TMC president Mamata Banerjee and AAP president Arvind kejriwal insist on hoisting their flag in Goa Dainik Gomantak
ब्लॉग

दीदी आणि दादांचा करिश्मा गोव्यात चालणार का?

प. बंगालच्या मुख्यमंत्री तथा तृणमूल कॉंग्रेसच्या अध्यक्ष ममतादीदी आणि दिल्लीचे मुख्यमंत्री तथा आम आदमी पक्षाचे अध्यक्ष अरविंददादा यांनी आयाराम-गयाराम प्रवृत्तीच्या राजकारण्यांशी संधान बांधून गोव्यात आपला झेंडा फडकावण्याचा अट्टाहास चालवला आहे.

दैनिक गोमन्तक

गोवा आणि पंजाब या दोन्ही राज्यांमध्ये 2022 च्या फेब्रुवारी - मार्चमध्ये विधानसभा निवडणुका होतील, असे अनौपचारिक बिगुल वाजले आणि सारे राष्ट्रीय आणि प्रादेशिक पक्ष षड्डू बांधून निवडणूक आखाड्यात उतरले. गोव्यात भाजपा, कॉंग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेस, कम्युनिस्ट या राष्ट्रीय पक्षांबरोबरच म.गो., गोवा फॉरवर्ड हे स्थानिक पक्ष गेल्या वर्षभर आपापल्यापरीने कार्यरत आहेतच, पण आता आप, तृणमूल कॉंग्रेस, शिवसेना हे पक्षही अधिक जोमाने येथे कार्यरत असल्याचे जाणवते. प. बंगालच्या मुख्यमंत्री तथा तृणमूल कॉंग्रेसच्या अध्यक्ष ममतादीदी आणि दिल्लीचे मुख्यमंत्री तथा आम आदमी पक्षाचे अध्यक्ष अरविंददादा यांचे पूर्ण ताकदीनिशी गोव्यात आगमन झाले आहे आणि त्यांनी आयाराम-गयाराम प्रवृत्तीच्या राजकारण्यांशी संधान बांधून गोव्यात आपला झेंडा फडकावण्याचा अट्टाहास चालवला आहे.

ज्या आयाराम -गयारामना आपल्या मूळ पक्षात विशेष स्थान नाही किंवा भविष्यकाळही ज्यांच्यासाठी अंधःकारमय आहे व त्यांचा पक्ष सत्तेवर येण्याची शक्यता कमी आहे असा त्यांचा समज आहे त्यांनी आपली पत वाढेल, त्या पक्षाच्या उमेदवारीवर आपण निवडून येऊ अशी उमेद बाळगली आहे अशानी तृणमूल आणि ‘आप’ला आपला ‘बाप’ मानला आहे. तो त्यांच्यासाठी ‘शाप’ ठरतो कि ‘वरदान’ हा येणारा भविष्यकाळच सांगू शकेल. तृणमूलच्या सर्वेसर्वा ममता बॅनर्जी यांनी प. बंगालमध्ये भाजपला पराभूत केल्यामुळे आणि आपचे सर्वेसर्वा अरविंद केजरीवाल यांनी नवी दिल्लीत भाजपचा पराभव केल्यामळे हे दोन्ही नेते आपल्या पक्षांच्या माध्यमातून इतर पक्षांना दे माय धरणी ठाय करण्याच्या ईर्षेने आणि जिद्दीने निवडणूक रिंगणात उतरले आहेत आणि साम, दाम, दंड, भेदचा मारा करीत प्रचाराला सुरुवात केली आहे. अशावेळी ममता दीदी आणि अरविंददादा यांची दादागिरी येथे कितपत तग धरेल याचे आडाखे बांधण्यास राजकीय मुत्सद्दी आतुरलेले आहेत. नोव्हेंबरअखेरपर्यंत याचा थोडा फार अंदाज येऊ शकेल असे एकूण चित्र आहे. याचे कारण म्हणजे राष्ट्रीय आणि स्थानिक पक्षांचे युतीबाबत अजूनही तू तू मै मै चालूच आहे. त्यांचे तळ्यात-मळ्यात धोरण केव्हा आणि कसे बदलेल यासाठी दिवाळी सण जावा लागेल. दिवाळीच्या प्रकाशझोतात मग त्या त्या पक्षाची दिवाळखोरी किंवा नफेखोरी स्पष्ट होऊ शकेल.

आता हेच पहाना, मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी ढवळीकर बंधूंना आणि त्यांच्या मगो पक्षाला झोडपून काढल्यानंतर ढवळीकरबंधूंनी देवेंद्र फडणवीसांबरोबर नाना फडणीसच्या मुत्सद्देगिरीने टाकलेला डाव उधळला गेला, तर हायकमांडवर विसंबून असलेल्या कॉंग्रेसपक्षाने आज-उद्या करीत तीन महिने काढल्यामुळे त्यांच्याशी युतीस तयार असलेला गोवा फॉरवर्ड, मगो यांनी काढता पाया घेतला आहे. आता हे दोन्ही पक्ष तृणमूल आणि आपशी संधान बांधण्याच्या तयारीत दिसतात. काँग्रेस - राष्ट्रवादी एकत्र असूनही ते आपले खरे अस्तित्व अजूनही उघड करीत नाहीत. गोव्यात स्वतःला निवडणुकीच्या अंदाजातील प्रशांत किशोर समजणाऱ्यांना अजूनही वाटते की येत्या पंधरवड्यात भाजपा, मगो, काँग्रेस राष्ट्रवादी, गोवा फॉरवर्ड, मगो आणि गोवा फॉरवर्ड- तृणमूल, गोवा फॉरवर्ड, मगो- आप आणि गोवा फॉरवर्ड यांच्यात बैठका, गुप्तबैठका होऊन ते ठराविक निर्णय प्रक्रियेपर्यंत येतील. आता घोडा मैदान जवळच आहे.

