शुक्रवारी दिल्ली उच्च न्यायालयात अचानक मोठा गोंधळ उडाला. न्यायालयाच्या आवारात बॉम्ब ठेवण्यात आल्याची धमकी एका ईमेलद्वारे प्राप्त झाली आहे. या धमकीची माहिती मिळताच तात्काळ सतर्कता बाळगण्यात आली. सुरक्षेच्या दृष्टीने न्यायालयाचा परिसर रिकामा करण्यात आला असून, पोलिसांचा ताफा घटनास्थळी दाखल झाला आहे. बॉम्बशोधक पथकानेही तत्काळ कार्यवाही सुरू केली असून संपूर्ण परिसराची कसून तपासणी करण्यात येत आहे. न्यायालय परिसरात तातडीने सुरक्षा वाढवण्यात आली आहे.
न्यायालयाच्या आवारात बॉम्ब ठेवण्याची धमकी मिळाली तेव्हा अनेक वरिष्ठ न्यायाधीश न्यायालयाचे कामकाज सुरू करणार होते. ही बातमी मिळताच, पोलीस सध्या संपूर्ण परिसराची चौकशी करत आहेत. त्याचबरोबर ही धमकी कुठून आली आणि या धमकीमागील लोक कोण आहेत हे शोधण्याचेही प्रयत्न सुरू आहेत. पोलीस सध्या त्या मेलच्या आयपी अॅड्रेसच्या मदतीने आरोपीची ओळख पटवण्यात आणि त्याचे स्थान शोधण्यात गुंतले आहेत.
पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, हा ईमेल साडेबाराच्या सुमारास आला. ईमेल पाहिल्याबरोबर पोलिसांना त्याची माहिती देण्यात आली. ज्या वेळी हा ईमेल आला तेव्हा न्यायालयात अनेक खटल्यांची सुनावणी सुरू होती. दिल्ली पोलिसांनी सर्व न्यायाधीश, वकील आणि इतर कर्मचारी बाहेर काढले आणि संपूर्ण परिसराची तपासणी सुरू केली.
या संपूर्ण परिसराची पूर्णपणे तपासणी करण्यासाठी थोडा वेळ लागू शकतो. दिल्ली पोलिसांनी सर्वांना काही काळ बाहेर राहण्यास सांगितले आहे. पोलिस सध्या संपूर्ण परिसराची सखोल तपासणी करत आहेत.
न्यायाधीशांच्या खोलीत आणि न्यायालयाच्या आवारात 3 बॉम्ब ठेवण्यात आले आहेत, असं मेलमध्ये म्हटलंय. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आतापर्यंत तपासात कोणतीही संशयास्पद वस्तू आढळलेली नाही.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.