Government Employees Dainik Gomantak
ब्लॉग

Government Employees: सरकारी कर्मचारी खरेच सुधारतील?

आज सरकारी नोकरी मिळणे म्हणजे गुलबकावलीचे फुल मिळविण्यासारखे आहे.

गोमन्तक डिजिटल टीम

मिलिंद म्हाडगुत

‘परदे मे रहने दो, परदा ना उठाओ, परदा जो उठ गया तो भेद खुल जायेगा ’ हे’ शिकार ’ या जुन्या चित्रपटातील गाणे आजच्या सरकारी नोकरांना तंतोतंत लागू पडते. या सरकारी कर्मचाऱ्यांचे ‘परदे के पीछे’ काय चालू असते हे सर्व ज्ञात आहे.

हल्लीच कृषिमंत्री रवि नाईक यांनी नागरिक खात्याच्या सरकारी कार्यालयाला दिलेल्या भेटीत याचा प्रत्यय आला. त्यांनी अचानक दिलेल्या या भेटीत अर्ध्याहून अधिक कर्मचारी गायब असल्याचे आढळले. त्याचप्रमाणे आवश्यकतेपेक्षा जास्त कर्मचारी असल्याचेही दिसून आले.

आज सरकारी नोकरी मिळणे म्हणजे गुलबकावलीचे फुल मिळविण्यासारखे आहे. बहुतेक नोकऱ्या या मंत्र्याच्या आशीर्वादानेच मिळत असतात हेही आता लपून राहिलेले नाही.

पण एकदा का नोकरी मिळाली की, हेच सरकारी नोकर ‘लाटसाहब’ असल्यासारखे वागायला लागतात. वेळेवर न येणे, आलेच तर लोकांना कामाच्या बाबतीत सतावणे असे प्रकार सुरूच असतात.

काही मंत्रीही याला खतपाणी घालत असतात. लोकांनाही नाइलाजाने त्यांच्या हातातली कठपुतली व्हावे लागते. त्यांना दुसरा पर्यायही नसतो.

आपण सरकारचे पर्यायाने जनतेचे नोकर आहोत, याची या कर्मचाऱ्यांना जाणीवच नसते. पण परवा रविंनी पणजी येथील नागरिक खात्याच्या कार्यालयांना भेट देऊन या सरकारी नोकरांचा ’पर्दाफाश’ केला.

काही कर्मचाऱ्यांना त्यांनी जाबही विचारला. पण खरे तर हे दुखणे जुनेच आहे. सरकारी नोकरांचा हलगर्जीपणा हा एक न संपणारा विषय आहे. मागे मुख्यमंत्र्यांनी कामात लापरवाही करणाऱ्या सरकारी नोकरांवर कारवाई केली जाईल अशी घोषणा केली होती. पण ही घोषणा होऊनही कर्मचारी काही सुधारलेले दिसत नाहीत.

रवि हे तसे कडक शिस्तीचे नेते म्हणून ओळखले जातात. अनेक बड्या बड्या धेंडांना त्यांनी वठणीवर आणले आहे, हा इतिहास आहे. यावेळी काही पत्रकारांनी त्यांना ते मुख्यमंत्री असतानाची कायदा व सुव्यवस्था आज का नाही, हा प्रश्‍न विचारला. त्यावेळी त्यांनी सरकारला सांभाळून घेणारे उत्तर दिले असले तरी वस्तुस्थिती सर्वांनाच माहिती आहे.

आज रविंची ती जिगरबाज वृत्ती दिसेनाशी झाली आहे हेच याचे खरे उत्तर आहे. नाहीतर मुख्यमंत्र्यांनी कामचुकार सरकारी नोकरांची गय केली जाणार नाही, अशी जी इशारा वजा तंबी दिली होती ती सरकारी कर्मचाऱ्यांनी गांभीर्याने घेतली असती.

मनोहर पर्रीकर मुख्यमंत्री असताना त्यांना सरकारी नोकर चळाचळा कापायचे. पण आज तो धाक लुप्त व्हायला लागला आहे. रविंनी परवा आपल्या पूर्वीच्या धाकाची एक झलक दाखविली. मागे क्रीडामंत्री गोविंद गावडे यांनीही काही मैदानांना आकस्मिक भेटी देऊन अनुपस्थित व लेट आलेल्या कर्मचाऱ्यांना फैलावर घेतले होते.

आता रविंनीही याची सुरुवात केली आहे. पण हा प्रकार रवि वा गोविंद यांच्यापुरताच मर्यादित राहता कामा नये. याचे अनुकरण प्रत्येक मंत्र्यांनी केले पाहिजे. मुख्य म्हणजे मुख्यमंत्र्यांनी हा विषय गांभीर्याने घेतला पाहिजे.

कामचुकार कर्मचाऱ्यांवर जर कारवाई केली गेली तर या कर्मचाऱ्यांच्या बेजबाबदार वृत्तीमुळे पीडित झालेल्या नागरिकांना दिलासा मिळू शकेल. त्याचबरोबर रविंनी म्हटल्याप्रमाणे नागरी पुरवठा खात्यात जसे आवश्यकतेपेक्षा जास्त कर्मचारी आहेत, तसेच ते इतर खात्यातही असू शकतात.

असू शकतात म्हणण्यापेक्षा आहेतच म्हणणे संयुक्तिक ठरू शकेल. ही खोगीर भरती का झाली याचा आढावाही मुख्यमंत्र्यांनी घेतला पाहिजे . रवि नाईक हे विद्यमान मंत्रिमंडळातील ज्येष्ठ मंत्री आहेत.

त्यामुळे त्यांच्या पावलावर पाऊल ठेवण्याचे काम इतर मंत्र्यांनी केले पाहिजे. तरच परवा रविंनी कर्मचाऱ्यांना चपराक दिल्याचा उपयोग होऊ शकेल. अन्यथा हा प्रकार म्हणजे ‘एक दिन का तमाशा’ ठरेल हेच खरे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Karthik Aaryan In Goa: 'रुह बाबा'नं पुन्हा जिंकलं चाहत्यांचं मन; गोव्यात एन्जॉय करतानाचे फोटो केले शेअर!

Winter Care Tips: हिवाळ्यात त्वचेची घ्या विशेष काळजी; 'हे' घरगुती उपाय नक्की ट्राय करा!

Margao Police: हुल्लडबाजांना चाप; मडगाव पोलिसांनी जप्त केल्या मॉडिफाईड बुलेट

South Goa Beach: दक्षिण गोव्यातील समुद्र किनाऱ्यांची धूप वृध्दी सुरुच; राष्ट्रीय अभ्यासातून खुलासा!

Shruti Prabhugaonkar: गोमंतकीयांना कोट्यवधी रुपयांना गंडवणाऱ्या श्रुतीला अवघ्या १० दिवसात जामीन

SCROLL FOR NEXT