Zendu Flower Dainik Gomantak
ब्लॉग

मागोवा नी सांगावा : झेंडुची फुले

दैनिक गोमन्तक

सुशीला सावंत मेंडीस

काल मी एका मित्राच्या घरी ‘सायबिणी’ला हजेरी लावली. ‘मदर मेरी’च्या मूर्ती एका घरातून दुसऱ्या घरापर्यंत उत्साही वातावरणात नेण्याचा हा सोहळा बहुतेक गोव्यातील लोकांच्या परिचयाचा आहे.

सायबिणीच्या स्वागतासाठी झेंडूच्या फुलांचा जुना हार काढून नवीन हार घालण्यात आला. झेंडूच्या फुलांच्या माळा वेगवेगळ्या धर्मातील उत्सवांत, सांस्कृतिक कार्यक्रमात आणि लग्न समारंभासाठीदेखील महत्त्वाच्या असतात.

या फुलांचा वापर जन्मापासून मृत्यूपर्यंत जीवनातील सर्व महत्त्वाच्या घटनांवेळी केला जातो. भारतीय सण आणि उत्सवांच्या परंपरेत झेंडूला अनन्यसाधारण महत्त्व आहे.

गोव्यात आम्ही कोकणीत यांना प्रेमाने ‘रोजां’ म्हणतो, तर उर्वरित भारतात यांना गेंडा फूल म्हणतात. झेंडूला त्याच्या बहुउद्देशीय उपयोगांसाठी आणि फायदेशीर गुणधर्मांसाठी शतकानुशतके वापरले जात आहे.

अलीकडे नवरात्रीच्या नऊ दिवसांमध्ये, झेंडूची फुले ही सजावटीची आणि पूजेत वापरली जाणारी सर्वांत लोकप्रिय फुले होती. झेंडूची फुले पावित्र्य आणि स्नेह प्रकट करतात. या फुलांना हिंदू संस्कृतीत विशेष स्थान आहे, विशेषत: नवरात्री, दसरा आणि दिवाळी यांसारख्या सणांमध्ये. इतर ठिकाणांप्रमाणेच गोव्यातही दसरा उत्सव साजरा केला जातो.

झेंडूच्या फुलांचे लहानमोठे ठेले शहरांमध्ये महत्त्वाच्या ठिकाणी आणि बाजारपेठांमध्ये दिसतात. पारंपरिकपणे, उत्सवाच्या सजावटीमध्ये झेंडूची फुले दिसतात, जी ऊर्जा आणि सौंदर्याचे प्रतीक मानली जातात.

अलीकडे गोव्यात, गोव्याच्या बाहेरून मोठ्या प्रमाणात झेंडूच्या फुलांची आवक झाल्यामुळे या फुलांची लागवड करणाऱ्या स्थानिक गोमंतकीयांना नुकसान सहन करावे लागले. गेल्या काही वर्षांपासून हे असेच सुरू आहे.

दिवाळीनिमित्त घरांची सजावट झेंडूच्या फुलांनी केली जाते. लक्ष्मीपूजनावेळी देवीला झेंडूंचे हार, फुले अर्पण केली जातात. पुजल्या जात असलेल्या प्रतिमेजवळ/मूर्तीजवळ कीटक येण्यापासून रोखण्याचे कार्य ही फुले करतात. फुलांचा सुगंध हानीकारक कीटकांना दूर करतो.

२ नोव्हेंबर रोजी, देशभरातील कॅथलिक लोक मृत पावलेल्या त्यांच्या प्रियजनांच्या कबरींना इतर फुलांसह झेंडूच्या फुलांनी सजवतात. त्यावेळी स्मशानभूमी नारिंगी आणि पिवळ्या रंगाचा समुद्र असल्यागत भासते. हे मृतांचे निवासस्थान अतिशय सुंदर आणि निसर्गरम्य बनते.

कधीकधी ‘दु:खाचे फूल’ म्हणून वर्णन केलेले झेंडूचे फूल निराश प्रेमाच्या भावनेचे प्रतीक म्हणूनही समोर आले आहे. झेंडू हे मेक्सिको आणि ग्वाटेमालाचे आहेत आणि हजारो वर्षांपासून या प्रदेशांमध्ये विधींमध्ये वापरले जात आहेत.

ही फुले अजूनही २ नोव्हेंबर रोजी असणाऱ्या मेक्सिकन सुट्टीचा एक महत्त्वाचा भाग आहेत. या दिवसाला दिआ दे लॉस मार्तोस (मृतांचा दिवस) म्हटले जाते. ताजे झेंडू किंवा कधी कधी कागदाचे बनलेले झेंडू या देशाच्या प्रियजनांच्या आत्म्याला मार्गदर्शन करतात असे मानले जाते.

