सिमला: हिमाचल प्रदेशच्या विविध भागांत मुसळधार पाऊस सुरू असून, जोरदार पावसामुळे दोन राष्ट्रीय महामार्गांसह ३०७ रस्ते बंद करण्यात आले आहेत. स्थानिक हवामान विभागाने सोमवार आणि मंगळवारी राज्यातील काही विभागांमध्ये जोरदार ते अतिशय जोरदार पाऊस पडण्याची शक्यता वर्तवली असून, ‘ऑरेंज अलर्ट’ जारी केला आहे. पावसामुळे काही भागांतील वीज आणि पाणीपुरवठाही विस्कळित झाला आहे.
शनिवार संध्याकाळपासून (ता. २) अनेक भागांत मध्यम ते जोरदार पाऊस पडला आहे. त्यामध्ये भरारी येथे १०८.२ मि.मी. त्यानंतर मुरारी देवी येथे ८२ मिमी, नैना देवी येथे ७४.४ मिमी, मलरावण येथे ५६.२ मिमी, ब्रह्माणी येथे ४५.४ मिमी, ऊना येथे ३८ मिमी आणि जोत येथे ३६.२ मिमी पावसाची नोंद झाली आहे.
रविवार सकाळपर्यंत एकूण ३०७ रस्ते वाहतुकीसाठी बंद करण्यात आले आहेत. राज्य आपत्ती निवारण विभागाच्या माहितीनुसार, बंद करण्यात आलेल्या रस्त्यांपैकी १५६ रस्ते मंडी जिल्ह्यात आहेत, तर ६८ रस्ते कुलू जिल्ह्यातील आहेत. जोरदार पावसामुळे अनेक भागांतील वीज गेली असून, २८४ विजेचे ट्रान्स्फॉर्मर बंद असून, आतापर्यंत विविध भागांत जोरदार पावसामुळे १०० पेक्षा जास्त जणांचा मृत्यू झाला असून, दोन हजार कोटींपेक्षा अधिक नुकसान झाले आहे.
गेल्या २४ तासांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे बिहारमध्ये काही भागांत पूरस्थिती निर्माण झाली असून, नद्यांच्या पाणीपातळीत मोठी वाढ झाली आहे. पाटणा येथे सतत पडणाऱ्या पावसामुळे शहरातील अनेक महत्त्वाच्या रस्त्यांवर आणि सखल भागांत पाणी साचल्याचे दिसून आले. पूरस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी यंत्रणांनी दक्ष राहावे, असे बिहारचे मुख्यमंत्री नीतिशकुमार यांनी म्हटले आहे.
पाटणा, बांका, मुजफ्फरपूर, बेगुसराई, भागलपूर, भोजपूर, बक्सर, गयाजी, जहानाबाद, कैमूर, कटिहार, खगरिया, मुंगेर, नालंदा आणि वैशाली येथे जोरदार पावसाची शक्यता असून, येथील काही भागात रविवारी दुपारपासून पाऊस सुरू झाला आहे. याव्यतिरिक्त, नेपाळमध्ये सुरू असलेल्या पावसामुळे तेथून वाहत येणाऱ्या नद्यांच्या पातळीत झपाट्याने वाढ झाली आहे. अनेक ठिकाणी नद्या धोकादायक पातळीच्या जवळ असून, काही भागांत नद्यांनी धोकादायक पातळी ओलांडली आहे. आतापर्यंत कोणतीही जीवितहानी झालेली नाही. पूर्व व पश्चिम चंपारण, भागलपूर आणि पाटणा जिल्ह्यातील काही भागांमध्ये पूरस्थिती निर्माण होण्यास सुरुवात झाली असल्याने ग्रामस्थांना प्रशासनाकडून सुरक्षित ठिकाणी हलविण्यात आले आहे.
गुवाहाटी/कोलकता : गेल्या काही दिवसांपासून आसाममध्येही पावसाने हजेरी लावली असून, गुवाहाटी शहराच्या विविध भागांमध्ये पुढील दोन-तीन दिवसांत मेघगर्जनेसह जोरदार ते अतिजोरदार पाऊस पडेल, अशी शक्यता वर्तविण्यात आली आहे. दरम्यान, सतत पडणाऱ्या पावसामुळे पश्चिम बंगालमधील तीस्ता आणि जलधाका यांसह विविध नद्यांच्या पाणीपातळीमध्ये मोठी वाढ झाली आहे. उत्तर प्रदेशासह उत्तराखंड येथेही मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.