Success Dainik Gomantak
ब्लॉग

मला सांगा... 'यश' म्हणजे नक्की काय असतं?

दैनिक गोमन्तक

आमच्या शेजारी एक कुटुंब राहतं, त्यांची अन्वी नावाची ५ वर्षांची गोड मुलगी आहे. साधारण सिनियर केजीमध्ये असेल ती. परवा तिचा जोरजोरात येणारा आवाज ऐकून मी तिच्याकडे गेले. तर ती तिच्या आईला काहीतरी सांगत होती ते मी ऐकलं, “मम्मा, आय लॉस्ट इन द पोटॅटो रेस..”, असं म्हणत ती तिचं दुखणं आईला सांगत होती आणि आई अगदी लडिवाळपणे तिचं सगळं काही ऐकत होती. त्यावर तिची आई म्हणाली, “अगं हरलीस तर काय झालं, ईट्स ओके बेटा.. पुढच्या वेळी पुन्हा ट्राय कर”, “पण मम्मा मी हरले म्हणून आता मला क्लासमध्ये सगळे हसणार गं..”, अन्वी म्हणाली. दोघींच्या या संभाषणात मी सहभाग न घेणंच पसंत केलं. ही गोष्ट तशी किरकोळ वाटली तरी खूप मोठा विषय त्यात दडलाय असं मला वाटतं.

अगदी अश्मयुगीन काळापासूनच माणसामध्ये विविध भावना जन्म घेऊ लागल्या. प्रेम, आदर, राग, द्वेष, मोह, माया, इर्षा या सगळ्यांमुळेच आपण माणूस म्हणवले जातो. आपण समाजशील प्राणी असल्यामुळे समाजाशी निगडीत सर्व गोष्टी आपसूकच आपल्याला लागू होतात. कोण श्रेष्ठ.. कोण कनिष्ठ या गोष्टी सुद्धा समाजातूनच सुरू होतात. श्रेष्ठत्व आलं की तिथं यश - अपयशाचा भागही आलाच. नेमकं काय असतं हे यश ? नेमकं कुणाला यशस्वी म्हणायचं..? प्रत्येकाच्या दृष्टीनं यशाची आणि अपयशाची व्याख्या वेगवेगळी असू शकते. पण गरजेचं नाही की ती व्याख्या अगदी बरोबरच असेल किंवा ती सगळ्यांसाठी लागू होईल. एखादी गोष्ट मिळवणं, त्यासाठी वाटेल ते करणं म्हणजेच यश, असं बऱ्याच जणांना वाटतं. पण ती गोष्ट करतानाची प्रक्रिया, ती मेहनत किंवा तो प्रामाणिक प्रयत्न, ह्या गोष्टीही तितक्याच महत्वाच्या आहेत, नाही का..? म्हणूनच तर म्हंटल जातं, की 'अपयश ही यशाची पहिली पायरी असते'. आता अपयश म्हणजे काय..? पुन्हा तेच, की आपल्याला हवी असणारी एखादी गोष्ट आपण मिळवायला कमी पडलो, हरलो म्हणजे आपण अपयशी झालो का..? तर नाही. कारण ती गोष्ट मिळवत असताना आपण घेतलेली मेहनत, आत्मसात केलेलं ज्ञान आणि प्रयत्न, या गोष्टींचं महत्व आपण विसरूनच जातो. कुठे ना कुठेतरी या गोष्टीसुद्धा माणूस म्हणून आपल्या आयुष्याच्या खात्यात जमा होतंच असतात की..!

काय झालंय ना, गेल्या काही दशकांपासून आयुष्याच्या अगदी प्रत्येक क्षेत्रात स्पर्धा इतकी वाढलीये, की यात आपण स्वत:लाच कुठेतरी हरवून बसलोय, असं मला वाटतं. सुरुवातीला थोडं बरं होतं, की निदान गोष्टी खिलाडू वृत्तीनं हाताळल्या आणि समजून घेतल्या जायच्या. पण हल्ली, हरणं ही अत्यंत लाजिरवाणी गोष्ट वाटते अनेकांना. किंबहुना हार पचवण्या एवढी मानसिकता आणि संयमच आता कुणामध्येही दिसेनासा झालाय.

कुठेतरी या गोष्टींची सुरुवात आपल्या स्वत:च्या घरातूनच होते. उदारणार्थ सांगायचं झालं तर, आपल्या मुलाला कितीही चांगले मार्क्स मिळूदे, ते आई-बाबांना कमीच वाटतात. करण काय तर, शेजारच्या मुलाला आपल्या मुलापेक्षा 2-3 टक्के जास्त असतात. या सगळ्या चढा-ओढीत पालकांची आपापसातच वेगळी स्पर्धा सुरू असते, आणि यात भरडले जातात ती म्हणजे त्यांची मुलं. याउलट घरात आणि शाळेपासून मुलांना हे शिकवलं पाहिजे, की हार-जीत हा प्रत्येक खेळाचा आणि पर्यायानं आयुष्याचा भागच आहे. या दोन्हीही गोष्टी आपण तितक्याच आनंदानं आणि खिलाडू वृत्तीनं स्वीकारल्या पाहिजेत.

बरं, खूपदा असंही असतं की, प्रत्येक वेळी जिंकण्याचा अट्टहास करण्याची गरज नसते. हरण्याची सुद्धा एक आपली वेगळीच मजा असते. पण ही मजा ओळखण्याची आणि अनुभवण्याची दृष्टी आपल्याकडं असायला हवी. एकंदरीत काय, तर आयुष्यात आलेल्या किंवा येणाऱ्या चांगल्या गोष्टींबरोबरच वाईट आणि कटू गोष्टीही आपण तितक्याच स्फूर्तीनं आणि आनंदानं स्वीकारल्या पाहिजेत. हे जमलं आणि हार पचवता आली तर तुम्ही आयुष्याच्या खेळात खरे यशस्वी झालेले असता..!

✍️ काव्या पोवार

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Subhash Velingkar: सुभाष वेलिंगकरांची अटक अटळ? कोर्टाचा दिलासा नाही, जामीन अर्जावर सोमवारी सुनावणी

Saint Francis Xavier: सुभाष वेलिंगकरांच्या अटकेसाठी उद्रेक; पर्यटक, विद्यार्थ्यांचे हाल, गोव्यात दिवसभर कुठे काय घडलं?

BKC ते आरे JVLR पंतप्रधान मोदींचा मेट्रोने प्रवास; शाळकरी विद्यार्थी, महिलांशी साधला संवाद पाहा Video

Goa HSE Board Exam: गोवा बारावी बोर्ड परीक्षेच्या वेळापत्रकात बदल, JEE परीक्षेमुळे मोठा निर्णय

गिरीत बंदिस्त खोलीत आढळला मृतदेह , संशयास्पद मृत्यूचा कुटुंबियांचा अंदाज; गोव्यातील ठळक बातम्या

SCROLL FOR NEXT