पंजाबमध्ये अखेर काँग्रेसने (Congress) नवीन मुख्यमंत्र्यांचे नाव निश्चित केले. चरणजित चन्नी पंजाबचे पुढील मुख्यमंत्री असतील.चंदीगड (Chandigarh) येथे झालेल्या काँग्रेस विधिमंडळ पक्षाच्या बैठकीत चरणजित सिंह चन्नी यांची विधिमंडळ नेता म्हणून निवड करण्यात आली. मुख्यमंत्रीपदासाठी चन्नी यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाल्यानंतर ते काँग्रेसचे पंजाब प्रभारी हरीश रावत (Harish Rawat) यांच्यासह राज्यपालांना भेटण्यासाठी राजभवनाकडे रवाना झाले.
काँग्रेसने रविवारी संध्याकाळी सांगितले की, दलित चेहरा आणि विद्यमान तंत्रशिक्षण मंत्री चरणजित सिंह चन्नी हे पंजाबचे नवे मुख्यमंत्री असतील. काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते आणि सरकार प्रमुख म्हणून चन्नी यांच्या नावाची पुष्टी काँग्रेसचे प्रदेश प्रभारी हरीश रावत यांनी केली. त्यांनी ट्विट केले: “चरणजीत सिंह चन्नी यांची निवड झाल्याची घोषणा करताना मला खूप आनंद होत आहे. ते पंजाबच्या काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे एकमताने नेते म्हणून निवडले गेले."
चरणजीत सिंह चन्नी यांना मुख्यमंत्री करण्याचा निर्णय घेतल्यानंतर या पदाचे प्रबळ दावेदार सुखजिंदर रंधावा म्हणाले की, पक्षाच्या हायकमांडच्या निर्णयाबद्दल आपण आनंदी आहोत. ते म्हणाले की मी सर्व आमदारांचा आभारी आहे, ज्यांनी मला पाठिंबा दिला. चन्नी माझा भाऊ आहे. चरणजीत सिंह चन्नी यांना पुढील मुख्यमंत्री बनवण्याचा निर्णय जेडब्ल्यू मॅरियटमध्ये काँग्रेस विधिमंडळ पक्षाच्या बैठकीत घेण्यात आला. दुपारपासून बैठकीसंदर्भातील गोंधळ वाढला होता. चरणजीत सिंह चन्नी आणि परगट सिंह यांच्यासह काँग्रेसचे आमदार आणि नेते दुपारनंतर जेडब्ल्यू मॅरियटमध्ये पोहोचले. हरीश रावत आणि अजय माकन तिथे आधीच उपस्थित होते.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, बैठकीत सुखजिंदर रंधावा यांच्या नावाबाबत एकमत होण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत. पण काही आमदार रंधावा यांच्या नावाला विरोध करत होते. दरम्यान, मुख्यमंत्र्यांच्या निवडीसंदर्भात काँग्रेस विधिमंडळ पक्षाची बैठक पुढे ढकलण्यात आली आहे, परंतु काही काळानंतर बैठकीत घेतलेला निर्णय बाहेर आला आणि चन्नी यांची पंजाब काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते म्हणून निवड झाली.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.