कमलाकर द. साधले
‘वाघोबा, तू म्हणे जंगलाचा राजा. पण तू आहसा क्रूर राजा. प्रजेवर अन्याय करणारा. आमचे राजे आम्हाला किती सुखसोई देतात, रेशन देतात, ते शिजविण्यास गॅस देतात, पाणी घरापर्यंत आणून देतात, कचरा, सांडपाणी घेऊन जातात. मुलगी मोठी झाली तर ‘लाडली लक्ष्मी’ म्हणून संसारासाठी लाख रुपये देतात, लोकांना रिझवण्यासाठी कलांना प्रोत्साहन देतात.
तू मात्र सदैव आपल्या प्रजेला ़डरकाळ्या फोडून घाबरवीत असतोस, गरीब बिचारी हरणे त्यांना तू मारून अर्धे खातोस व घाण अवशेष टाकून देतोस. त्या हरणांनी काय तुझे घोडे मारले आहे? ती बिचारी गवत, पाने खाऊन जगतात, ज्या गवताचा तुला काडीचा उपयोग नाही.’
‘अरे दीड शहाण्या माणसा, तू आहेस बंदी गुलाम. गोठ्यात बांधून ठेवलेल्या बैलासारखा, आयते गवाणीत आणून टाकलेल्या गवताच्या पेंढीवरच धन्यता मानणारा. माळरानात वाढलेल्या लुसलुशीत हिरव्या चाऱ्याचा कधी आस्वाद घेतलाय का? गायी-वासरांबरोबर माळावर मुक्त उधळलास का?
ओहोळात उतरून स्वच्छ झऱ्याचे पाणी प्यालास का? मी माझ्या हरिणांना, इतर सर्व प्राण्यांना माझ्या राज्यांतील सर्व काही खाण्यास, पिण्यास, जीवन उपभोगण्यास पूर्ण स्वातंत्र्य दिलेले आहे.
तुझ्या राज्यांतील काहीजण आवश्यकतेपेक्षा जास्त लुटतात आणि साठवून ठेवतात. त्यामुळे गरीब-श्रीमंत, हा तीव्र भेद आहे. अति खाणारे ढेरपोटे आणि पाटीला पोट चिकटलेले, अर्धपोटी ही तुझ्याच राज्याची अवस्था, गदिमांची क्षमा मागून:- या पृथ्वीच्या पाठीवर ना प्राणियास आधार| मानवा, अजब तुझे सरकार अशी झाली आहे.
हरिणांना मी मारतो. तुझ्या राज्यात माणसे महिनोन्महिने अंथरुणावर खिळून यातना सोसत जगत असतात. त्यांपेक्षा काही मिनिटांच्याच मरणयातना हा सुखान्त मानला पाहिजे. हरिणांना मी मारतो म्हणजे निसर्गनियमांचे पालनच करतो. सृष्टीचेच नव्हे तर हरिणाच्या जातीचे ही संरक्षण करतो.’
‘अरे वा !! ते कसे काय वाघोबा?’
‘हे पहा. हरित व बऱ्याच तृणभक्षी प्राण्यांची वीण जलद असते. हरिणे व तत्सम तृणभक्षी प्राण्यांना कुणीच मारले नाही तर त्यांची संख्या अमाप वाढेल. एका जोडीपासून एका दशकात पिल्ले, नातरे, पणतुरें वगैरे करीत शेकडो प्राणी निर्माण होतील.
ती गवत व झाडे झुडपे हेच खातात ना? ती संपून जातील. मग त्यांची उपासमार होईल. म्हणून त्यांची संख्या नियमित करून ती जीवजात जिवंत ठेवावी यासाठी सृष्टीने आमची नेमणूक केली आहे.
तुम्ही माणूस या पृथ्वीवर येण्यापूर्वीपासून सृष्टीची ही व्यवस्था आजपर्यंत चालू आहे. हरिणे नाहीशी झाली नाहीत. आज एक-एक जीवजात भूतलावरून कायमची नाहीशी होत आहे ती शिकारी प्राण्यांमुळे नव्हे, माणसामुळेच!
तुझा दुसरा एक आक्षेप आहे की, मी मारलेल्या प्राण्यांची प्रेते अर्धवट खाऊन तेथेच टाकून जातो. हे तुम्हांला तुमच्या चुकीच्या निकषांवरून वाटते. ही आमची भागीदारीची पद्धत आहे. तरस, कोल्हे, वगैरेंना मोठ्या शिकारी करण्याची कुवत नाही. तसेच हाडांच्या जोडांतील मांसल भाग काढून खाणे आम्हाला जमत नाही.
ते काम हे प्राणी, गिधाडे व पक्षी करतात, त्यांचे अन्न बनते आणि स्वच्छ केलेही हाडेच राहतात. कुजलेल्या मांसातील किडेही पक्षी फस्त करतात. निसर्गाच्या स्वच्छतेची नियमावली आम्ही पाळतो. अरण्य, पाणवठे, स्वच्छ, सुंदर, आरोग्यपूर्ण राखतो. माणसासारखे कचरा, हवापाण्याचे प्रदूषण नाही.’