जे उमेदवारीसाठी इच्छुक होते त्यांनी दुसऱ्या पक्षात जाऊन आपली उमेदवारी निश्‍चित केली असली तरी अजूनही ही खेळी संपलेली नाही. अजूनही मूळच्याच पक्षात राहून उमेदवारीवर हक्क सांगणाऱ्यांवर गदा आली तर ते आप, तृणमूल किंवा अपक्ष असे वर्तुळ पूर्ण करू शकतात. तशातच अर्ध्या आमदारांना आमचा पक्ष पुन्हा तिकीट देईलच असे नाही, असा बॉम्बगोळा मुख्यमंत्र्यांनी टाकल्यामुळे मंत्र्यांतून आमदारांपर्यंत साऱ्यांनाच भीतीने पछाडले आहे. तसे झाले तर मग भाजपला खिंडार पडून तिकीट न मिळालेले मंत्री-आमदार दुसऱ्या पक्षाच्या बसचे तिकीट काढू शकतात व त्यासाठी दिल्ली किंवा कोलकाता विमानतळ गाठू शकतात. आता भाजपा अशांच्या जखमेवर मीठ चोळतात कि त्यांना साखरे एवजी गुळाचा खडा खायला देऊन त्यांचा गुळाचा गणपती करतात, याकडेही इच्छुकांचे लक्ष लागून राहिले आहे.

भाजपच्या बाबतीत आणखी एक गोष्ट घडली आहे, त्याकडेही भाजप नेते, कार्यकर्ते आणि मतदार दुर्लक्ष करू शकणार नाहीत. ती गोष्ट म्हणजे केंद्रीय गृहमंत्री तथा भाजपाचे राष्ट्रीय नेते अमित शहा यांच्या समोरच मंत्रिमंडळातील मॉविन गुदिन्हो, विश्‍वजित राणे आणि मायकल लोबो यांनी डॉ. सावंत यांची मुख्यमंत्रीपदावर पुनश्‍च स्वार होण्याची सायकल रोखून धरण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामुळे त्यांची ही ‘अंदरकी बात’ आता उघड झाली आहे. त्यामुळे मुख्यमंत्री डॉ. सावंत आपली प्यादी कशी खेळतात, हे सारे ते खेळीमेळीच्या वातावरणाने आवरण घालून मिटवतात किंवा पक्षश्रेष्ठींना विश्‍वासात घेऊन दुसरीच खेळी खेळतात हे गुप्त ठेवून मग ऐनवेळी जाहीर करतात यावरही सर्वजण डोळा ठेवून आहेत.

आज घडीस काँग्रेसचे ज्येष्ठ, कनिष्ठ तृणमूलमध्ये, आपचे काँग्रेसमध्ये, भाजप- मगोचे आपमध्ये हे चालू आहे, असेच थोडे दिवस चालू रहाणार आहे यातूनच मग ममतादीदी आणि अरविंद यांची सीमोल्लंघन करण्याची महत्त्वाकांक्षा पूर्ण होते की नाही याकडे देशाच्या नजरा लागून राहिल्या, तर त्यात आश्‍चर्य वाटण्याचे कारण नाही. या त्यांच्या महत्त्वाकांक्षेला खतपाणी घालण्याचे काम त्या त्या पक्षांच्या नेत्यांना सहकार्य करीत स्थानिक एकवटत आहेत. त्याचा परिणाम, सुपरिणाम, दुष्परिणाम गोव्यावर कसा होऊ शकतो यांचे विचारमंथन आता सुरू होणार आहे.

- शंभू भाऊ बांदेकर

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Margao Police: हुल्लडबाजांना चाप; मडगाव पोलिसांनी जप्त केल्या मॉडिफाईड बुलेट

Shruti Prabhugaonkar: गोमंतकीयांना कोट्यवधी रुपयांनी गंडवणाऱ्या श्रुतीला अवघ्या १० दिवसात जामीन

India Bike Week 2024: चित्तथरारक स्टंट, म्युझिक आणि बरंच काही...; गोव्यातील बाईक इव्हेंटच्या Date, Venue जाणून घ्या

Tribute to the Legends मिरामार किनारी सुदर्शन पटनाईक यांनी साकारले सिने जगतातील दिग्गजांचे Sand Art, पाहा फोटो

Goa Today's News Live: नैसर्गिक मृत्यू की हत्या; पारोडा-केपे येथे घरात आढळला महिलेचा मृतदेह

SCROLL FOR NEXT