Technology and Communication: तंत्रज्ञान महान, करते जग लहान

इंग्रजांच्या काळात जो विलायतेला पत्रव्यवहार होत असे ते टपाल जहाजांवरून पाठवले जात असे.
Technology and Communication
Technology and CommunicationDainik Gomantak

प्रसाद पाणंदीकर

आमच्या वेळी शाळेत भूगोल विषयात एक महत्त्वाचा प्रश्‍न परीक्षेला हमखास विचारला जायचा. तंत्रज्ञान आणि दळणवळण क्षेत्रात प्रगती होऊन जग कसे लहान होत चालले आहे, हे तपशीलवार सिद्ध करा!! (कदाचित हा प्रश्‍न अजून अभ्यासक्रमात असावा)

त्यावेळचा या विषयातील हा एक नेहमीचा प्रमुख प्रश्‍न होता. कदाचित नववीच्या अभ्यासक्रमातील असावा. ही 70च्या दशकातील गोष्ट आहे. त्यानंतर आम्ही आमच्या शिक्षकांनी लिहून दिलेले व घोकून तोंडपाठ केलेले उत्तर तिकडे लिहून देत असू.

या प्रश्‍नाचा मूळ आशय असा होता की तंत्रज्ञानातील प्रगतीमुळे दूरदूरच्या सातासमुद्रापलीकडच्या लोकांचे प्रात्यक्षिक व बोलायचे संबंध कसे सहजसुलभ झालेले आहेत. लक्षात घ्या की वर नमूद केलेली घटना विसाव्या शतकातील सत्तरच्या दशकातील आहे. तेव्हा फक्त प्रगती होती ती म्हणजे विमान वाहतूक व जुजबी दूरध्वनी दळणवळण. सहजसुलभ संगणक, इंटरनेट व भ्रमणध्वनीचा तेव्हा जन्मसुद्धा झालेला नव्हता.

जेव्हा पाचशे वर्षापूर्वी 1497च्या आसपास जगप्रसिद्ध दर्यावर्दी वास्को द गामा याने पोर्तुगालहून भारताकडे सागरी मार्गाने कूच केले, तेव्हा त्याला दक्षिण आफ्रिकेच्या भूशिराला वळसा घालून कोझिकोड केरळ येथे पोहोचण्यास तब्बल दोन वर्षे लागली.

कालांतराने सुएझ कालवा चालू झाला व जहाजे इंग्लंडहून भारतात सहा महिन्याच्या कालावधीत पोहोचायला लागली. शेवटी डिझेल इंजिनाचा शोध लागून हा काळ आणखी कमी झाला. आज चांगल्या वेगवान जहाजाला याच प्रवासाला जवळपास तीन आठवडे लागतात.

इंग्रजांच्या काळात जो विलायतेला पत्रव्यवहार होत असे ते टपाल पण याच जहाजांवरून पाठवले जात असे. त्यामुळे पत्र पोचण्यास सहा महिने व उत्तर मिळण्यास जवळपास एक वर्ष पार होऊन जात असे. शेवटी 1844 साली तार चालू झाली तर 1876 साली अलेक्झांडर ग्रॅहम बेल यांनी दूरध्वनीचा शोध लावला. त्यामुळे दूरच्या दोन टोकांच्या अंतरावरील लोकांना एकमेकाशी संबंध प्रस्थापित करायला किंवा तत्काळ बोलता येऊ लागले व जग थोडे लहान झाले.

दूरध्वनीबद्दल गोव्याच्याबाबतीत बोलायचे म्हणजे गोव्यात 1990 पूर्वी फक्त काही निवडक लोकांकडे दूरध्वनी होते. प्रत्येक शहराचे वेगळे व छोटेखानी दूरध्वनी केंद्र होते. तंत्रज्ञान एकदम मागासलेले होते. त्यामुळे मडगावहून पणजीला संपर्क साधायचा म्हणजे ट्रंककॉल बुक करावा लागे.

साधारण, तातडीचा व तत्काळ अशा तीन पद्धती होत्या व त्याप्रमाणे वेळ लागायचा. मला आठवतेय माझ्या वडिलांनी मडगाव दूरध्वनी केंद्रावर जाऊन मडगाव-सावर्डे ट्रंक कॉल बुक केलेला जो मिळायला दोन तास लागले व 2 मिनिटे बोलण्याचे भाडे होते तब्बल सोळा रुपये (1974 साल).

हे असे दूरध्वनी केव्हा चालेल व केव्हा बंद पडेल याची काहीच शाश्‍वती नसायची. थेट सुविधा नसल्याने दूरध्वनी ऑपरेटरांची मक्तेदारी चालायची. नंतर थेट दूरध्वनी सुविधा उपलब्ध झाल्या. पण त्या एसटीडी कोड वापरून कराव्या लागत असत.

जवळपास 1995 नंतर भारतीय दूरध्वनी तंत्रज्ञानात चांगल्यापैकी सुधारणा झाल्या. दूरध्वनी जाळ्याचे मोठ्या प्रमाणावर विस्तारीकरण करण्यात आले. मुख्य शहराशिवाय अनेक गावांत दूरध्वनी केंद्रे उभारण्यात आली. दूरध्वनी गावोगावी पोचले. सगळ्यांच्या घरी ते दिसू लागले. सगळे कॉल्स स्वयंचलित झाले व राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय दूरध्वनी सहजसुलभ रीतीने केले जाऊ लागले.

जवळपास 1997 साली पेजर नावाची वस्तू बाजारात आली. इथे थेट बोलायची सुविधा नव्हती. पण पाहिजे तो संदेश एकदम संक्षिप्त पद्धतीने दुसऱ्या पेजर असलेल्या व्यक्तीला पाठवण्याची सुविधा होती. हा पेजर जास्त दिवस टिकला नाही कारण ताबडतोब भ्रमणध्वनीचे बाजारात आगमन झाले.

