Delhi 14 Year Old Minor Detained Dark Web Data Sale: दिल्लीमध्ये डार्क वेबवर डेटा विकण्याचा प्रयत्न केल्याच्या आरोपाखाली 14 वर्षीय अल्पवयीन मुलाला ताब्यात घेण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली. हाती लागलेला डेटा अग्निवीर किंवा अग्निवीर भरती प्रक्रियेशी संबंधित असण्याची शक्यता तपास यंत्रणांनी वर्तवली. अल्पवयीन मुलाने अग्निवीर भरती पोर्टल हॅक करुन ही माहिती मिळवली का, याचाही तपास सुरु आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, त्याने डार्क वेबवर डेटा विक्रीसाठी जाहिरात देऊन खरेदीदारांचा शोध सुरु केला होता; मात्र कोणताही व्यवहार होण्यापूर्वीच त्याला पकडण्यात आले. आर्थिक लाभाच्या उद्देशानेच त्याने हे कृत्य केल्याचा प्राथमिक अंदाज आहे.
तपास यंत्रणा जप्त केलेल्या माहितीची कसून तपासणी करत असून, त्यात अग्निवीर भरतीशी निगडित संवेदनशील तपशील आहे की नाही, हे पडताळून पाहिले जात आहे. अनधिकृतपणे पोर्टलमध्ये शिरकाव करुन डेटा मिळवण्यात आला का? याचाही शोध पोलिस घेत आहेत. एका पोलिस अधिकाऱ्याने सांगितले की, चोरलेला डेटा थेट डार्क वेबवर टाकण्याऐवजी केवळ विक्रीची जाहिरात देण्यात आली होती. वेबसाइटच्या मुख्य पानाच्या कोडिंगमधील त्रुटी हेरुन एआय टूल म्हणजेच बॉटच्या मदतीने संकेतस्थळ हॅक केल्याचा आरोप त्याच्यावर आहे. त्यानंतर नोकरीचे अर्ज भरलेल्या खात्यांचे पासवर्ड चोरण्यात आल्याचे तपासात पुढे आले.
दिल्ली पोलिसांच्या (Delhi Police) सूत्रांनुसार, आरोपीने अडीच हजारांहून अधिक जवानांचा डेटा मिळवला होता. 2022 मध्ये सुरु झालेल्या अग्निपथ योजनेअंतर्गत भूदल, नौदल आणि हवाई दलात अग्निवीर म्हणून रुजू झालेल्या जवानांशी हा तपशील संबंधित असल्याची माहिती आहे. तब्बल 2500 अग्निवीरांची खासगी माहिती उपलब्ध असल्याचा दावा त्याने डार्क वेबवरील यादीत केला होता. यामध्ये 47 शासकीय विभाग आणि पोलिस ठाण्यांमध्ये सादर केलेल्या नोकरीच्या अर्जांचाही समावेश असल्याचे सूत्रांनी स्पष्ट केले.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.