारतीय नौदलाची युद्धनौका आयएनएस ब्रह्मपुत्र उलटल्याच्या दुर्देवी दुर्घटनेनंतर तब्बल दोन वर्षांनी नौदलाने दोन वरिष्ठ अधिकाऱ्यांविरुद्ध कोर्ट मार्शलची कारवाई सुरु केली. या दुर्घटनेत जहाजाचे कमांडिंग ऑफिसर आणि ऑफिसर ऑफ द डे (लेफ्टनंट कमांडर) या दोन्ही अधिकाऱ्यांवर कर्तव्यात कसूर व निष्काळजीपणा केल्याचा ठपका ठेवण्यात आला. याशिवाय, कमांडिंग ऑफिसरवर युद्धनौका धोक्यात आणल्याचा अतिरिक्त व गंभीर आरोप लावण्यात आला.
ही घटना 21 जुलै 2014 रोजी घडली होती, जेव्हा मुंबईच्या (Mumbai) नेव्हल डॉकयार्डमध्ये डागडुजी आणि दुरुस्तीचे काम सुरु असताना आयएनएस ब्रह्मपुत्रला भीषण आग लागली. आग विझवण्यासाठी जहाजावर मोठ्या प्रमाणावर पाण्याचा मारा करण्यात आला, मात्र त्यामुळे युद्धनौकेचे वजन आणि संतुलन बिघडले. परिणामी, ही भलीमोठी युद्धनौका पोर्ट साईडच्या (डाव्या) बाजूला झुकून समुद्रात उलटली. या भीषण अपघातात 'लीडिंग सीमन' सितेंद्र सिंह यांचा दुर्देवी मृत्यू झाला, तर अनेक सैनिकांना आपला जीव वाचवण्यासाठी थेट समुद्रात उड्या टाकाव्या लागल्या. नौदलाच्या अथक प्रयत्नानंतर सितेंद्र सिंह यांचा मृतदेह हाती लागला.
दरम्यान, दुर्घटनेनंतर नौदलाने तात्काळ उच्चस्तरीय चौकशीचे आदेश दिले. युद्धनौकेला पुन्हा सरळ करण्यासाठी नौदलाने अनेक महिने मोठे रेस्क्यू आणि सॅल्वेज ऑपरेशन चालवले. जहाजाला पुन्हा सरळ केल्यानंतर त्याच्या दुरुस्तीचे आणि पुनर्बांधणीचे काम युद्धपातळीवर हाती घेण्यात आले. सध्या आयएनएस ब्रह्मपुत्रच्या विविध चाचण्या सुरु असून, नौदलाने अद्याप तिला अधिकृतरित्या सेवेत समाविष्ट केलेले नाही. सर्व चाचण्या आणि आवश्यक दुरुस्ती पूर्ण झाल्यानंतर 2027 पर्यंत ही युद्धनौका पुन्हा एकदा समुद्रात सुरक्षा रक्षणासाठी सज्ज होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.