1998 साली काही मोजक्याच भ्रमणध्वनी सेवा प्रदान करणाऱ्या कंपन्या अस्तित्वात होत्या. भ्रमणध्वनी उपलब्ध होते ते पण साधे, जुजबी पद्धतीचे व अवाढव्य आकाराचे. कव्हरेज एकदम कमी, संभाषण करणे एकदम महागडे होते.

येणाऱ्या कॉलला पण पैसे मोजावे लागत. तरीसुद्धा परिस्थिती अशी होती की, भ्रमणध्वनी असलेली व्यक्ती एकदम श्रीमंत गणली जायची व त्यामुळे असल्या व्यक्तीला आयकर परतावा भरणे अनिवार्य करण्यात आलेले होते.

साधारण २०११साली भारतीय बाजारात स्मार्टफोन अवतीर्ण झाले व दळणवळणात एकदम मोठी क्रांतीच घडून आली.

आज भ्रमणध्वनी म्हणजे एक मूलभूत गरज होऊन गेलेली आहे. तो आज कोणाच्याही हातात, अक्षरशः भिकाऱ्याच्या हातातसुद्धा दिसून येतो. आज फक्त खऱ्या वस्तू किंवा पैशांची देवाणघेवाण सोडल्यास अशी एकही गोष्ट अशी नाही जी भ्रमणध्वनीवर केली जाऊ शकत नाही, बँकेचा व्यवहार धरून कुठलेही बिल फेडणे, पैसे पाठवणे, कर भरणे, पत्रव्यवहार करणे, सामान किंवा कसलीही औषधे, जेवण घरपोच मागवणे आज सहजसुलभ होऊन गेलेले आहे.

अभियांत्रिकी क्षेत्रांत तर एक अतिशय किचकट व गुंतागुंतीचे रेखाचित्र, पत्र व पुस्तक अवघ्या काही सेकंदात जगाच्या कुठल्याही कानाकोपऱ्यात पोहोचवले जाऊ शकते.

वैद्यकीय क्षेत्रात अमेरिकेत बसून डॉक्टर भारतात यंत्रमानवाद्वारे शस्त्रक्रिया करू शकतो. कुठल्याही खंडात किंवा शहरात बसून संगणकावर पाहिजे तशी चित्रपरिषद घेतली जाऊ शकते. व्हिडिओ कॉल करून एकमेकाशी बघून बोलले जाऊ शकते.

Technology and Communication
Ponda News: माशेल पंचकोशीत मासळी मार्केटचा तिढा कायम

वाहतूक क्षेत्र पाहता आज अवघ्या काही तासांतच वेगवान आरामदायी विमानाने आपण युरोप किंवा अमेरिकेच्या महानगरात पोहोचू शकतो. बुलेटट्रेनसारखी गाडी आज जमिनीवर अक्षरशः विमान वेग गाठू शकते.

आज रस्त्यावर गाड्या 150 ते 200 किमी प्रतितास वेगाने हाकल्या जाऊ शकतात. ड्रोनसारख्या उपकरणाने वाहतूक व अनेक क्षेत्रांत मोठी किमया केली जाऊ शकते.

अशीच जर तंत्रज्ञानाची घोडदौड सुरू राहिली तर असे दिवस दूर नाही की जसे पुराणात जसे देव प्रकट व्हायचे व अंतर्धान पावायचे तसे साधारण लोक पण भ्रमणध्वनी वापरून दुसरीकडे प्रकट होऊ शकतील. यात डोळ्यासमोर दुसरीकडून बोलणाऱ्या व्यक्तीची त्रिमितीय प्रतिमाच तयार होईल, जसा जिवंत चालता बोलता माणूस. याला ‘त्रिमितीय होलोग्राफिक इमेज’ म्हणतात.

Technology and Communication
Gomantak Parent Council: ‘गोमंतक पालक परिषद’ मंच स्थापन करणार

शेकडो वर्षांपूर्वी शिडाच्या जहाजातून हजारो मैल दूर माहीत नसलेल्या भूमीच्या शोधात, माहीत नसलेल्या मार्गाने निघायचे व त्या जाग्यावर सफलतेने पोहोचायचे या जगप्रसिद्ध दर्यावदींच्या जिद्दीला व साहसाला तोड नाही.

वास्को द मा, ख्रिस्तोफर कोलंबस, अमेरिगो वेस्पुसी, फर्डिनांड मॅगेलेनसारखे अनेक जगप्रसिद्ध दर्यावदी शोधक होऊन गेले ज्यांनी नवे खंड, भूमी व बेटे किंवा वाटा अपार काबाडकष्ट करून जोखीम घेऊन शोधून काढल्या. तेव्हा जी.पी.एस. होते ते म्हणजे आकाशातील नक्षत्रे व अंतर्ज्ञान.

आज तेच तंत्रज्ञान एकदम प्रगतिशील व सहजसुलभ झालेले आहे व होतच आहे. ज्या मार्गक्रमणाला पूर्वी दोन दोन वर्षे आणि अतोनात श्रम लागायचे तेच काम आता अवघ्या काही तासाने एकदम आरामदायी पद्धतीने केले जाऊ शकते किंवा कुठल्याही जगाच्या कोपऱ्यात अवघ्या काही सेकंदात संबंध प्रस्थापित केला जाऊ शकतो.

तंत्रज्ञानाच्या या अप्रतिम उत्तरोत्तर प्रगतीमुळे आपले प्रचंड जग दिवसेंदिवस लहानच होत चाललेले आहे व भविष्यात तंत्रज्ञानाची गरुडझेप पाहता जग आणखी लहान होईल यांची चिन्हे दिसतच आहेत.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com