मायन्स आणि अझ्टेकसारख्या प्राचीन संस्कृतींमध्येही झेंडूची पवित्र होती. या फुलांचे धार्मिक महत्त्व आणि औषधी गुणधर्म त्यांनी ओळखले होते. स्पॅनिश वसाहतवाद्यांनी या फुलांच्या बिया युरोपमध्ये आणल्या आणि मठांच्या बागांमध्ये त्यांची लागवड केली.

स्पॅनिश लोकांनी आफ्रिका, आशिया आणि संपूर्ण युरोपमध्ये व्यापार मार्गांवर फुले पसरवली. जेव्हा इंग्रज संशोधकांनी ट्युनिसला प्रवास केला तेव्हा त्यांनी तेथे झेंडू वाढताना पाहिले, ते मूळ असल्याचे गृहीत धरले आणि त्यांना ‘आफ्रिकन झेंडू’ असे नाव दिले.

आज, संपूर्ण उत्तर आणि दक्षिण अमेरिका, उत्तर आफ्रिका, आशिया आणि युरोपसह जगभरातील अनेक समशीतोष्ण आणि उप-उष्णकटिबंधीय हवामानात झेंडूचे नैसर्गिकीकरण झाले आहे.

सोळाव्या शतकात युरोपियन व्यापाऱ्यांसोबत झेंडू भारतात आले. गोव्याला त्यांची ओळख पोर्तुगिजांनी करून दिली.

हे फूल व्हर्जिन मेरीशी आणि सतराव्या शतकात क्वीन मेरीशी संबंधित होते. ‘मेरीगोल्ड’ हे नाव मदर मेरीकडून आले आहे. कारण ते शुभ प्रतीक आहे - ‘मेरीचे सोने’ आणि व्हर्जिन मेरीच्या संदर्भात वापरले जाते.

झेंडू बहुतेकदा ‘मेरी गार्डन्स’ मध्ये समाविष्ट केले जातात जे मेरीशी संबंधित फुलांसोबत लावले जातात जसे की तिच्या नम्रतेचे प्रतीक असलेल्या व्हायलेट्स, तिच्या शुद्धतेचे प्रतीक असलेले कमळ आणि तिच्या गौरवाचे प्रतीक असलेला गुलाब.

झेंडूचे मूळ नाव टेगेटेस आहे आणि त्याचे नाव एट्रस्कॅन गॉड टेजेस ‘द गॉड ऑफ विजडम’वरून मिळाले आहे. त्याची विविधता कितीही असली तरी झेंडू अवर लेडीच्या प्रतीकात्मकतेने समृद्ध आहे.

सोन्याच्या पाकळ्यांची तुलना तिच्या डोक्यावर मुकुट असलेल्या प्रकाशाच्या किरणांशी केली जाते आणि त्यांचा रंग देवाच्या योजनेसाठी स्वतःला उदारपणे समर्पित करण्याशी संबंधित आहे.

जरी हे फूल बहुतांशी हिंदू आणि ख्रिश्चन उपासनेशी संबंधित असले तरी, भारतीय उपखंडातील अनेक धर्मांच्या लोकांसाठी झेंडूचे विशेष महत्त्व आहे. किंबहुना, झेंडूचा प्रतीक म्हणून वापर हिंदू, बौद्ध आणि अझ्टेकसारख्या अनेक संस्कृतींमध्ये झाला आहे.

झेंडू बहुतेक वेळा सूर्याच्या शक्तिशाली सामर्थ्याशी जोडलेले होते. व्यक्तीच्या आंतरिक शक्ती, सामर्थ्य आणि प्रकाशाचे प्रतिनिधित्वही ही फुले करतात. हिंदू धर्मातील उत्सवांत देव आणि देवींचा सन्मान करण्यासाठी झेंडूचा विविध रूपात व्यापक वापर केला जातो.

झेंडूचा केशरी रंग त्याग दर्शवतो आणि म्हणूनच देवाला आदर आणि समर्पणाचे प्रतीक म्हणून झेंडूचे फूल अर्पण केले जाते.

झेंडूची फुले शुभ आहेत आणि भारतातील धार्मिक उपासनेमध्ये महत्त्वपूर्ण भूमिका बजावतात. जरी कोणतेही फूल प्रेमाने आणि भक्तीने अर्पण केले जाऊ शकते, विशिष्ट फुले विशिष्ट देवतांना आवडतात.

भगवान शिवाला कमळे आवडतात, तर देवी लक्ष्मी झेंडूला प्राधान्य देते. पौराणिक कथांची पाने कोणत्या देवाला कोणते फूल आवडते अशा कथांनी सजलेली आहेत. फुलांमध्ये पिवळा हा रंग सरस्वतीचा आवडता रंग असल्याने सूर्यफूल, गुलाब, झेंडू ही फुले तिला अर्पण केली जातात.

