Chhattisgarh Crime News: रक्षकानेच भक्षक बनावे, अशी संतापजनक घटना छत्तीसगडच्या कोरबा जिल्ह्यातून समोर आली. कोरबा जिल्ह्यात पोलिसांच्या 'डायल 112' या आपत्कालीन सेवेच्या खाजगी चालकाने आपल्या चार मित्रांसह एका 19 वर्षीय तरुणीवर सामूहिक बलात्कार केल्याची घटना उघडकीस आली. या घटनेमुळे संपूर्ण राज्यात संतापाची लाट उसळली असून पोलिसांनी मुख्य आरोपी ड्रायव्हरसह दोघांना अटक केली.
मिळालेल्या माहितीनुसार, ही अंगावर काटा आणणारी घटना 8 जानेवारी रोजी रात्री बांकीमोंगरा पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली. पीडित तरुणी आरोपींपैकी एकाच्या ओळखीची होती. या ओळखीचा फायदा घेऊन एका आरोपीने तिला बोलावून घेतले. त्यानंतर हे पाचही जण तिला जबरदस्तीने बांकीमोंगरा येथील एका निर्जन आणि रिकाम्या घरात घेऊन गेले. तिथे नेल्यानंतर पोलीस हेल्पलाइनचा ड्रायव्हर आणि त्याच्या इतर चार साथीदारांनी तरुणीवर आळीपाळीने अत्याचार केले. या क्रूर कृत्यानंतर आरोपींनी तरुणीला तिथेच बेशुद्धावस्थेत सोडून पलायन केले.
शुक्रवारी शुद्धीवर आल्यानंतर पीडित तरुणीने कशीबशी स्वतःची सुटका करुन घर गाठले. तिने आपल्यासोबत घडलेला हा भीषण प्रकार कुटुंबीयांना सांगितला. हे ऐकून हादरलेल्या कुटुंबीयांनी तिला तातडीने वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयात दाखल केले आणि पोलिसांना माहिती दिली. सुरुवातीला या प्रकरणाची तक्रार सिव्हिल लाईन्स पोलीस ठाण्यात 'झिरो एफआयआर' म्हणून नोंदवण्यात आली. त्यानंतर पुढील तपासासाठी हा गुन्हा बांकीमोंगरा पोलीस ठाण्याकडे सोपवण्यात आला.
कोरबा जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक (SP) सिद्धार्थ तिवारी यांनी या घटनेला दुजोरा दिला. त्यांनी सांगितले की, "डायल 112' या पोलीस सेवेचा खाजगी ड्रायव्हर आणि त्याच्या एका साथीदाराला आतापर्यंत ताब्यात घेण्यात आले आहे. उर्वरित तीन आरोपी अद्याप फरार असून त्यांच्या शोधासाठी पोलिसांची पथके रवाना करण्यात आली आहेत. लवकरच त्यांनाही बेड्या ठोकल्या जातील." महिलांच्या सुरक्षेसाठी तैनात असलेल्या यंत्रणेतील एका व्यक्तीनेच असा घृणास्पद गुन्हा केल्यामुळे सर्वत्र टीका होत आहे. पोलिसांच्या ताफ्यातील वाहनांवर काम करणाऱ्या खाजगी कर्मचाऱ्यांच्या चारित्र्य पडताळणीवर आता मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.