‘वाघदादा तुलाही युक्तिवाद करता येतात तर! पण, लक्षांत ठेव तू युक्तिवादात माणसाला हरवू शकणार नाहीस. तू अरण्याचा राजा म्हणतोस. तेथील प्राण्यांची, त्यांच्या खाण्यापिण्याची काळजी वाहणारा म्हणतोस.
मग तुझ्या अरण्यातील वानर, गवे, हत्ती, शेकरू, रानडुक्कर, बिबळे हे अन्नासाठी आमच्या शेती बागायतीत घुसतात, खाण्यापेक्षा नासाडी जास्त करतात. त्यावर तुझे नियंत्रण कुठे आहे? नासाडी न करण्याचे सृष्टीचे तत्त्व कुठे आहे.?’
‘भल्या माणसा वाद, युक्तिवाद, वितंडवाद हे क्षेत्र माणसाच्या बौद्धिक अहंमन्यतेचे. माझेच खरे, तुझे खोटे हे सिद्ध करण्याची अहमहमिका हे शहाणपणाचे लक्षण नव्हे. आता जी परिस्थिती वर्णन केली ती माणसामुळेच उद्भवली आहे. गवे पूर्वीही होतेच. पण अल्प प्रमाणात, म्हणून त्याला गोवा राज्य प्राण्याचा दर्जा देण्यात आला.
त्याला संरक्षण देण्यात आले. त्यांची प्रजा बादली. त्याच्या वाढीवर नियंत्रण ठेवू शकणारा प्राणी म्हणजे पट्टेदार ढाण्या वाघ. त्याच्यावर तुमच्या राज्यकर्त्यांची सदैव खप्पा मर्जी. त्याचा हा अधिवास असूनही तो नाकारणे हेच सदैव त्याचे धोरण राहिले.
त्याने अन्न चितळे, सांबर, रानडुक्कर यांची शिकार बेसुमारपणे शहरी शिकाऱ्यांकडून होऊ लागली. तसा त्याचा या अरण्यांतील वावर कमी झाला. पण गवा हा मोठा प्राणी. त्याला राज्यपशूचा दर्जा.
म्हणून त्याच्या वाटेला कुणी गेले नाही. त्याची प्रजा वाढत गेली. अरण्यामध्ये आडवेउभे रस्ते आले, खाणी आल्या. अकेशिया, निलगिरी, सागवान या नैसर्गिक अरण्याला आणि पर्यावरणाला न मानवणाऱ्या एकजातीय वृक्षांच्या मोठया लागवडी आल्या.
ठिकठिकाणी लोह-मँगनीजच्या खाणी आल्या, त्यांचे रस्ते आले-खाणीतील टाकाऊ माल फेकण्यासाठी खाणींच्या तिप्पट जागा लागते. पुनः तेवढ्या अरण्य भूमीवर आक्रमण झाले.
विस्कळीत झालेला प्रत्येक भाग युपिटोरियम वीड या विषवल्लीने व्यापला, गवत व तृणभक्षी प्राण्यांना लागणारी स्थानिक झाडे झुडपे संपली. नैसर्गिक अरण्य आकसले. मग कुठे जाणार हे शाकाहारी गवे? त्यांना अरण्याच्या सीमा ओलांडून शेती- बागायतीत घुसण्याशिवाय पर्यायच नव्हता.
वानरे, माकडे, शेकरू यांना अकेशिया, निलगिरी, सागवान या झाडांवर काय मिळणार? रानडुकरांना, साळिंदरांना या नवीन वृक्षवल्लींच्या मुळ्यांचा काहीही उपयोग नाही. मग ही मंडळी जाणार कुठे? हत्ती हा ऋतुपरत्वे स्थलांतर करणारा प्राणी.
शतकानुशतके त्याच्या ठरलेल्या वाटा: त्यांना ‘लिफ्ट कॉरिडोअर’ म्हणून ओळखले जाते. मानवी लुडबुडीमुळे त्याच्या वाटा विस्कटल्या गेल्या. हा महाकाय प्राणी गोंधळत आहे. बागायतीत घुसून पिकांची नासाडी करीत आहे.
आता अरण्याला आगी लावण्यास सुरुवात झाली आहे. अरण्य अजून आकसते आहे. हरणे, चितळे, भेकरे कमी झाली तर गावांतील कुत्री, शेळ्या, गुरे- वासरे हीच बिबळ्यांची शिकार राहील, याला कारण तुम्हीच माणसे.’
‘आठवड्यापूर्वीचीच बातमी ’परदेशांतून आणलेल्या चित्यांना शिकार कमी पडते. म्हणून हरिणजातीची कृत्रिम पैदास करण्याचा सरकार विचार करीत आहे’. वनखाते (पाळीव) पशुसंवर्धन खात्याचे काम करणार का?
चुकीच्या मार्गाने गेल्यास समस्या उद्भवणारच. पण माणसाची अहंमन्यता त्याला माघार घेऊ देत नाही. तो समस्येवर आपल्या बुद्धीचा वापर करून उपाययोजना जारी करतो. या प्रत्येक उपाययोजनेतून नव्या दहा समस्या निर्माण होतात. पण ‘अरण्याला, सृष्टीला, त्यांच्या तंत्राप्रमाणे राहू द्या’ हा सोपा उपाय मान्य करणार नाही!’
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.