Manipur Politics: अरुणाचल प्रदेशपाठोपाठ आता मणिपूरमध्येही जनता दल युनायटेडला (JDU) मोठा झटका बसला आहे. शुक्रवारी जेडीयूच्या सहापैकी पाच आमदारांनी राज्यातील सत्ताधारी पक्ष भाजपमध्ये प्रवेश केला. यासह 60 सदस्यीय विधानसभेत भाजपच्या आमदारांची संख्या आता 37 झाली आहे. गेल्या महिन्यात बिहारमध्ये भाजप आणि जेडीयू यांची तुटल्यानंतर आमदारांनी हे पाऊल उचलले आहे. बिहारमध्ये फूट पडल्यानंतर जेडीयू मणिपूरमधील एन बीरेन सिंग यांच्या नेतृत्वाखालील भाजप सरकारचा पाठिंबा काढून घेण्याचा विचार करत असल्याची चर्चा होती.
दरम्यान, विधानसभेच्या सचिवालयाने शुक्रवारी जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, 'मणिपूर विधानसभेचे अध्यक्ष टीएच सत्यब्रत सिंह यांनी जेडीयूचे पाच आमदार- केएच जॉयकिशन, एन सनाते, मोहम्मद अछाबुद्दीन, माजी पोलीस महासंचालक एएम खोटे आणि थंगजाम अरुणकुमार यांचा भाजपमधील (BJP) विलीनीकरणाचा प्रस्ताव मान्य केला आहे.'
सभापतींनी भाजपमध्ये विलीनीकरणाचा प्रस्ताव मान्य
मणिपूर विधानसभेचे सचिव के मेघजित सिंग यांनी जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, 'संविधानाच्या (Constitution) दहाव्या अनुसूची अंतर्गत पाच JD (U) आमदारांचे भाजपमध्ये विलीनीकरण स्वीकारल्याबद्दल सभापतींनी आनंद व्यक्त केला आहे. या वर्षी मार्चमध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत JD (U) ने 38 जागांवर उमेदवार उभे केले होते, त्यापैकी 6 जागा जिंकल्या.
अब्दुल नसीर हे जेडीयूचे एकमेव आमदार राहिले
लिलाँग मतदारसंघातील आमदार मोहम्मद अब्दुल नसीर हे JD (U) चे एकमेव आमदार आता उरले आहेत. JD (U) मणिपूर (Manipur) राज्य युनिटचे अध्यक्ष केश बिरेन सिंह यांनी काही दिवसांपूर्वी इंफाळमध्ये सांगितले होते की, 'पक्षाने ईशान्येकडील राज्यातील भाजप नेतृत्वाखालील आघाडी सरकारशी फारकत घेण्याची प्रक्रिया सुरु केली आहे.' पाटणा येथे 3 आणि 4 सप्टेंबर रोजी होणाऱ्या राष्ट्रीय कार्यकारिणी आणि राष्ट्रीय परिषदेच्या बैठकीत पक्षाच्या राष्ट्रीय नेत्यांची भेट घेणार असल्याचेही केश बिरेन यांनी सांगितले होते.
निवडणुकीत जेडीयू तिसऱ्या क्रमांकाचा पक्ष म्हणून समोर आला
या वर्षी फेब्रुवारी-मार्चमध्ये झालेल्या मणिपूर विधानसभा निवडणुकीत JD (U) तिसऱ्या क्रमांकाचा पक्ष म्हणून उदयास आला. भाजप पहिल्या क्रमांकावर होता, ज्यांच्या खात्यात 32 जागा होत्या, नॅशनल पीपल्स पार्टी दुसऱ्या क्रमांकावर होती, ज्याने 7 जागा जिंकल्या होत्या. निकालानंतर, JD (U) ने पक्षाच्या जनादेशाचा सन्मान करण्यासाठी आणि लोकांच्या आशा आणि आकांक्षा पूर्ण करण्यासाठी भाजपला पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला होता.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.