गणपतीला कोणतेही लाल (गुलाब), पिवळे (सूर्यफूल) किंवा केशरी (झेंडू) फुले अर्पण केली जातात आणि विशेषत: दूर्वा, जास्वंदीची लाल फुले वाहिली आणि झेंडूच्या फुलांचा हार घातला की, गणपतीबाप्पा प्रसन्न होतात.

झेंडूचे फूल आनंद, उत्कटता आणि सकारात्मक ऊर्जेचे प्रतीक म्हणून दिले जाते. विविध पाककृतींचा रंग, पोत, आकारमान आणि चव वाढवू शकते. अंड्यातील पिवळ्या रंगाचे पिवळे रंगद्रव्य वाढवण्यासाठी झेंडूचा वापर पोल्ट्री फीडमध्ये पिवळा रंग म्हणून केला जातो.

चीज आणि बटरला अधिक आकर्षक पिवळा लूक देण्यासाठी झेंडूचा नैसर्गिक रंग म्हणून वापर केला जातो. वाळलेली फुलेही अधिक आकर्षक दिसण्यासाठी ठरावीक चहामध्ये टाकतात.

आयुर्वेदिक आणि युनानी औषधांनुसार, झेंडूच्या फुलांमध्ये आणि पानांमध्ये दाहक-विरोधी, अँटीपायरेटिक, अँटीमाइक्रोबियल आणि एपिलेप्टिक प्रभाव असतो.

त्वचेची जळजळ कमी करण्यासाठी झेंडूचा वापर सामान्यत: टिंचर, मलम यात केला जातो. झेंडूची फुले तुमच्या केसांची हरवलेली चमक परत मिळवून देण्यास मदत करतात आणि त्यात काही प्रथिने असतात ज्यामुळे केसांची वाढ होते.

कोणत्याही बागेत लक्षवेधी रंग भरण्याव्यतिरिक्त, झेंडूची फुले परागीकरणात सहभाग देणाऱ्या हमिंगबर्ड्स, मधमाश्या आणि फुलपाखरे यांना आकर्षित करतात.

केशरी किंवा पिवळ्या फुलांची दाट डोकी बागेच्या सीमेवर किंवा भाजीपाल्याच्या बागेतील कीटकांना रोखण्यासाठी लावली जातात. इतर संस्कृतींचा असा विश्वास आहे की झेंडू हे सोन्याचे भांडे दर्शवतात आणि ते चांगल्या नशिबाचे प्रतीक आहेत.

झेंडूची फुले शुभ मानली जातात आणि मंदिर आणि घराच्या मुख्य दरवाजावर तोरण म्हणून लावली जातात.

एक स्वतंत्र लेखिका असलेल्या अदिती माहेश्वरी म्हणतात, ‘झेंडूंच्या फुलांमध्ये शुद्धता आणि पावित्र्य आहे. सांसारिक सुखदु:खांकडे सम दृष्टीने पाहण्याची विरागी वृत्ती आहे.

पण, त्याचबरोबर येणारी उदासीनता नाही. उत्सवी, रोमँटिक किंवा दुःखद, कशाही प्रकारचे वातावरण असो, या फुलांकडे साधेपणा आहे’.

पोर्तुगिजांनी गोव्यात आणलेल्या झेंडूचा वापर आज हिंदू आणि ख्रिश्चन दोघेही त्यांच्या विधी आणि समारंभासाठी करतात.

जरी पिवळ्या रंगाच्या वेगवेगळ्या छटा घेऊन झेंडूचे फूल येत असले तरी नारंगी, भगवा रंग समाजात अधिक लोकप्रिय आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Ranji Trophy 2024: गोव्याचे आजपासून मिशन सिक्कीम! मागच्या लढतीतील चुका टाळण्याचे आव्हान

BCCI T20 Tournament: गोवा महिला क्रिकेट संघाची दणदणीत कामगिरी! जम्मू-काश्मीरचा आठ विकेट राखून पराभव

Karnataka: मुरुडेश्वर मंदिरात बॉम्बस्फोट करण्याचा कट उधळला, कर्नाटकात सहा दहशतवाद्यांना अटक

CM Pramod Sawant: राष्ट्रीय प्रवासात 'गोवा' महत्त्वाची भूमिका बजावेल! मुख्यमंत्री सावंतांनी व्यक्त केला विश्वास

Sancoale News: क्विनीनगरात तणाव! 'रस्ता' प्रश्नावरून नागरिक आक्रमक'; आमदार वाझ यांची मध्यस्थी

SCROLL FOR NEXT