Vedantu Layoffs: एडटेक (Edtech) स्टार्टअप कंपन्यांमधून कर्मचारी कपात थांबण्याचे नावच घेत नाही आहे. वेदांतु कंपनीने पुन्हा एकदा कर्मचारी कपात केली आहे. ही त्यांची चौथी कर्मचारी कपात असून यात जवळपास 385 कर्मचाऱ्यांना नारळ देण्यात आला आहे.
वेदांतुने सेल्स, एचआर, कंटेट टीमधून ही कपात केली आहे. खर्चात कपात करण्यासह ग्रोथ आणि नफा कमविण्याच्या दृष्टीकोनातून कंपनीकडून हे पाऊल उचलले जात आहे. आत्तापर्यंत वेदांतूने जवळपास 1100 कर्मचाऱ्यांना नोकरीवरून घरी घालवले आहे. कंपनीने याबाबत काहीही निवेदन केलेले नाही. यापुर्वी ऑगस्ट महिन्यात कंपनीने 100 कर्मचाऱ्यांना कामावरून कमी केले होते.
त्यापुर्वी मे महिन्यात 624 कर्मचाऱ्यांना काढून टाकले होते. मे महिन्यात कंपनीत जवळपास 5900 कर्मचारी होते. त्यातील जवळपास दहा टक्के लोकांना मे महिन्यातच कंपनीतून काढून टाकण्यात आले होते.
याच वर्षी वेदांतूने कर्नाटकात 12 वीच्या परीक्षांची तयारी करून घेणाऱ्या दीक्षा या प्लॅटफॉर्मला 40 मिलियन डॉलरमध्ये खरेदी केले होते. कंपनीच्या सीईओ आणि सहसंस्थापक वामसी कृष्णा यांनी सांगितले होते की, या टेकओव्हरमुळे जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहचता येईल.
दरम्यान, अलीकडच्या काळात वित्तपुरवठा घटल्यानंतर भारतातील एडटेक कंपन्यांमधून मोठ्या प्रमाणात कर्मचारी कपात केली जात आहे. अलीकडच्या काही महिन्यांमध्ये जवळपास 44 स्टार्टअप्सद्वारा 16,000 हून अधिक कर्मचाऱ्यांची कपात करण्यात आली आहे. यात वेदांतूसह बायजूज, अनअॅकॅडमी या एडटेक कंपन्यांचाही समावेश आहे.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.